#आगळे वेगळे: पुढे काय? एक न संपणारा प्रश्‍न… (भाग १)

अनुराधा पवार 
पुढे काय? हा एक नेहमी विचारला जाणारा प्रश्‍न. सर्वत्र, शिक्षणात हा प्रश्‍न प्रामुख्याने विचारला जातो. लहानपणी “शाळेत जातोस का?’ इथून सुरू झालेला प्रश्‍न मग “पुढे काय?’ असा विचारला जातो. दहावी, बारावी, पदवी , मास्टर्स डिग्री, डॉक्‍टरी, इंजिनियरिंग, मॅनेजमेंट, ….. स्पेशलायझेशन…..याला काही अंत नाही. माणूस आयुष्यभर शिकत असतो हे अगदी खरे आहे. या शिकण्याला पूर्णविराम नसतो. आपणच तो घेतो वा परिस्थिती घ्यायला लावते. वैयक्तिक जीवनात आणि सार्वजनिक जीवनातही. 
शिक्षणातील प्रश्‍न एक वेळ सुटतील-संपतील, पण जीवनातील प्रश्‍न मात्र कधीच सुटत नाहीत आणि संपत तर नाहीच नाहीत. “का? कसे? कोठ? कधी? आणि कोणी? पाच पांडवांप्रमाणे हे पाच बलदंड प्रश्‍न आहेत असे म्हणतात. कोण म्हणतात ते माहीत नाहीत्‌, पण असे म्हणतात. समजायला लागल्यापासून ते अंतिम क्षणापर्यंत अनेक प्रश्‍न माणसाला पडतात. काहींची उत्तरे सहजपणे मिळतात. जणू ती प्रश्‍नातच गुंफलेली असतात. किंवा अधिक सोप्या भाषेत सांगायचे तरे प्रश्‍नांच्या पानाआड उत्तराचे फूल दडलेले असतात.
अलगदपणे प्रश्‍न बाजूल सरकावला, की उत्तर हजर! किती सोपे. काही प्रश्‍नांची उत्तरे शोधावी लागतात. प्रयत्नाने मिळतात. पण काही प्रश्‍नांची उत्तरे मात्र जंग जंग पछाडूनही मिळत नाहीत. यातले काही प्रश्‍न आपण सोडून देतो. त्यांच्या फंदात पडत नाही. असे काही प्रश्‍न आहेत हे विसरून जाण्याचा प्रयत्न करतो. अर्थात विसरायचे म्हणून कोणताच प्रश्‍न विसरता येत नाही. ती एक आपली भाबडी आणि भ्रामक कल्पना असते. असे विसरल्याचे समजूत असणारे प्रश्‍न अचानकपणे आणि नको तेव्हा समोर उभे राहतात. दत्त म्हणून!
काही प्रश्‍न मात्र पिच्छा पुरवतात. ना त्यांची उत्तरे-समाधानकारक उत्तरे सापडतात; ना त्यांच्यापासून सुटका होते. असे प्रश्‍न छळत राहतात माणसाला आयुष्यभर. आणि त्यानंतरही छळत नसतीलच याची काही गॅरंटी नाही. कारण नंतर काय होते याची कोणालाच माहिती नाही. जे आहेत त्यांना कळत नाही आणि जे गेले आहेत ते सांगू शकत नाहीत. तेव्हा हा आणखी एक प्रश्‍न उपस्थित होऊ शकतो. जाऊ दे!
मात्र अनेक प्रश्‍न सोडवण्यापेक्षा ते सोडून देण्यातच आनंद असतो, पूर्वी परीक्षेला जाताना घरातले आणि शाऴेत शिक्षकही सांगायचे, की अगोदर संपूर्ण प्रश्‍नपत्रिका नीट वाचा. जे सोपे प्रश्‍न आहेत, तुम्हाला चांगले येतात ते अगोदर सोडवा आणि वेळ उरला तर मग कठीण प्रश्‍नांना हात घाला. नाही तर पहिल्याच कठीण प्रश्‍नाला सोडवता सोडवता सगळा वेळ संपून जायचा आणि मग उत्तरे येत असलेले प्रश्‍नही न सोडवता तसेच राहून जायचे, आणि त्याचा परिणाम व्हायचा रिझल्टवर. तेव्हा पेपरमधले सोपे सोपे प्रश्‍न अगोदर सोडवायची सर्वसामान्य माणसाला सवय लागून जाते.
पण जीवनात तसे होत नाही. जीवनातली सगळी प्रश्‍नपत्रिका एकदम वाचता येत नाही. एकेकच प्रश्‍न समोर येतो. कधी त्यात एक वा अनेक पोटप्रश्‍न असतात. आणि त्यांची मालिका संपतच नाही.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
2 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)