#आगळे वेगळे: पुढे काय? एक न संपणारा प्रश्‍न… (भाग २)

अनुराधा पवार 
पुढे काय? हा एक नेहमी विचारला जाणारा प्रश्‍न. सर्वत्र, शिक्षणात हा प्रश्‍न प्रामुख्याने विचारला जातो. लहानपणी “शाळेत जातोस का?’ इथून सुरू झालेला प्रश्‍न मग “पुढे काय?’ असा विचारला जातो. दहावी, बारावी, पदवी , मास्टर्स डिग्री, डॉक्‍टरी, इंजिनियरिंग, मॅनेजमेंट, ….. स्पेशलायझेशन…..याला काही अंत नाही. माणूस आयुष्यभर शिकत असतो हे अगदी खरे आहे. या शिकण्याला पूर्णविराम नसतो. आपणच तो घेतो वा परिस्थिती घ्यायला लावते. वैयक्तिक जीवनात आणि सार्वजनिक जीवनातही. 
लहानपणी, शाळा-कॉलेजात असतानाच्या प्रश्‍नांचे काही वाटत नाही. सोपे प्रश्‍न काय आणि कठीण प्रश्‍न काय, एकाच मापाने मोजले जातात. एखादा प्रश्‍न सुटत नसेल तर तो भिरकाऊन देण्याची हिम्मत असते. नाही सुटत, तर गेला उडत.. असे म्हणून त्या प्रश्‍नाला डावलता येते. पण जस- जसे वय वाढत जाते, तसे न सुटणारे प्रश्‍न भिरकावता येत नाहीत. उलट ते चिकटून बसतात, मनावर त्यांचा बोझा बनतो.
“आपलीच माणसे अशी का वागतात?’ हा एक सर्वांनाच सर्वाधिक छळणारा प्रश्‍न. सिंदबादच्या सफरीतील सिंदबादच्या खांद्यावर बसलेल्या त्या म्हाताऱ्यासारखा सतत पीडणारा. खरं तर विवाहानंतर खऱ्या कठीण आणि किचकट प्रश्‍नांना सुरुवात होते. दिलेल्या उत्तरातच पुढील प्रश्‍न असणारी ती एक अजब परीक्षापद्धती असते. ती पदवी परीक्षेची प्रश्‍नपत्रिका असते म्हणायला हरकत नाही. पण ती सोडवून होण्यापूर्वीच गृहस्थ वा गृहिणी या पदव्या मिळून जातात. आणि त्या पदव्यांना पात्र राहण्यासाठीच्या परीक्षेच्या प्रश्‍न मालिका नंतर सुरू होतात.
पुढे आई/बाबा, आजी/आजोबा अशा पदव्याही सहजतेने मिळून जातात आणि नंतर त्यांच्या परीक्षा सुरू होतात. सोपे किचकट प्रश्‍न उभे राहतात. यात मदत करणारे असतातही. पण इतरांच्या मदतीने प्रश्‍न बरोबर सुटतील याची काही गॅरंटी नसते. जेव्हा प्रश्‍नांची उत्तरं मिळत नाहीत, तेव्हा त्या प्रश्‍नांच्या गर्भातून जन्माला येणारी अस्वस्थता खूप भयाण असते… जीवघेणी असते. आणि कोणाची ही अस्वस्थता जाणवते, तर कोणी ती हास्यात लपवून ठेवण्यात यशस्वी होतो एवढाच फरक.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)