विजय शेंडगे
दोन हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन यांचं संयुग’ अशी पाण्याची व्याख्या करता येते. पण प्रेमाची अशी कोणतीही व्याख्या करणे अत्यंत कठीण आहे. प्रेम म्हणजे आकर्षण ही प्रेमाची सर्वसाधारण व्याख्या. पण ती काही अंतिम व्याख्या नव्हे. ‘प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं असे मंगेश पाडगावकरांनी म्हटले आहे. ‘प्रेम कुणावरही करावं’ ही कुसुमाग्रजांची कविताही प्रत्येकालाच ज्ञात असते. प्रेमभावना शब्दांच्या चौकटीत कैद करणे मोठी कठीण गोष्ट.
व. पु. काळे म्हणतात,”प्रेम म्हणजे एक क्षण भाळण्याचा, बाकी सारे सांभाळण्याच.’ हा भाळण्याचा क्षण टाळण्याचे तारुण्यात पाऊल ठेवणाऱ्या तरुणाईच्या हातात नसते. ते फक्त भाळण्याचा क्षण सांभाळतात. पण जे क्षण सांभाळायचे, ज्या क्षणी परस्परांना समजून घ्यायचे, त्या क्षणांचा विसर पडल्यामुळेच काही प्रेमविवाह असफल होतात. ओस्वाल श्वार्त्झ म्हणतो, र्ङीेंश ळी ींहश ारींलह ींहरीं श्रळसहीं ींहश षळीश रीं ींहश हशरीीं. प्रेमाच्या आगकाडीमुळे मनाच्या तळाशी प्रेमाचीज्योत पेटते. तिच्या प्रकाशात एकविचाराने मार्गक्रमण करण्याऐवजी दोघांनी आपापल्या अहंकाराची, स्वार्थाची भाकरी त्या प्रेमाच्या आचेवर भाजण्याचा प्रयत्न केला तर मात्र त्या प्रेमाच्या ज्योतीचा भडका उडतो आणि दोघेही त्यात जळून भस्म होतात. प्रेम म्हणजे प्रेयसीवर सक्ती करणे नव्हे, तर तिची अनन्यभक्ती करणे होय. प्रेम म्हणजे त्याग, प्रेम म्हणजे निष्ठा, प्रेम म्हणजे नि:स्वार्थ वृत्तीची पराकोटी होय.
‘हे माधव ज्युलियन यांचे म्हणणे सर्वांना मान्य आहे. अर्थात प्रेमाची ही अत्यंत आदर्श व्याख्या होय. डॉ. भगवानदास म्हणतात, प्रेम हे प्रेमी जीवांना एका पातळीवर आणतं. द्वैतातून अद्वैत आकाराला येतं. आणि त्यामुळेच दोन देह नव्हे,तर दोन मनं एकरूप होतात. परंतु केवळ आकर्षण आणि धनदौलत हेच अधिष्ठान असलेल्या प्रेमात कधीही अद्वैत आकाराला येत नाही. साहजिकच एकजीव न झालेले प्रेमी जीव प्रेमविवाहानंतर अवघ्या काही महिन्यात, काही वर्षात विभक्त होण्याचा निर्णय घेतात. प्रेम म्हणजे सत्य, शिव आणि सुंदर या त्रिगुणांचा एकत्रित मिलाफ होय. प्रेमाला सत्याचं अधिष्ठान असावं लागतं. कारण असत्याची सावली प्रेमाला सोसवत नाही. प्रेम हे शिवाइतकं पवित्र असावं लागतं. कारण अपवित्र्याच्या ठायी असुराचा वास असतो. आणि सौंदर्य ही प्रेमाची मूलभूत गरज आहे. पण कायिक सौंदर्याबरोबरच मानसिक आणि वैचारिक सौंदर्याला महत्त्व द्यायला हवं. पण सत्य असत्याचा आपण आपल्या सोयीप्रमाणे अर्थ लावतो आणि कायिक सौंदर्याला प्राधान्य देतो.
केवळ कायिक सौंदर्य हेच अधिष्ठान असलेल्या प्रेमाचा परीघ अत्यंत मर्यादित असतो. सांभाळण्याच्या क्षणांचा विसर पडल्याने वैवाहिक आयुष्यात बुजवता येत नाही अशी दरी पडते. संसार मोडतात. ज्या प्रेमाला केवळ आकर्षण हाच पाय असतो ते प्रेम नारळाच्या झाडाप्रमाणे आकाशाला गवसणी घालताना दिसतं. परंतु नारळाच्या झाडाच्या सावलीत कोणालाही फार वेळ विसावा नाही घेता येत. त्याचवेळी स्वभावाधिष्ठित प्रेम फार उंच नसलं तरी त्याचा व्याप, त्याचा आवाका, त्याचा परीघ आंब्याच्या झाडाप्रमाणे फार मोठा असतो. आणि त्याच्या सावलीत प्रेमी जीवांना सुखाने आयुष्य कंठता येते. संकटांचा सूर्य माथ्यावर आला अथवा थोडाफार कलला म्हणून या अशा गर्द प्रेमाच्या सावलीत बसलेल्या युगलांना कुठलीही चिंता नसते.
प्रेम म्हणजे आयुष्यातला अंधकार नव्हे तर प्रेम म्हणजे प्रकाश. असे असतानाही प्रेमात अपयश पदरी पडलेल्या जीवांना प्रेम म्हणजे काळोखातली पायपीट वाटते. कारण अपयशी प्रेमिकांच्या नशिबी केवळ ठेचाळणं आणि रक्तबंबाळ होणं येतं. जीवनातला अंधकार जरी प्रेमात सामावलेला असला, तरी चैतन्याचा प्रकाशही त्याच प्रेमात सामावलेला आहे. पाण्यात पडलेल्या पानाला जसं प्रवाहाच्या विरोधात जाता येत नाही, तसेच जन्माला आलेल्या जीवालाही प्रेमात पडण्यावाचून पर्याय उरत नाही. पणते नि:स्वार्थ, निरपेक्ष, निर्मोही प्रेम असावं. आसक्ती, अभिलाषा, मोह, भुरळ या गोष्टींना प्रेमात मुळीच थारा असू नये. तसं झालं तर प्रत्येक विवाह पैलतीरी जाणं फारसं अवघड नाही. भले मग तो प्रेमविवाह असो अथवा थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने केलेलं लग्न असो. समुद्रमंथनातून विविध रत्ने आणि अखेर ‘अमृत सापडले अशी आख्यायिका आहे. प्रेम मला त्या अमृताचाही सार आहे, असे वाटते. म्हणूनच मी माझ्या एका कवितेत
प्रेमाहुनी जगी या, नसते सुरेख काही
हे सार अमृताचे, याच्यात विष नाही.
याच्यामुळेच होते, जगणे सुरेल गाणे.
याच्यामुळे फुलोनि, येती उजाड राने
असे म्हटले आहे. अमृत हे विषावर उतारा. मग त्याच अमृताचा सार असे जे प्रेम ते किती पवित्र असेल ! प्रेमाचं हे अमृतसार ज्याच्या ज्याच्या ओंजळीत असेल तो तो जीव सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. प्रेमाच्या अमृताचं सार ओंजळीत असणाऱ्या प्रेमी जीवांनी प्रेमविवाह करू दे अथवा संमतीने केलेले लग्न असू दे नक्कीच पूर्णत्वास जाईल.