स्वागत उन्हाळ्याचे

उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अंगाची लाही लाही होतेय. उन्हाच्या तीव्रतेमुळे चक्कर येणं, उलट्या होणं, ताप येणं तसंच नाकातून रक्तस्राव होणं आदी विकार डोकं वर काढतात. यापैकी नाकातून रक्तस्राव होण्याचा त्रास लहान मुलांप्रमाणे मोठ्यांनाही होतो. नाकातला रक्तस्राव होतो म्हणजे नेमकं काय होतं?

सर्वसाधारणपणे उन्हाळ्याची तीव्रता वाढली की काही जणांना नाकात रक्तस्राव होण्याचा त्रास होतो. यालाच घोळणा फुटणं असं म्हणतात. सामान्यत: 10-17 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये आणि 50-65 वर्ष वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये या आजाराचं प्रमाण अधिक आहे. उन्हाळ्यामध्ये नाकातील रक्तवाहिन्या प्रसरण पावल्यामुळे तेथील श्‍लेष्मल पदार्थ वितळून रक्तस्राव होतो. उन्हाळ्यातील कोरड्या हवेमुळे नाकाच्या अंतर्भागातील श्‍लेष्मल पदार्थ कोरडा व शुष्क बनतो.

नाकातील रक्तस्रावाचं प्रमाण हे रक्तदाबाच्या अचानक वाढीमुळे विशेषत: वयोवृद्ध रुग्णांमध्ये अधिक प्रमाणात आढळतं. त्यामुळे नाकातून सतत रक्तस्रव होत असल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत. तसेच ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, त्यांनी उच्च रक्तदाबरोधक औषधं नियमित सेवन केल्यास अशा प्रकारचा नाकातील रक्तस्राव थांबवता येऊ शकतो.

काय काळजी घ्यावी?
– कडक उन्हात वा कोरड्या हवेत बाहेर जाणं टाळावं.
– दिवसातून एकदा सौम्य पाण्याचा वाफारा घ्यावा.
– दीर्घकाळ चोंदलेलं नाक साफ करणारं औषध नाकामध्ये वारंवार टाकणं टाळावं. त्याऐवजी नाकाच्या अंतर्भागात सौम्य ओलसर वाफ घ्यावी किंवा नाक साफ करायची वैद्यकीय पिचकारी किंवा नळी यांचा वापर करावा.
– नाकाच्या अंतर्भागात कडक पापुद्रे तयार होऊ नयेत म्हणून वॅसलिन सारखं औषध वापरावं.
– तुम्हाला उन्हाळ्यात नाकाच्या रक्तस्रावाचा त्रास झाल्यास तत्काळ कान-नाक-घसा (ईएनटी) तज्ज्ञांची भेट घ्यावी. घरगुती प्राथमिक उपचार म्हणून रक्त थांबवण्यासाठी नाक दाबून ठेवणं, बर्फाचा शेक घेणं असं करता येऊ शकतं; परंतु या नंतरही नाकातील रक्तस्राव सतत होत राहिल्यास कान-नाक-घसा (ईएनटी) तज्ज्ञांकडून तातडीने प्रतिबंधात्मक उपाय योजावेत.
– उन्हाळा म्हटलं की सूर्याच्या प्रखर किरणांचे शरीरावर चांगलेच दुष्परिणाम जाणवतात. कडक उन्हामुळे त्वचेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तर केसांच्या समस्याही डोकं वर काढतात. या कडक उन्हाचा शरीरावर होणारा

