हवामान खाते करते काय? (अग्रलेख)

हवामान खात्याचे अंदाज चुकल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागते आणि मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागते. सरकार याबाबत आपली जबाबदारी पार पाडते आणि शेतकऱ्यांना शक्‍य होईल ती सर्व मदत करते. पण हाताशी सर्व यंत्रणा असूनही अचूक पावसाचा अंदाज व्यक्‍त करण्यात अपयशी ठरणाऱ्या हवामान खात्याचीही जबाबदारी आता निश्‍चित व्हायला हवी. शेतकऱ्यांसाठी लढणारे खासदार राजू शेट्टी यांनी केलेल्या मागणीप्रमाणे आता चुकीच्या अंदाजासाठी हवामान खात्यावरच गुन्हा दाखल करण्याची वेळ आली आहे.

देशातील केरळ आणि आणखी काही राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्टृातही काही जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाला आहे. पण याच्या अगदी उलट परिस्थिती अनेक ठिकाणी आहे आणि तेथे दुष्काळाचे तीव्र संकट उभे ठाकले आहे. पावसाळी हंगाम सुरु होऊन दोन महिने झाले तरी, मराठवाडा आणि अन्य 20 जिल्ह्यांच्या काही भागात पाऊस नसल्याने शेतकरी धास्तावला आहे. मराठवाड्यात दोन महिन्यांत फक्‍त पाच दिवस पाऊस पडला आहे. त्यामुळे मराठवाड्यासह विदर्भाच्या काही भागात शेतीची परिस्थिती बिकट झाली आहे.

राज्यात कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रात आतापर्यंत समाधानकारक पाऊस झाला आहे. पण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात सर्वांत कमी पाऊस झाला आहे. दोन महिन्यांत मराठवाड्यातील अनेक भागात पावसाचा एक थेंबही पडलेला नाही. त्यामुळे जलसाठेदेखील कोरडे पडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागाला आता परतीच्या पावसावर अवलंबून राहावे लागणार असल्याचे चित्र आहे. मराठवाडयातील तीन जिल्ह्यांमधील पीक परिस्थिती अत्यंत नाजूक झाली आहे. काही महसूल मंडळांमध्ये दुबार पेरणीचे संकट ओढावले असतानाच मराठवाडयातील बहुतांश पिकांवर कीड आणि बोंड अळीचाही प्रादुर्भाव दिसून येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आतापर्यंत सरासरीच्या केवळ 38 टक्के पाऊस झाल्याने अनेक गावांमध्ये मका, मूग, तूर, भुईमूग, उडीद आणि कापूस ही शेकडो हेक्‍टरावरील पिके जवळपास जळाली आहेत. येत्या चार दिवसांत समाधानकारक पाऊस नाही आला, तर काही ठिकाणच्या शेतकऱ्यांना या वर्षी अजिबातच उत्पादनच मिळणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. राज्याच्या ज्या भागात आतापर्यंत सर्वात जास्त आत्महत्या झाल्या आहेत, त्याच भागात पुन्हा दुष्काळाचे संकट उभे ठाकल्याने सरकारची आणखी एक कसोटी लागणार आहे. पण खरी जबाबदारी चुकीचा अंदाज व्यक्त करणाऱ्या हवामान खात्याची आहे.

पाऊस न पडणे ही संपूर्णपणे नैसर्गिक घटना असली, तरी याबाबत अंदाज व्यक्त करणारी जी हवामान संस्था आहे तिच्या अकार्यक्षमपणामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे, ही गोष्ट सर्वात महत्वाची आहे. हवामान खात्याने व्यक्त केलेले अंदाज हे नेहमीच विनोदाचा विषय असला तरी आता ही गोष्ट हसण्यावारी नेण्यासारखी नाही. कारण हवामान विभागाच्या अंदाजावर शेतकरी आपल्या शेतीचे नियोजन करतो आणि हा अंदाज चुकला की शेतकऱ्याचेही नियोजन पूर्णपणे चुकते.

