आर्चर व गेल आमने-सामने
साउदम्पटन: इंग्लंडने नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. ख्रिस वोक्सनं विंडीजच्या इव्हीन लुईसला माघारी पाठवून इंग्लंडला यश मिळवून दिले. विंडीजचा स्फोटक फलंदाज गेलचा मार्क वूडनं झेल सोडला. गेलचा झेल सोडणं इंग्लंडला महागात पडण्याची चिन्ह सध्यातरी दिसत आहे. मूळचा वेस्ट इंडिजचा असलेला जोफ्रा आर्चर हा त्याचा प्रतिस्पर्धी ख्रिस गेल याची फटकेबाजी कशी रोखून धरतो हे सामन्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे.
ओशाने थॉमस, आंद्रे रसेल, शेल्ड्रॉन कॉट्रेल, कर्णधार जेसन होल्डर यांनी या स्पर्धेत अतिशय प्रभावी मारा केला आहे. येथील खेळपट्टीचा उसळते चेंडू टाकण्यासाठी कसा कल्पकतेने उपयोग करावयाचा असतो याचा प्रत्यय वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी दाखवून दिला आहे. त्यांच्या या गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांची योग्य साथ लाभली आहे. फलंदाजीत त्यांची मुख्य मदार गेल, डॅरेन ब्राव्हो, निकोलस पूरन, फॅबिअन ऍलन व शाय होप यांच्यावर आहे. प्रथम फलंदाजी मिळाली तर किमान 350 धावा करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. इंग्लंडने आतापर्यंत दक्षिण आफ्रिका व बांगलादेश यांना पराभूत केले असले तरीही पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाच्या दु:खातून त्यांचे खेळाडू बाहेर आलेले नाहीत. बाद फेरीकडे वाटचाल करण्यासाठी त्यांना हा सामना महत्त्वाचा आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्यांच्या मधल्या व शेवटच्या फळीतील फलंदाजांनी निराशाजनक खेळ करीत पराभव ओढवून घेतला होता. त्याची पुनरावृत्ती टाळण्याबाबत ते प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे. फलंदाजीत त्यांना कर्णधार इऑन मॉर्गन, जेसन रॉय, जॉनी बेयरस्टो, जोस बटलर यांच्याकडून मोठ्या आशा आहेत. गोलंदाजीत मार्क वुड, बेन स्टोक्स, लियाम प्लंकेट्, आदिल रशीद यांच्यावर त्यांची भिस्त आहे.
भेदक गोलंदाजी हेच अस्त्र- होल्डर
आमच्या गोलंदाजांनी भेदक मारा करीत चांगले यश मिळविले आहे. आजही आमच्या विजयाचे तेच मुख्य अस्त्र राहणार आहे. आतापर्यंत आमची वाटचाल योग्य मार्गानेच झाली आहे. येथे आम्ही विजेतेपद मिळविण्यासाठी आलो आहोत. आमचे खेळाडू अतिशय आत्मविश्वासानेच खेळत आहेत, असे कर्णधार जेसन होल्डर याने सांगितले.
उसळत्या चेडूंचा भरपूर गृहपाठ-मॉर्गन
वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी उसळत्या चेडूंचा सातत्याने मारा करण्याचे तंत्र वापरले असले तरीही आम्ही त्यांना घाबरत नाही. आम्ही अशा गोलंदाजीवर कसे तुटून पडावयाचे याचा भरपूर गृहपाठ केला आहे. त्याचप्रमाणे गेल, ब्राव्हो, कार्लोस ब्रेथवेट आदी फलंदाजांना रोखून धरण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करणार आहोत, असे इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गन याने सांगितले.