लक्षवेधी: पांडांच्या पक्षप्रवेशाने भाजप काय साधणार?

राहुल गोखले

ओडिशात पूर्वाश्रमीचे बिजू जनता दलाचे नेते जय पांडा यांना भाजपने प्रवेश तर दिला आहे. पण केवळ त्यामुळे भाजपचा ओडिशाच्या सत्तास्थानी प्रवेश निश्‍चित होईल असे मानणे दूधखुळेपणाचे ठरेल. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्या असताना अशा राजकीय क्‍लृप्त्या सर्वच पक्ष करतील आणि भाजपने त्याची चुणूक दाखविली आहे. पण निवडणुकीतील यश हाच एकमेव निकष बनवून विधिनिषेधाला राजकीय पक्षांनी कशी मागची जागा दिली आहे याचाही प्रत्यय अशा उदाहरणांनी आल्याखेरीज राहणार नाही.

पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसला कडवी टक्‍कर देण्यासाठी भारतीय जनता पक्ष त्या राज्यात आटापिटा करीत आहे. जरी त्या राज्यात डाव्यांची शक्‍ती कमी झाली असली आणि कॉंग्रेसची स्थिती फारशी चांगली नसली तरीही भाजपला बंगालमध्ये तृणमूलला धक्‍का देण्यात किती यश येईल हे सांगता येणार नाही. तथापि ज्या प्रदेशांत भाजपला फारसे जनसमर्थन नाही त्या प्रदेशांत भाजप आपला विस्तार करू पाहात आहे. आसाम आणि त्रिपुरामध्ये भाजपला त्या रणनीतीत यश आले हे खरे; तथापि त्या यशात भाजपच्या नेत्यांचा वाटा किती आणि अन्य पक्षांतून आयात केलेल्या उमेदवारांचा वाटा किती यावर बराच आणि बऱ्याचदा उहापोह झाला आहे. किंबहुना भाजपने “कोण जिंकतो’ एवढाच निकष ठरवला आहे, अशी स्थिती आहे. त्यामुळे एरवी विचारधारा आणि निष्ठा याचा घोषा लावणाऱ्या भाजपची कृती किती विरोधाभासी आहे याचा प्रत्यय अलीकडच्या काळात अनेकदा आला आहे.

ओडिशात भाजपची स्थिती बंगालप्रमाणेच यथातथा आहे आणि म्हणून तेथेही भाजप आपला विस्तार करण्यास उत्सुक आहे. अर्थात स्वबळावर हे लगेचच करता येईल की नाही, याविषयी भाजप नेतृत्वाच्या मनात देखील साशंकता असावी आणि त्यामुळेच ओरिसात पूर्वाश्रमीचे बिजू जनता दलाचे नेते जय पांडा यांना भाजपने आपल्या पक्षात समाविष्ट करून घेतले आहे. अर्थात पांडा यांना भाजपने पक्षप्रवेश दिला तरीही केवळ भाजपची स्थिती सुधारेल असे मानणे वस्तुस्थितीला धरून होणार नाही. याला अनेक कारणे आहेत.

गेल्या वर्षी जय पांडा यांनी बिजू जनता दलाला रामराम ठोकला. त्यापूर्वीपर्यंत ते बिजू जनता दलाचे प्रवक्‍ते होते आणि त्या पक्षाची बाजू माध्यमांतून प्रखरपणे पण तितक्‍याच सभ्यतेने मांडत असत. त्यामुळे एरवी अन्य पक्षाचे प्रवक्‍ते जसा आक्रस्ताळेपणा करतात तसे पांडा यांच्या बाबतीत क्वचितच घडले आणि एक सभ्य चेहरा म्हणून पांडा यांची ख्याती झाली. केंद्रपुरा मतदारसंघातून ते निवडूनही आले होते. परंतु जशा या पांडा यांच्या जमेच्या बाजू होत्या आणि आहेत तद्वतच त्यांच्या काही मर्यादाही आहेत. एक तर एका मतदारसंघातून निवडून आल्याने ती व्यक्‍ती आपोआप लोकनेता बनत नसते. त्याचे कारण एका मतदारसंघात काम करणे निराळे आणि अन्य मतदारसंघांत आपल्या पक्षाचे उमेदवार निवडून आणणे निराळे. पक्षाला नेहमी एक चेहरा लागतो.

