‘2019’मध्ये घटलेल्या मतदानाचा संदेश काय?

कॅन्टोन्मेंट वगळता पाच विधानसभा मतदारसंघात मतदान कमीच


शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती आणि कसब्यात मतदान घसरले


भाजपची सत्ता असूनही अनेक ठिकाणी मतदान कमीच

पुणे – पुणे लोकसभा मतदार संघातील सहाही मतदार संघात आमदार, खासदार, दोन मंत्री, एक केंद्रीय मंत्री, महापालिकेत 98 नगरसेवक अशी गलेलठ्ठ ताकद असल्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढेल, असा अंदाज होता. मात्र, ती अपेक्षा फोल ठरली आहे. कोथरूड, शिवाजीनगर, पर्वतीसह गिरीश बापट यांचा बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदार संघातही गेल्या निवडणुकीपेक्षा कमी मतदान झाले आहे. सन 2014मध्ये वडगावशेरी, शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा पेठ या सहा मतदार संघातून मोठे मतदान झाले होते. कसबा पेठ विधानसभा मतदार संघ मतदानाच्या टक्केवारीमध्ये अव्वल होता. पण, यंदा शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती आणि कसब्यात मतदान घसरल्याचे दिसून आले आहे.

कोथरूडमध्ये संघटन असूनही मतदान घटले
विधानसभा निवडणूक स्वबळावर लढल्यानंतर या मतदार संघातून भाजपला विजय मिळाला. येथे शिवसेनेचीही ताकद आहे. कोथरूड विधानसभा मतदार संघात 22 नगरसेवक भाजपचे असून एक नगरसेवक शिवसेनेचा आहे. पण, गेल्या निवडणुकीच्या तुलनेत येथे मतदानाचे प्रमाण 5 टक्‍क्‍यांनी कमी झाले आहे. गेल्या वेळी अनिल शिरोळे यांना या भागातून मोठे मतदान झाले होते. यंदा मात्र मतदानाची टक्केवारी जेमतेम 50 टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचली. भक्कम संघटन असतानाही मतदानाची टक्केवारी वाढविण्यात अपयश आल्याचे दिसून येत आहे.

पर्वतीतही आकडा घटला
पर्वती विधानसभा मतदार संघात 27 पैकी 23 भाजपचे, तर शिवसेनेचा एक नगरसेवक आहे. महापालिका निवडणुकीत पर्वतीमधून भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून गेले होते. संघटनात्मक बांधणीमुळे यापूर्वीच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही येथे मतदान वाढले होते. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानात दोन टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. तेथे यंदा 52.07 टक्के मतदान झाले.

शिवाजीनगरमधील घट चिंताजनक
शिवाजीनगर मतदार संघात महापालिकेच्या तीन प्रभागांचा समावेश आहे. त्यामध्ये बारापैकी बारा नगरसेवक भाजपचे आहेत. महापालिकेतील सर्व नगरसेवक, एक आमदार असतानाही लोकसभा निवडणुकीतील मतदान सात टक्‍क्‍यांनी खाली आले आहे. या मतदारसंघात भाजपची बूथ यंत्रणा अधिक सक्षम आहे. त्यामुळे येथे महापालिका निवडणुकीत चांगले यश मिळाले होते. मात्र, मतदारसंघाच्या टक्केवारीत हा मतदारसंघ पाचव्या क्रमांकावर गेला आहे.

कसब्यातील घट चिंता वाढविणारी
कसबा मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. लोकसभेचे उमेदवार गिरीश बापट या मतदार संघातून पाच वेळा मोठ्या मताधिक्‍क्‍याने विजयी झाले आहेत. त्यामुळे कसबा मतदार संघातून चांगले मतदान होईल, अशी शक्‍यता होती. या मतदार संघात भाजपचे 16 नगरसेवक असून दोन नगरसेवक शिवसेनेचे आहेत. त्यामुळे युतीची ताकद या मतदार संघात आहे. पण, येथेही या वेळी मतदानाचे प्रमाण सात टक्‍क्‍यांनी घटले आहे. शहरातील सहा मतदार संघाच्या तुलनेत कसबा पेठेतील मतदान वाढले असले, तरी गेल्या निवडणुकीपेक्षा ते कमी आहे. कसबा पेठेतील मतदानाची टक्केवारी 55.88 टक्के राहिली.

पुणे कॅन्टोन्मेंटचा कौल कोणाला?
पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये 2014 पूर्वी भारतीय जनता पक्षाचा एकही नगरसेवक नव्हता. ही संख्या आता पाच आहे. तर महापालिकेतील नगरसेवकांची संख्या 13 आहे. पाच वर्षात भाजपची ताकद वाढलेली असतानाही मतदानाची टक्केवारी वाढू शकलेली नाही. या मतदार संघात 48.79 टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीपेक्षा मतदान तीन टक्के कमी झाले असून मतदानाच्या टक्केवारीत हा मतदारसंघ चौथ्या क्रमांकावर आहे. कॉंग्रेसची या मतदार संघात मोठी ताकद आहे.

वडगावशेरीही तळाला
राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या वडगावशेरी विधानसभा मतदार संघात 2014 मधील विधानसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार विजयी झाला. त्यानंतर या मतदार संघात भाजपचे 12, शिवसेनेचे तीन आणि रिपाइंचे दोन अशी नगरसेवकांची ताकद आहे. रिपाइं आणि शिवसेनेचेही काही प्रभागात वर्चस्व असल्यामुळे या मतदारसंघात चांगले मतदान होईल, असे वाटत असतानाच हा मतदार संघ टक्केवारीमध्ये तळाला गेला आहे. गेल्यावेळीपेक्षा येथे मतदान चार टक्‍क्‍यांनी कमी झाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)