भारत ‘अ’ संघाची विजयी मालिका झाली खंडित

वेस्ट इंडिज ‘अ’ संघाचा विजय

कुलीज (अँटिग्वा) – अक्षर पटेलने तडाखेबाज खेळ करूनही भारत “अ’ संघाची विजयी मालिका खंडित झाली. वेस्ट इंडिज “अ’ संघाने चौथ्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यात भारताला 5 धावांनी पराभूत केले. वेस्ट इंडिज “अ’ संघाने 50 षटकांत 9 बाद 298 धावा केल्या. या आव्हानास सामोरे जाताना 50 षटकांत 9 बाद 293 धावांपर्यंत मजल गाठली. पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने पहिले तीन सामने जिंकून विजयी आघाडी घेतली होती.

वेस्ट इंडिज “अ’ संघाकडून रोस्टन चेस (84), डेव्हॉन थॉमस (70), जोनाथन कार्टर (50) व कर्णधार सुनील ऍम्ब्रीस (46) यांनी चमकदार फलंदाजी केली. थॉमसने ऍम्ब्रीसच्या साथीत 73 धावांची भागीदारी केली. तसेच त्याने चेसच्या साथीत 81 धावांची भागीदारी रचली. तो बाद झाल्यानंतर चेसने खेळाची सूत्रे आपल्याकडे घेत संघास आश्‍वासक धावसंख्या रचण्यास मदत केली. त्याने कार्टरच्या साथीत 91 धावा जमविल्या. ही जोडी बाद झाल्यानंतर वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना रोखून धरण्यात भारतीय गोलंदाजांना यश मिळाले. अन्यथा वेस्ट इंडिजचा संघ 325 धावांपर्यंत पोहोचला असता.

विजयासाठी आवश्‍यक असणारा भक्कम पाया करण्यात भारताच्या पहिल्या फळीतील फलंदाजांना अपयश आले. ऋतुराज गायकवाड (20), अनमोलप्रीत सिंग (11), हनुमा विहारी (20) यांच्या पाठोपाठ कर्णधार मनीष पांडे (24) यानेही निराशा केली. कृणाल पांड्याने दमदार 45 धावा केल्या. तरीही भारताची 6 बाद 160 अशी स्थिती झाली होती. पटेलने वॉशिंग्टन सुंदर याच्या साथीत 60 धावांची भागीदारी केली. सुंदरने 3 चौकारांसह 45 धाबा केल्या. त्याच्या जागी आलेल्या खलीलच्या साथीत पटेलने आक्रमक खेळ करीत संघास विजय मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. त्यांनी 68 धावांची भागीदारी केली. चोरटी धाव काढण्याच्या प्रयत्नात खलील 15 धावांवर बाद झाला आणि भारताचा विजय हुकला. पटेलने 8 चौकार व 1 षटकारासह नाबाद 81 धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक –

वेस्ट इंडिज ‘अ’ संघ – 50 षटकांत 9 बाद 298 ( रोस्टन चेस 84, डेव्हॉन थॉमस 70, जोनाथन कार्टर 50, सुनील ऍम्ब्रीस 46, खलील अहमद 4-67, आवेश खान 2-62).

भारत ‘अ’ संघ- 50 षटकांत 9 बाद 293 (अक्षर पटेल नाबाद 81, वॉशिंग्टन सुंदर 45, कृणाल पांड्या 45, रोवमन पॉवेल 2-47, किमो पॉल 2-61)

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)