दुष्परिणाम रोखण्याकरता काय उपाययोजना करता येतील?
काही खास सूचना –
त्वचेची काळजी
– उन्हामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. शरीरातील पाण्याचं प्रमाण संतुलित ठेवण्याकरता दररोज दीड ते दोन लिटर पाणी प्यायला हवं.
– उन्हाळ्यात जंकफूड खाणं टाळावं, यामुळेही त्वचेवर परिणाम होण्याची शक्‍यता असते.
– चहा व कॉफी पिणं टाळावं. ताक, लिंबू पाणी, नारळाचं पाणी पिणं उत्तम.
– सल, सुती कपड्यांचा वापर करावा.
– दिवसातून दोन वेळा चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवावा.
– थंड अथवा हलक्‍या गरम पाण्याने दिवसातून दोन वेळा अंघोळ करावी.
– त्वचेला तजेलदारपणा येण्याकरता बेसन, दही व लिंबू यांचं मिश्रण करून त्वचेला लावावं.
– डोळ्यांचं संरक्षण करण्याकरता गॉगल तसंच स्कार्फ, टोपी यांचा वापर करावा.
– नियमित पोषक व सकस आहार घ्यावा.
– उन्हाळ्यात सॅंडलचा वापर करणं उत्तम. त्यामुळे पाय झाकले जातात. त्वचा काळवंडत नाही.
– “सी’ व ‘डी’ जीवनसत्त्व असलेली फळं खावीत. (कलिंगड, टरबूज, जाम, काकडी इ.)
– पालेभाज्यांचं सूप प्यावं.
– टोमॅटो कुस्करून त्यात थोडं ताक घालून ते त्वचेवर चोळल्याने त्वचेला थंडावा मिळतो.
– काकडीचा रस, ग्लिसरीन आणि एक चमचा गुलाबपाणी घेऊन त्वचेवर लावल्याने त्वचा नरम पडते.
– काकडी, टोमॅटो आणि लिंबाचा रस समप्रमाणात एकत्र करून त्याचा लेप रापलेल्या त्वचेवर लावावा. सुकल्यावर ते धुऊन टाकावं.
– लोणी आणि पाणी मिसळून चांगलं फेटावं आणि ते रापलेल्या त्वचेवर लावावं. त्वचेची जळजळ कमी होते.
– कोणत्याही सनस्क्रीनवर एसपीएफ फॅक्‍टर दिलेला असतो. आपल्या त्वचेचा पोत ओळखून त्याप्रमाणे योग्य एसपीएफ असलेल्या सनस्क्रीनची निवड करावी.

केसांची काळजी
– आर्द्रतेचा स्तर किंवा खूप जास्त उष्णता केसांना नुकसान पोहोचवते. आर्द्रतेमुळे केस खेचले जातात. त्याचप्रमाणे ते कमजोर होतात. केसांना स्वस्थ ठेवण्यासाठी नियमित केस धुणं व चांगल्या प्रकारे सुकवणं गरजेचं असतं.
– केस मजबूत होण्यासाठी मोड आलेल्या कडधान्यांचा आहारात अधिक वापर करावा.
– उन्हात बाहेर पडण्यापूर्वी डोक्‍यावर स्कार्फ बांधावा.
– आठवड्यातून किमान दोन वेळा तरी केस धुवावेत.
– केस धुतल्यावर ते व्यवस्थित कोरडे करावेत.
– रोज रात्री झोपताना केसाच्या मुळापाशी थोडं तेल लावावं. स्वस्थ व नसगक केसांसाठी ऑलिव्ह ऑइल तेलाने मालिश करावी.
– नैसर्गिक ऍन्टीडॅंड्रफ शाम्पूचा वापर करावा. अधिक स्ट्रॉंग शाम्पूचा वापर करू नये.
– केसांवर हेअर ड्रायरचा वापर करणं टाळावं. वापर करावयाचाच असल्यास त्याला कोल्ड ब्लो मोडवर ठेवावं.
– केसांना कलर करणं, त्यांना कुरळे बनवणं, स्ट्रेट करणं, आयनग इत्यादींसारखे रासायनिक उपचार टाळावेत. अमोनिया व हायड्रोजन पॅरॉक्‍साइड असलेल्या केसांच्या रंगांपासून दूर राहावं. एखाद्या कारणासाठी केस कलर करावेच लागत असतील तर नैसर्गिक अमोनिया-फ्री हेअर कलरचा वापर करावा.
– केसांना नैसर्गिक कंडिशनर करण्यासाठी दह्याचा वापर करावा.

– श्रुती कुलकर्णी

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)