वेस्ट इंडीजचा बांगला देशवर रोमांचकारी विजय

पहिला टी-20 क्रिकेट सामना : आंद्रे रसेलची अष्टपैलू कामगिरी

बॅसेटेरे: केसरिक विल्यम्सची कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी आणि आंद्रे रसेलच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर वेस्ट इंडीजने पहिल्या टी-20 क्रिकेट सामन्यात बांगला देश संघाचा सात गडी व 11 चेंडू राखून रोमांचकारी पराभव केला. या विजयामुळे वेस्ट इंडीजने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पावसाने व्यत्यय आणलेल्या या लढतीत नाणेफेक जिंकून बांगला देशला फलंदाजीसाठी पाचारण करण्याचा वेस्ट इंडीजचा निर्णय योग्य असल्याचे त्यांच्या गोलंदाजांनी सिद्ध केले. महमुदुल्लाह, लिट्टन दास व कर्णधार शकिब अल हसन यांनी सर्वतोपरी प्रयत्न करूनही विंडीजने बांगला देशचा डाव निर्धारित 20 षटकांत 9 बाद 143 धावांवर रोखला. त्यानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे पंचांनी वेस्ट इंडीजला 11 षटकांत 91 धावांचे सुधारित लक्ष्य दिले. विंडीजने 9.1 षटकांत 3 बाद 93 धावा फटकावून विजयाची पूर्तता केली.

विजयासाठी 11 षटकांत 91 धावांचे लक्ष्य पावसाळी हवामानात गाठणे सोपे नव्हते. त्यातच बांगला देशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिझुर रेहमानने डावातील दुसऱ्याच षटकांत एविन लुईस (2) व आंद्रे फ्लेचर (7) यांना बाद करीत विंडीजची 2 बाद 10 अशी घसरगुंडी घडवून आणली. परंतु तंदुरुस्तीबद्दल शंका असलेल्या आंद्रे रसेलने केवळ 21 चेंडूंत 3 चौकार व 3 षटकारांसह नाबाद 35 धावांची धडाकेबाज खेळी करताना मार्लन सॅम्युएल्सच्या साथीत 3.4 षटकांत 42 धावांची भागीदारी करून विंडीजचा डाव सावरला.

केवळ 13 चेंडूंत 2 चौकार व 2 षटकारांसह 26 धावांची खेळी करणाऱ्या सॅम्युएल्सला बाद करून रुबेल हुसेनने ही जोडी फोडली. परंतु रसेलने रोव्हमन पॉवेलच्या साथीत केवळ 3.3 षटकांत 41 धावांची झंझावाती भागीदारी करताना 11 चेंडू राखून विंडीजचा विजय साकार केला. पॉवेलने 9 चेंडूंत 2 षटकारांसह नाबाद 15 धावा फटकावताना रसेलला सुरेख साथ दिली. बांगला देशकडून मुस्तफिझुरने 18 धावांत 2, तर रुबेलने 13 धावांत 1 बळी घेतला.

त्याआधी केसरिक विल्यम्सने केवळ 28 धावांत 4 बळी घेताना बांगला देशला रोखले. कीमो पॉल व ऍश्‍ले नर्स यांनी प्रत्येकी दोन, तर रसेलने एक बळी घेत त्याला सुरेख साथ दिली. महमुदुल्लाहने 27 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकारांसह सर्वाधिक 35 धावा केल्या. लिट्टन दासने 24, तर कर्णधार शकिब अल हसनने 19 धावा करताना दिलेली झुंज पुरेशी नव्हती. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या रसेलला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

संक्षिप्त धावफलक-

बांगला देश- 20 षटकांत 9 बाद 143 (महमुदुल्लाह 35, लिट्टन दास 24, शकिब अल हसन 19, केसरिक विल्यम्स 28-4, कीमो पॉल 24-2, ऍश्‍ले नर्स 6-2, आंद्रे रसेल 27-1) पराभूत विरुद्ध वेस्ट इंडीज- 9.1 षटकांत 3 बाद 93 (आंद्रे रसेल नाबाद 35, रोव्हमन पॉवेल नाबाद 15, मार्लन सॅम्युएल्स 26, मुस्तफिझुर रेहमान 18-2, रुबेल हुसेन 13-1), सामनावीर- आंद्रे रसेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)