यावर्षी भरपूर आणि सरासरीएवढा पाउस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पण तसे न झाल्यानेच आता परिस्थिती गंभीर होत आहे. “यंदा पाऊसमान समाधानकारक राहील,’ असे सांगून हवामान विभाग अंतर्धान पावतो आणि पावसाळ्याच्या अखेरीस “यंदा सरासरीएवढा पाऊस झाला,’ असे कळवतो. पण पावसाने मध्येच दिलेली ओढ किंवा जास्त झालेला पाऊस याबाबत हवामान खाते काहीही बोलत नाही. मागील वर्षी देशातील काही जिल्ह्यांना अवर्षणाचा तर काही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसला होता.

गेल्या महिन्यात मुंबईत विक्रमी पाऊस पडला. सध्या केरळातही मुसळधार पाउस बरसत आहे. पण यापैकी कशाचाही अचूक अंदाज हवामान विभागाला व्यक्‍त करता आला नव्हता. एवढंच नाही तर, मुंबईत ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला होता. तोही अंदाज सपशेल चुकला. वास्तविक हवामान विभागातील भाकीत कथन करणारे कर्मचारी स्वत:ला संशोधक म्हणवून स्वत:ची पाठ थोपटून घेतात; पण ते कुठलेही संशोधन करताना दिसत नाहीत.

हवामान बदलाच्या काळात जगभर हवामानाचा अंदाज अचूक व्यक्‍त करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात असताना, आपले हवामान खाते काय करते, हाच संशोधनाचा विषय ठरू शकते. संगणक, उपग्रह तंत्रज्ञानात संपूर्ण जगासोबत असणाऱ्या आपल्या देशात हवामानाचा अंदाज व्यक्‍त करण्याची पद्धती मात्र लाजिरवाणी आहे. हवामान खाते स्वत:ला बदलण्याच्या तयारीत आणि मन:स्थितीत नसेल तर सरकारलाच आता दखल घ्यावी लागेल.

भारतीय अर्थव्यवस्था अद्यापही कृषिप्रधान आणि कृषिवर आधारित आहे. भारतीय शेती अद्यापही पावसावरच अवलंबून आहे. नियोजनाच्या अभावी म्हणा किंवा इच्छाशक्तीच्या अभावी म्हणा सिंचनक्षेत्रात प्रभावी वाढ करणे आपल्याला जमलेले नाही. साहजिकच पाऊस झाला नाही, तर अर्थव्यवस्था कोलमडून जाते. पण त्याचे कोणतेही गांभीर्य हवामान खात्याला नसते, हे आतापर्यत अनेकवेळा सिद्ध झाले आहे. हवामान खात्याचे अंदाज चुकल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागते आणि मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागते.

सरकार याबाबत आपली जबाबदारी पार पाडते आणि शेतकऱ्यांना शक्‍य होईल ती सर्व मदत करते. पण हाताशी सर्व यंत्रणा असूनही अचूक पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात अपयशी ठरणाऱ्या हवामान खात्याचीही जबाबदारी आता निश्‍चित व्हायला हवी. शेतकऱ्यांसाठी लढणारे खासदार राजू शेट्टी यांनी केलेल्या मागणीप्रमाणे आता चुकीच्या अंदाजासाठी हवामान खात्यावरच गुन्हा दाखल करण्याची वेळ आली आहे. याबाबत आणखी एक उदाहरण लक्षात घेण्यासारखे आहे. ते म्हणजे ऑस्ट्रेलियातील सध्याचे भीषण दुष्काळाचे संकट. या संकटाबाबत तेथील हवामान खात्याने आधीच भाकित केल्याने सरकारी यंत्रणा आणि शेतकरीही आधीच दुष्काळाशी सामना करण्यास तयार होते. तेथील हवामान खात्याला जे जमते ते आपल्या हवामान खात्याला जमत नाही, हे दुर्दैव आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन जर हवामान खात्यावरच अवलंबून असेल, तर हे खाते नक्की करते काय या प्रश्‍नाचे उत्तर, त्यांना आता द्यावेच लागणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)