‘निवडणूक’ म्हणजे काय हो आबा?

माझ्या मिस्टरांच्या योगा क्‍लासमधील 8-10 मंडळी चहासाठी येणार होती. संध्याकाळी 5 ते 7 असा कार्यक्रम, गप्पाटप्पा आणि खाणे असा दर महिन्याला कुणाकडे तरी ठरलेला कार्यक्रम. या महिन्यात तो आमच्याकडे होता. आम्ही दोघींनी, म्हणजे मी आणि सुनेने सर्व तयारी केली. उन्हाळा असल्याने दहीवडे, आईस्क्रीम की डाळ पन्हे यावर एकमत होता होता शेवटी नातवाने दहीवड्याला पसंती दिली. मित्रमंडळी येणार म्हणून हे ही खूष होते. सारी मंडळी जमली आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. सर्वचजण ज्येष्ठ नागरिक होते. नातू मिहीर तिथेच काहीतरी खेळत होता. आम्ही दोघी स्वयंपाकघरात तयारी करत होतो.

गप्पांचे विषय काय, नेहमीचेच-क्रिकेट, राजकारण आणि शेअरबाजार. आयपीएलचे सामने चालूच होते. त्यामुळे चर्चा खूपच रंगली होती आणि बोलता बोलता विषय राजकारणाकडे वळला. त्यात निवडणुकांचा मोसम! मग काय विचारता चर्चेला नुसते उधाण आले होते.

कोण कोठे, कुणाला, कधी काय बोलला? कोणाची संपत्तीची आकडेवारी कशी खोटी आहे, अमूक अमूकच्या सभेला किती लोक होते. कुणाचे रोड शो कसे झाले, कोण कुणाला गुप्तपणे भेटलं, हे सारे उगाळून झाले. पूर्वीच्या राजकारण्यांचे दाखले देऊन झाले. नवीनांच्या चांगल्या कामांची उजळणी झाली. न केलेल्या कामांचा आढावा झाला. पक्षनेत्यांबद्दल चर्चा झाली. पक्षांतराबाबत उलटसुलट मते मांडून झाली. एक दोघांचे पक्ष वेगळे होते. ते अगदी हमरीतुमरीवर येऊन बोलत होते. आवाज वाढत होता. शेवटी आम्ही खाण्याच्या डिश घेऊन गेल्यावरच एकदाची शांतता झाली. कार्यक्रम छान होऊन सर्वजण घरी गेले.

त्यांनीही हॉलमधील पसारा आवरून, टी.व्ही. सुरू केला. जवळच नातू बसला होता. बराच वेळ तो हे सर्व ऐकत होता. काहीही फारसं न कळण्याचं त्याचं 3-4 वर्षांचं वय. त्याला वाटलं, आबांचे मित्र भांडत आहेत. तो त्यांना म्हणाला, आबा, तुमचे मित्र भांडत होते का? आणि निवडणुका म्हणजे काय हो आबा? इतका वेळ तुम्ही यावरच बोलत होता ना.

या पोराला काय सांगावे कळेना; तेव्हा त्याची आई बाहेर येत म्हणाली, अरे मिहीर, तुमच्या मॅडम वर्गात मॉनिटर निवडतात. मग टीचर नसताना तो तुमचा क्‍लास सांभाळतो ना, तसंच. निवडणूक म्हणे देशाचा मॉनिटर निवडणं. त्याला पटलं ते. म्हणजे मॉनिटर निवडताना मॅडम आम्हाला सांगतात की जो गुड बॉय किंवा गुड गर्ल असेल. चांगला अभ्यास करणारा, खेळात भाग घेणारा, सर्व टिफीन संपविणारा, मुलांशी न भांडणारा, मारमारी न करणारा आणि आई बाबा आणि टीचरचे सर्व ऐकणारा. तोच मॉनिटर होतो. मग निवडणुकीत निवडलेला “मॉनिटर’ असाच असतो ना? आता निरुत्तर होण्याची वेळ आमची होती. खरंच “मॉनिटर निवडणं इतकं सोप्पं असतं का आपल्यासाठी?

आज लोकशाहीच्या या देशात मतदान हे कर्तव्य आहे. परंतु, एकंदरच या निवडणुकीच्या धामधुमीत प्रचाराच्या निमित्ताने एकमेकांवर केलेली चिखलफेक, अपप्रचार, अतिशय खालच्या पातळीवरचे राजकारण, पैशाची वारेमाप उधळपट्टी, अवास्तव घोषणा, टी.व्ही.वर रंगलेल्या चर्चा, एकमेकांवर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे केलेले आरोप-प्रत्यारोप आणि सत्तेसाठी चाललेला आटापिटा…

लहानग्या मिहीरची समजूत घालता येईल. कारण फारसं काही कळण्याचं त्याचं वयच नाही पण निवडणुका म्हणजे नुसता आरडाओरडा भांडणं, असं चित्र त्याच्यापुढे उभे राहता कामा नये. कारण असे अनेक “मिहीर’ उद्याची शान आहेत. देशाचे भविष्य आहेत. तेव्हा पुढील पिढीसाठी तरी या लोकशाहीत निवडणुका शिस्तशीरपणे, प्रामाणिकपणे आणि शांतपणे पार पडल्या पाहिजेत ही माफक अपेक्षा!

– आरती मोने

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)