लक्षवेधी: काय आहे अधिकृत गुप्तता कायदा?

स्वप्निल श्रोत्री

राफेल विमान खरेदी प्रकरणाची काही महत्त्वाची कागदपत्रे भारतातील एका आघाडीच्या दैनिकाने प्रसिद्ध केल्यावर हे प्रकरण उजेडात आले. सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारची बाजू मांडताना भारताचे महान्यायवादी के. के वेणुगोपाल यांनी सदर वृत्तपत्रावर अधिकृत गुप्तता कायदा, 1923 (ऑफिशियल सिक्रेटस्‌ ऍक्‍ट) अंतर्गत कारवाई करण्याचा सरकारचा विचार असल्याचे निवेदन दिल्यानंतर सदर कायद्याबद्दल अनेक तर्क-वितर्क व विभिन्न मते कायद्याच्या जाणकारांकडून आली. परंतु, हा कायदा म्हणजे नक्‍की काय ? तो का आला ? हे सर्वप्रथम जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

भारतीय राज्यघटनेने कलम 19 नुसार सर्वांना आचार-विचार, भाषण व लेखन स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे; परंतु ह्याचा अर्थ असा होत नाही की, या अधिकाराचा वापर करून कोणी देशाच्या सुरक्षेच्या मुळावरच घाव घालावा.
सध्या सर्वोच्च न्यायालयात राफेल प्रकरणाची सुनावणी सुरू असून सत्ताधारी व विरोधी पक्ष यांच्यात रणकंदन माजले आहे. वेगवेगळ्या पातळीवर जाऊन राजकीय पक्ष एकमेकांवर टीका करीत असताना हेच रणकंदन सर्वोच्च न्यायालयात सुद्धा पाहायला मिळाले. न्यायालयात युक्‍तिवाद सुरू असताना एका गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले ती म्हणजे अधिकृत गुप्तता कायदा, 1923 किंवा ऑफिशिअल सिक्रेट ऍक्‍ट, 1923.

नावातच असल्याप्रमाणे अधिकृत गुप्तता कायदा, 1923 हा कायदा स.न 1923 मध्ये ब्रिटिश शासनाच्या काळात भारतात अस्तित्वात आला. ब्रिटिशांनी हा कायदा केल्यामुळे भारतात हा कायदा करण्यामागचा त्यांचा उद्देश चांगला नव्हता. ब्रिटीशांची सरकारी कामे, योजना, कमकाज, निर्णय हे कोणत्याही परिस्थितीत भारतीयांच्या हाती पडू नयेत आणि जर ते पडलेच तर ते उघड होऊ नयेत या कारणासाठी हा कायदा करण्यात आला होता. अधिकृत गुप्तता कायदा, 1923 हा कायदा इतका विचित्र आहे की, कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याने जर एखाद्या सरकारी फाईल किंवा कागदपत्रावर टॉप सिक्रेट किंवा ऑफिशियल सिक्रेट असे लिहिलेले लेबल लावले कि ती कागदपत्रे या कायद्याच्या अंतर्गत येतात व अशी कागदपत्रे प्रकाशित करणाऱ्या किंवा उजेडात आणणाऱ्या व्यक्‍ती किंवा संस्था त्यावर वरील कायद्यानुसार कारवाई करण्याचा अधिकार सरकारला मिळतो.

कायद्यात असणाऱ्या दोषपूर्ण त्रुटींमुळे हा कायदा पूर्वी अनेकदा चर्चेचा विषय झालेला आहे. सन 1971 मध्ये केंद्रीय विधी आयोगाने (लॉ कमिशन ऑफ इंडिया) हा कायदा रद्द करण्याची किंवा या कायद्यात काळानुसार आवश्‍यक ते बदल करण्याची सूचना भारत सरकारला केली होती. माहिती अधिकार कायदा, 2005 (आर.टी.आय ऍक्‍ट, 2005) मध्ये सुद्धा असे सांगण्यात आले आहे की, जर भविष्यात माहिती अधिकार कायदा आणि अधिकृत गुप्तता कायदा यांच्यात वाद निर्माण झाले तर माहिती अधिकार कायदा हा वरचढ ठरेल. आज भारत सरकार प्रत्येक कामात पारदर्शकतेचा दावा करत आहे. डिजिटल इंडियाकडे भारताची घोडदौड सुरू असताना रोज नवीन माहिती प्रत्येक भारतीय नागरिकांकडे येत असते. माहिती अधिकार कायद्याने सर्वांना माहिती घेण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे भ्रष्टाचार कमी होण्यास मदत होते मग अशावेळी अधिकृत गुप्तता कायदा कशाला हवा? ब्रिटिशांनी हा कायदा भारतात आणला होता. त्यामुळे ब्रिटिश गेल्यावर स्वतंत्र भारतात हा कायदा रद्द होणे गरजेचे होते. परंतु, तसे झाले नाही यासारखी अनेक मत-मतांतरे या कायद्याच्या बाबतीत पूर्वी होती आणि आज सुद्धा आहेत.

वरील समस्येचे मूळ ह्या कायद्यात नाही तर कायद्याच्या नावात आहे ऑफिशियल सिक्रेट म्हणजे नक्की काय? याची कोणतीही व्याख्या या कायद्यात नाही. त्यामुळे सरकारी अधिकारी आपल्या मतानुसार त्यांना जी कागदपत्रे टॉप सिक्रेट किंवा ऑफिसियल सिक्रेट वाटतात त्याला ते वरील लेबल लावतात. त्याचबरोबर संरक्षण मंत्रालयासंबंधित कोणत्याही गोष्टी या आर. टी. आय कायद्याच्या अंतर्गत येत नाहीत मग त्या जग जाहीर करण्याचा अधिकार कथित वृत्तपत्रास कोणी दिला?

आजच्या जागतिकीकरणाच्या युगात इंटरनेट व मीडिया यांच्यामुळे जग जवळ आले आहे. प्रत्येकाला सर्व काही जाणून घ्यायचे आहे ते निश्‍चितच योग्य आहे व कायदेशीरसुद्धा आहेत. परंतु, हा अधिकार अनिर्बंध नाही हेसुद्धा लक्षात ठेवणे गरजेचे आहे. देशाची सुरक्षा ही सर्वोच्च आहे व त्या संदर्भातील कागदपत्रे चोरण्याचा, छापण्याचा किंवा जाहीर करण्याचा कोणासही अधिकार नाही.

सर्वोच्च न्यायालयाने व केंद्र सरकारने हा विषय गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. स. न 1971 च्या केंद्रीय विधी आयोगाच्या सूचनेनुसार वरील कायद्यात आवश्‍यक ते बदल करून टॉप सिक्रेट किंवा ऑफिशियल सिक्रेट म्हणजे नक्‍की काय ? याची व्याख्या करणे गरजेचे आहे. झालेल्या चुकांमधून शिकतो तोच खरा माणूस असतो. नाहीतर अशा चुका पुनःपुन्हा होऊन अशी प्रकरणे भविष्यातही होतील याबाबत शंका नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)