पाणी कपातीबाबत “वेट ऍण्ड वॉच’

आयुक्‍तांची माहिती : धरणाची परिस्थिती पाहून घेणार निर्णय 

पिंपरी – शहरातील पाणी कपात वाढविण्याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. पुढील दोन ते तीन दिवसांतील पवना धरण क्षेत्रातील पाण्याची परिस्थिती तपासून पुढील निर्णय घेतला जाईल, असे गुरुवारी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
यंदा उशिरा आणि खूपच धिम्या गतीने आलेल्या मॉन्सूनमुळे आणखी पाणी कपातीचे संकट शहरावर घोंघावत आहे. सध्या शहरात दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. अपेक्षेप्रमाणे पाऊस पडत नसल्याने आणि पवना धरणातील पाणीसाठा तळ गाठत असल्याने आणखी पाणी कपात होण्याची शक्‍यता व्यक्‍त करण्यात येत आहे. याच पार्श्‍वभूमीवर बोलताना आयुक्‍त हर्डीकर यांनी “वेट ऍण्ड वॉच’चा इशारा दिला.

पवना धरणात बुधवारी (दि. 26) धरणामध्ये 13.72 टक्के इतका पाणीसाठा होता. त्यामध्ये घट होऊन गुरुवारी 13.15 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. धरण क्षेत्रातील पाण्याची पातळी सध्या 599.57 मीटर इतकी आहे. एकूण पाणीसाठा 62.84 दशलक्ष घनमीटर इतका आहे. तर, 31.70 दशलक्ष घनमीटर इतका उपयुक्‍तपाणीसाठा आहे. धरण क्षेत्रात आत्तापर्यंत केवळ 98 मिमीच पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी 26 जून अखेर धरण क्षेत्रात 290 मिलीमीटर इतका पाऊस पडला होता. तर, 20 टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध होता.

यावर्षी मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत जवळपास आठ टक्‍के पाणीसाठा कमी आहे आणि त्यात मॉन्सूनचेही उशिरा आगमन झाले आहे. मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतरही पावसाने अपेक्षित जोर धरलेला नाही. अशीच स्थिती राहिल्यास पाणीसंकट अजून तीव्र होण्याची शक्‍यता आहे. गुरुवारचा पाणीसाठा पाहता हे पाणी जुलै मध्यापर्यंतच पुरु शकेल. या दरम्यान चांगला पाऊस होणे आवश्‍यक आहे. पालिकेतर्फे सध्या दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे. पावसाने देखील अद्याप अपेक्षित जोर धरलेला नाही. हीच स्थिती कायम राहिल्यास शहरवासियांना पाणी टंचाईचे संकट येऊ शकते. त्यावर उपाययोजनेचा भाग म्हणून आणखी पाणी कपात होऊ शकते. पवना धरणातील पाणीसाठ्याची परिस्थिती पाहूनच निर्णय घेणार असल्याचे आयुक्‍तांनी स्पष्ट केले आहे.

“”नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. जेणेकरून पाण्याची बचत होईल. तसेच, जादा पाणी कपात करावी लागणार नाही.”

– श्रावण हर्डीकर, आयुक्त

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)