‘देशद्रोह’ कशाला म्हणायचं? (भाग-१)

प्रशासन आणि राज्य चालविण्याची प्रक्रिया यावर टीका करण्याचा, राग आणि रोष कधी कविता करून, चित्राद्वारे, लेख लिहून, व्यंगचित्र काढून आणि इतर लोकशाही मार्गाने व्यक्त करणे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. त्याचा लगेच होणारा “परिणाम’ जर हिंसा असेल तरच त्याबाबत कलम 124- अ कलमाचा वापर पोलीस करू शकतात. पोलीस विभागातील काही लोकांनी त्यांना वाटेल तसे अर्थ काढून 124-अ चा वापर व गैरवापर केल्याने वेळोवेळी झालेल्या अनेक कारवाया प्रश्नचिन्हांकित झाल्या आहेत. विधी आयोगाने सीडेशन या शब्दावरच आक्षेप घेतला असून देशद्रोह हा शब्दच कायद्याच्या पुस्तकातून काढून टाकून दुसरा शब्द वापरावा असे सुचविले आहे.

देशद्रोहासंदर्भातील 124 अ हे कलम रद्द करावे, अशी मागणी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी केली आहे. ही ब्रिटिशकालीन तरतूद आहे. देशाबद्दल अप्रिती अशा अर्थाने हे कलम वापरले जाते. हे कलम जेव्हा कायद्यात घेण्यात आले तेव्हा त्यावर संवैधानिक सभेत खूप मोठी चर्चा झाली होती. ब्रिटिशकालीन तरतूद राजद्रोह या नावाने होती. आता त्याला आपण देशद्रोह असे म्हणतो. भारतीय संविधानातील कलम 19 नुसार प्रत्येकाला अभिव्यक्ती आणि संचार स्वातंत्र्य आहे. अभिव्यक्तीला अडथळा करणारी तरतूद संविधानात असू नये यावर संवैधानिक सभेत विस्तृत चर्चा घडून आली. लोकशाही राज्यव्यवस्थेमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाला आपले मत, बाजू मांडण्याचा अधिकार आहे. सत्तास्थानी असलेल्या लोकांना ते मत आवडले नाही म्हणून किंवा ते अत्यंत प्रभावीपणे सरकारवर टीका करणारे असले म्हणून ते बेकायदेशीर कृत्य ठरत नाही. अशा टीकेला निदान स्वतंत्र भारतात अभिव्यक्ती म्हणून मान्यता असली पाहिजे असे त्यावेळी सगळ्यांना पटल्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर “देशद्रोह’ किंवा देशाबद्दल ‘अप्रिती’ अशा नावाखाली घटनेतील कलम 19(2) नुसार बंधन म्हणून नसावे हे सुद्धा मान्य करण्यात आले व त्यानंतर देशद्रोह ही तरतूद संविधानातील घटनात्मक भाग न बनता केवळ भारतीय दंड विधानातील एक फौजदारी तरतूद म्हणून कलम 124-अ नुसार अस्तित्वात राहिली.

गेल्या 70 वर्षांच्या काळात केवळ काही शब्द वापरले किंवा घोषणा दिल्यात म्हणून कुणी देशद्रोही ठरत नाही, असे निवाडे पूर्वीपासून म्हणजे 1962 पासून सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. ते न्यायतत्व समजून घ्यावे लागतील. परस्पर कुणालाही ‘देशद्रोही’ ठरवितांना अनेकांचा तोल सुटतो. कारण अशा प्रत्येक वेळी असे अनेकजण एक तर जातीय, धार्मिक किंवा पक्षाच्या चष्म्यातून बघत असतात. इतरांविरुद्ध अत्यंत घाणेरडी, अश्‍लील भाषा वापरली म्हणजे आपण फार देशभक्त ठरतो, असा काही जणांचा गैरसमज झालेला आहे. कायदा आणि कायद्याचा दृष्टिकोन समजून घेतला तर कदाचित आपल्या विचार करण्याच्या प्रक्रियेत फरक पडू शकतो, असे वाटल्याने मी देशद्रोह म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. मी म्हणतो तोच कायद्याचा अर्थ आहे असे माझे मत नाही. 1962 पासून तर 2003 पर्यंत सर्वोच्च न्यायालयाने दिलेले अनेक निर्णय माझ्या म्हणण्याचे आधार आहेत. तरीही हे काहीच मान्य नसेल तर तो प्रत्येकाचा अधिकार आहे. आपल्याला वैचारिक मागासलेपणा कवटाळून बसायचे आहे की प्रगत लोकशाही विचारांसह भारतीय नागरिक होतानाच वैश्‍विक व्हायचे आहे, हे ठरविण्याचे सुद्धा स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे.

‘देशद्रोह’ कशाला म्हणायचं? (भाग-२)

सरकारवर आणि सरकारच्या काम करण्याच्या पद्धतीवर वेगवेगळ्या प्रकारे कितीही वाईट भाषेत व उग्र शब्दात टीका केली तरीही तो देशाचा अपमान ठरत नाही व कलम 124-अ नुसार गुन्हा नोंदविणे चूक आहे. हिंसेला प्रोत्साहन देणारे वक्तव्य, बोलणाऱ्याचा उद्देश अशा कृतीला बढावा देणे असेल तर, व त्या कृतीतून लगेच कायदा- सुव्यवस्थेपुढे आव्हान उभे झाले असेल तरच 124-अ कलमाचा वापर करावा, असे न्याय-सूत्र सर्वोच्च न्यायालयाने 1962 साली केदारनाथ विरुद्ध बिहार सरकार या केसचा निकाल देताना नक्की केले. पुढे हेच सूत्र

– अॅड. असीम सरोदे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)