पेन्शनर सिटी स्मार्ट होणार तरी कधी?

नोंद : मुकुंद फडके

सोशल मिडीयावरील खिल्लीची लोकप्रतिनिधींना जाणीव आहे का?

सातारा – 
आताशा साताऱ्यात यावसंच वाटत नाही…घर आणि पेठ सोडली… तर सगळं कसं अनोळखी वाटतं..तसं साताऱ्यात कुठल्याही चौकात गेल्यावर ‘काय ठेवलंय या साताऱ्यात’ हे वाक्‍य हमखास ऐकू येतं…सोशल मिडीयावरील फेसबुकवर एका सातारकराने व्यक्त केलेली ही व्यथा आहे.अद्यापही पेन्शनर सिटी अशी ओळख असलेल्या सातारची सध्या सोशल मिडीयावर ज्याप्रकारे खिल्ली उडवली जात आहे,त्याची कल्पना लोकप्रतिनिधींना आहे का? आणि असल्यास या पेन्शनर सिटीला स्मार्ट करण्यासाठी ते काही करणार आहेत की नाही हाच खरा प्रश्‍न आहे.

वर उल्लेख केलेल्या सातारकराने फेसबुकवर पुढे म्हटले आहे:आता साताऱ्यात ग्रंथ महोत्सवाची चर्चा होत नाही…औद्योगिक प्रगतीची चर्चा होत नाही… उद्योगधंद्यांची चर्चा होत नाही… विकासाची चर्चा होत नाही…
चर्चा होते ती फक्त राड्यांची… दारुच्या दुकानांवरुन होणाऱ्या भांडणांची… चर्चा होते गणपती मूर्तींच्या उंचीची.. विसर्जनाच्या ठिकाणाची आणि डॉल्बीच्या थरांची…थोडक्‍यात काय, चर्चा होते एकूणएक निरर्थक गोष्टींची…
साताऱ्यात रोज नवनवीन कॅफेज्‌ उघडतात…पण या हॉटेल्समध्ये जायला तरुणाई आहे कुठे? तरुणाई आहे हिंजवडी, खराडी, मगरपट्ट्याच्या कचाट्यात… आई- बापांना सोडून.. विकेंडच्या खैरातीची वाट बघत जगते आहे…

सण आले की सातारा कसं गजबजून जातं.. आधीच्या काळी जशा माहेरवाशिणी चार दिवस यायच्या, तसं आता घरची सवरती मुलं घरी येतात… तेवढंच मग राजपथ गर्दीनं भरुन जातो… एकदा का सोमवार आला, की जैसे थे…
कोणत्याही सातारकराला सातारचे असे वर्णन वाचून निश्‍चितच वाईट वाटेल.या फेसबुक पोस्टवर सातारकरांनीच दिलेल्या प्रतिक्रीया पाहिल्या तर सर्वानीच या पोस्टला सहमती दर्शवली आहे.पण त्याचबरोबर साताऱ्यात प्रगतीची काहीच हालचाल होत नसल्याची वेदनाही आहे.ही वेदना लक्षात घेउन आमदार आणि खासदार या शहरासाठी काही करणार आहेत की नाही या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्याची वेळ आता आली आहे.

सातारचे पेन्शनर सिटी म्हणून वर्णन केले जायचे तेव्हा पुर्वी सातारकर सुखावून जायचे.कारण जगाच्या,देशाच्या आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातील लोक स्थायिक होण्यासाठी सातारचा पर्याय निवडायचे.मनाला भुरळ पाडणारे निसर्ग सौंदर्य,स्वच्छ आणि निरोगी हवा,भरपूर पाणी यामुळे अनेकांना सातारा खुणवायचे.

आज सातारची ही वैशिष्ठे कायम आहेत.हीच वैशिष्ठे जपून ही पेन्शनर सिटी स्मार्ट होउ शकते.पण त्यासाठी जबरदस्त राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. आज सातारच्या औद्योगिक प्रगतीत अपवाद वगळता नाव घेण्यासारखे काही नाही.अभियंत्यांना अल्प वेतनावर काम करावे लागत आहे किंवा त्यांच्यासमोर 100 किलोमीाटरवरील पुण्याचा पर्याय आहे.शिरवळ,फलटण,कराड येथील औद्योगिक वसाहती विकसीत झाल्या आहेत.पण सातारा जैसे थे आहे.

निसर्गाचे सुंदर वरदान लाभले असूनही पर्यटनाच्या बाबतीत बरेच काही करण्यासारखे असूनही काहीच केले जात नाही.एकेकाळी या शहरात 7 चित्रपटगृहे होती.आज एकच चालू आहे.शहरातील दोन थिएटर्स स्थानिक गुंडगिरीमुळे बंद पडली.पण त्याचे कोणालाही सोयरसुतक नाही.पुणे,मुंबईत गाजणारी नाटके सातारकरांना कधीच पहायला मिळत नाहीत.शहरातील एकमेव शाहू कलामंदीर चालू तरी आहे की नाही याची शंका येते.

एकूणच सर्व बाबी सकारात्मक असूनही केवळ इच्छाशक्तीचा अभाव आणि कोणत्या दिशेने जावयाचे आहे याबाबतचा गोंधळ यामुळे सातारची पेन्शनर सिटी ही ओळख कायम आहे.आता सातारकरांनीच हा विषय गांभिर्याने घेतला तरच लोकप्रतिनिधींना काहीतरी भरीव आणि स्मार्ट काम करण्यास भाग पाडता येउ शकेल.अन्यथा सोशल मिडीयावरील सातारची उडवली जाणारी खिल्ली नित्याचीच होउन जाईल.

सातारा म्हणजे निवांतपूर
सध्या देशातील शहरांचे नामांतर करण्याची साथ सुरु आहे.सोशल मिडीयावर त्यावरुनही सातारची खिल्ली उडवली जात आहे.सातारचे नाव बदलायची वेळ आली तर ते नाव निवांतपूर करावे अशी सूचना एका नेटकऱ्याने केली आहे.लोकप्रतिनिधी आणि सातारकर नागरिक या दोघांनाही हा टोमणा जिव्हारी लागणारा आहे.पण त्यामुळे एकूणच जाणवणारा निवांतपणा संपणार आहे का हाच खरा प्रश्‍न आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)