‘आयपीएल’मध्ये वेस्ट इंडियन प्लेयर्सचा बोलबाला!!

सध्या चालू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल मधील सर्वच सामने रंगतदार होत आहेत. जगभरातील नामांकित खेळाडू सहभागी असलेल्या या लीगमध्ये वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी पूर्वीपासूनच ठसा उमटवला आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही वेस्ट इंडियन प्लेयर्सचा बोलबाला आयपीएल मध्ये दिसून येत आहे. ख्रिस गेल, कायरन पोलार्ड, आंद्रे रसेल, अल्झारी जोसेफ, सुनील नारायण, ड्‌वेन ब्रावो या खेळाडूंनी दर्जेदार कामगिरी करून ही स्पर्धा गाजवली आहे.

ख्रिस गेलने नेहमीप्रमाणे स्वतःच्या खेळाची छाप आयपीएलवर सोडली आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही ख्रिस गेल अप्रतिम कामगिरी करीत त्याला मिळालेली युनिव्हर्सल बॉस ही उपाधी त्याने साध्य केली आहे. या स्पर्धेत ख्रिस गेलने खेळलेल्या 9 सामन्यात 421 धावा काढल्या आहेत. या 9 सामन्यात त्याने 31 गगनचुंबी षटकार व 36 चौकार मारले असून त्याचा स्ट्राईक रेट 160 इतका आहे. आयपीएलमध्ये 300 षटकार ठोकणारा ख्रिस गेल हा एकमेव खेळाडू आहे.

आंद्रे रसेल नामही काफी है! रसेल द मसेल याने आपल्या ताकदवान खेळीने ही स्पर्धा अक्षरशः गाजवून सोडली आहे. त्याने मारलेला फटका थेट प्रेक्षकांत पोहचत असतो त्याच्या गगनचुंबी षटकाराने प्रेक्षकांचे मनोरंजन होत असले तरी गोलंदाजांची मात्र दैना होत आहे. आपल्या फलंदाजीने त्याने केकेआरला अशक्‍यप्राय असे विजय मिळवून दिले आहेत. या स्पर्धेत सर्वाधिक षटकार त्याच्याच नावे असून त्याने 10 सामन्यात तब्बल 41 षटकार खेचत 392 धावा काढल्या आहेत. त्याचा या स्पर्धेतील तडाखेबंद खेळ पाहून केकेआरचा मालक शाहरुख खानने त्याला बाहुबली ही उपाधी दिली आहे. बाहुबलीच्या रूपातील त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला क्रिकेट रसिकांनी या फोटोला मनापासून दाद दिली आहे. फलंदाजी प्रमाणे गोलंदाजीतही रसेलने दमदार कामगिरी केली आहे. प्रतिस्पर्धी संघाची जमलेली जोडी फोडण्याची करामत त्याने अनेकदा केली आहे. तसेच त्याचे क्षेत्ररक्षण चांगले आहे. एकूणच त्याने आपल्या अष्टपैलू खेळाने या स्पर्धेत वेगळी छाप सोडली आहे.

मुंबई इंडियनकडून खेळणारा कायरन पोलार्ड हा देखील आपल्या ताकदवान खेळासाठी प्रसिद्ध आहे त्यानेही सहाव्या क्रमांकावर येत मॅच फिनिशर ही भूमिका चोख बजावली आहे दिल्ली कॅपिटल विरुद्धचा गमावलेला सामना मुंबई इंडियनने जिंकला तो केवळ पोलार्डच्या जबरदस्त खेळीने आपल्या ताकदवान खेळीने पोलार्डने हा सामना एकहाती जिंकून दिला तो या सामन्यात ज्याप्रकारे खेळला ते पाहून क्रिकेट रसिकांनी तोंडात बोटे घातली या मॅचमध्ये त्याने षटकारांचा धडकाच लावला होता त्याने एक अप्रतिम कॅचही पकडला आहे त्याचा तो कॅच या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट कॅच ठरला आहे.

फलंदाजी प्रमाणे गोलंदाजीतही वेस्ट इंडियन खेळाडूंनी छाप सोडली आहे. मुंबई इंडियनकडून खेळणारा अल्झारी जोसेफ या युवा गोलंदाजाने आपल्या पहिल्याच सामन्यात सर्वाधिक विकेट मिळवण्याचा विक्रम केला आहे. सनरायजर्स हैद्राबाद विरुद्ध अवघ्या 12 धावात त्याने सहा बळी मिळवले. त्याने पाकिस्तानच्या सोहेल तन्वीरचा विक्रम मोडीत काढीत मुंबई इंडियनला एकतर्फी विजय मिळवून दिला. सात्यत्याने 145 पेक्षाही अधिक वेगाने गोलंदाजी करणारा हा युवा गोलंदाज म्हणजे वेस्ट इंडिजचे भविष्य आहे. सुनील नारायण या केकेआर कडून खेळणाऱ्या मिस्ट्री ऑफस्पिनरने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही अनेक फलंदाजांना चकवले त्याच्या गोलंदाजीचा अंदाज भल्या भल्या फलंदाजांना येत नाही. मनगटाच्या जोरावर चेंडू वळवणारा हा वेस्ट इंडियन खेळाडू आयपीएलमध्ये नेहमीच चर्चेत राहतो तो केवळ गोलंदाजीच करीत नाही तर केकेआरसाठी सलामीला फलंदाजीस येतो. पॉवर प्लेमध्ये तो पॉवरफुल शॉट मारून आपल्या संघाला चांगली सुरुवात करून देतो.

ड्‌वेन ब्रावो या चेन्नई सुपर किंगच्या ऑल राउंड र खेळाडूने यावर्षीही आपल्या लौकिकास साजेसा खेळ केला आहे. बंगळुरूकडून यावर्षी आयपीएलमध्ये पदार्पण करणारा शिमरन हिटमायर हा एक धडाकेबाज फलंदाज म्हणून ओळखला जातो. वेस्ट इंडियन खेळाडू केवळ खेळातूनच नव्हे तर डान्स आणि गाण्यातूनही क्रिकेट रसिकांचे मनोरंजन करीत असतात विकेट मिळाल्यावर सेंच्युरी हाफ सेंच्युरी मारल्यावर कॅच पकडल्यावर मॅच जिंकून दिल्यावर हे खेळाडू मैदानातच ताल धरीत नाचतात त्यांचा हा डान्स क्रिकेट रसिकांमध्ये लोकप्रिय होतो क्रिकेट रसीकही त्यांना मनमुराद दाद देतात मैदानाबरोबरच मैदानाबाहेरही वेस्ट इंडियन खेळाडू लोकप्रिय आहेत आयपीएलच्या मैदानात असो की मैदानाबाहेर वेस्ट इंडियन प्लेयर्सचा बोलबाला दिसून येत आहे.

– श्‍याम बसप्पा ठाणेदार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)