बिजू जनता दलाचे नेते आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक हे त्या पक्षाचा चेहरा आहेत. तेव्हा पांडा कितीही सभ्य चेहरा असले तरीही ते पक्षाचा निवडणुकीत चेहरा बनू शकत नाहीत. ही त्यांची मोठी मर्यादा आहे आणि तरीही भाजपने बिजू जनता दलाला लढत देण्यासाठी पांडा यांचा उपयोग करून घ्यावा हे आश्‍चर्यकारक आहे. बिजू जनता दलाला काहीसे अस्वस्थ करण्यापलीकडे भाजपचा हा निर्णय किती परिणाम साधेल हे सांगता येणार नाही. ओडिशात भाजपकडे धर्मेंद्र प्रधान हे केंद्रीय मंत्री आहेत आणि ओडिशाचे भाजपतर्फे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणूनही त्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो. तेव्हा त्या बाबतीत देखील पांडा यांचा फारसा उपयोग पक्षाला नाही. तरीही भाजपने पांडा यांना पक्षात समाविष्ट केले याचे कारण पांडा यांना जनसमर्थन किती आहे हे नसून त्यांच्यापाशी असणारे माध्यमांचे सामर्थ्य हे आहे असा दावा कोणी केला तर तो चुकीचा नाही.

माध्यमे आणि सोशल मीडिया याचा वापर पक्षाचा प्रचार करण्यासाठी कसा करायचा हे भाजपइतके अधिक चांगले कोणीच ओळखू शकत नाही. अनेक वृत्तवाहिन्या ज्या कंपनीच्या आहेत त्या कंपनीची मालकी पांडा यांच्या पत्नीकडे आहे. यात प्रादेशिक वाहिन्यादेखील आहेत. प्रादेशिक राजकारणात प्रादेशिक माध्यमे प्रभावी ठरतात याचा अंदाज भाजप नेतृत्वाला नसणे शक्‍य नाही. तेव्हा एकीकडे पांडा यांच्या रूपाने एक सभ्य चेहरा आणि दुसरीकडे पांडा यांच्यामार्फत ओरिसात प्रादेशिक माध्यमे दिमतीला अशा दुहेरी उद्देशाने भाजपने पांडा यांना पक्षात प्रवेश दिला असल्यास आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही. पांडा स्वतः जननेते नसले तरीही माध्यमांच्या मदतीने भाजपला पूरक वातावरण तयार करता येईल असाही भाजप नेतृत्वाचा होरा असू शकतो. अर्थात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांत भाजपला काहीच महिन्यांपूर्वी पराभवाचा धक्‍का मतदारांनी दिला हेही विसरता येणार नाही.

शिवाय नवीन पटनाईक यांनी बिजू जनता दलाचाच नव्हे तर ओडिशाचा कारभार मुख्यमंत्री म्हणून परिणामकारक पद्धतीने हाताळला आहे. वास्तविक नवीन पटनाईक यांना बिजू पटनाईक यांचा वारसा लाभला असला तरी तो आडनावापलीकडे कोणताच नाही. कारण बिजू पटनाईक आणि नवीन पटनाईक यांच्या राजकीय व्यक्‍तिमत्त्वात मोठे अंतर आहे. नवीन पटनाईक हे जननेते नाहीत. किंबहुना त्यांना ओडिशी भाषादेखील चांगल्या प्रकारे अवगत नाही असेही म्हटले जाते. परंतु गेली उणीपुरी दोन दशके त्यांनी बिजू जनता दलाचे नेतृत्व सक्षमपणे केले आहे एवढेच नव्हे तर आपल्या पक्षाला सातत्याने विजयी करून दाखविले आहे. तेव्हा नवीन पटनाईक यांना आव्हान देणारा चेहरा म्हणून भाजपने पांडा यांची निवड केली असेल तर त्या बाबतीत पांडा यांची बाजू तोकडी पडण्याचा संभव अधिक. एका अर्थाने नवीन पटनाईक यांना पराभूत करणे सोपे आणि सहज नाही कारण पटनाईक यांचा समावेश ओडिशाचे यशस्वी मुख्यमंत्र्यांच्या यादीत करण्यात येतो. तेव्हा हे सगळे असून भाजपने पांडा यांचा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पाडला याचे कारण त्यांच्या हातात असणारी माध्यमे या पलीकडे या व्यतिरिक्‍त दुसरे दिसत नाही.

या खेरीज पांडा यांना भाजपने प्रवेश दिल्याने निदान निवडणुकीपर्यंत तरी त्यांची बडदास्त पक्षाला ठेवावी लागेल. या प्रक्रियेत पक्षाचे अन्य नेते असंतुष्ट होण्याचा संभव नाकारता येत नाही. तत्कालिक लाभासाठी भाजपने पांडा यांना प्रवेश दिला असला तरी त्याने दीर्घकालीन लाभ किती होईल हेही आता सांगता येणार नाही. असेही म्हटले जाते की पांडा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात नसतील; तर ते विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करतील. त्या निवडणुकीत भाजपला यश मिळालेच तर पांडा त्या यशात आपला वाटा मागितल्याखेरीज राहणार नाहीत; पण जर विजयापासून पक्ष वंचित राहिला तर पांडा भाजपसोबत राहतील का हाही प्रश्‍न अस्थानी किंवा अनाठायी नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)