नवी दिल्ली: नौदलाच्या जहाजाचा वापर राजीव गांधी यांनी आपल्या कौटुंबिक ट्रीपसाठी केल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे त्याला प्रत्युत्तर देताना कॉंग्रेसने आज बॉलिवुड स्टार अक्षयकुमार यांनी मोदींबरोबर आयएनएस सुमित्रा या नौदलाच्या जहाजावरील छायाचित्रे सोशल मिडीयावर प्रसारीत केली.
कॅनडाचा नागरीक असलेला अक्षयकुमार नौदलाच्या जहाजावर मोदींबरोबर काय करीत होता असा सवालही कॉंग्रेसने उपस्थित केला आहे. कॉंग्रेसच्या सोशल मिडीयाच्या प्रमुख दिव्या स्पंदना यांनी आपल्या ट्विटर अकौंटवर ही छायाचित्रे प्रकाशित करून मोदींना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. आयएनएस विराटवर दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी आपल्या कुटुंबासह सहल साजरी केली होती असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला होता. त्यावरून सध्या चांगलेच वादळ उठले आहे. नौदलाचे माजी प्रमुख ऍडमिरल रामदास यांनी मोदींचा हा आरोप खोडून काढला आहे. त्या पाठोपाठ आता कॉंग्रेसने नौदल जहाजावरील मोदींचे अक्षयकुमारांसमवेतचे फोटो टाकल्याने हे वादंग आता आणखीनच गडद झाले आहे.