“एकच स्पीरीट, नो किरीट’ 

तर शिवसेना विरोधात निवडणूक लढविणार

मुंबई – लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची युती झाली तरी ईशान्य मुंबईतील उमेदवारांवरुन अद्याप तिढा कायम आहे. या मतदारसंघातील विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना विरोध करीत शिवसैनिकांनी “एकच स्पीरीट, नो किरीट’ हा नारा दिला असतानाच आता भाजपाने सोमय्या यांना तिकिट दिल्यास त्यांच्याविरोधात शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचा इशारा दिला आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपण उमेदवारी अर्ज भरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून किरीट सोमय्या यांची उमेदवारी अडचणीची ठरू लागली आहे. 2017 मधील मुंबई महानगरपालिका निवडणुकीदरम्यान किरीट सोमय्या यांच्याकडून शिवसेनेवर अनेकदा टक्केवारी घेण्यावरून टीका करण्यात आली होती. मुंबई महापालिकेत टक्केवारी घेतल्याशिवाय कोणतेही काम दिले जात आहे. वांद्रयांच्या साहेबांना टक्केवारी जाते, असा थेट आरोप मातोश्रीवर केल्याने किरीट सोमय्यांविरोधात शिवसैनिकांची तीव्र नाराजी आहे. त्यामुळे युती होऊनही भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी अद्यापही त्यांची उमदेवारी जाहिर केलेली नाही. सोमय्या यांच्या उमेदवारीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भाजपाकडून मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र शिवसेनेकडून अद्यापही ग्रीन सिग्नल दाखवलेला नाही. अशा परिस्थितीत किरीट सोमय्या यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेण्याचा प्रयत्नही केला. परंतु, त्यांना भेट नाकारण्यात आली.

मातोश्रीने भेट नाकरल्यानंतर आता शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांनीही सोमय्यांना आव्हान दिले आहे. भाजपाने जर सोमय्यांना उमेदवारी दिल्यास त्यांच्या विरोधात निवडणूक लढविणार असल्याचे जाहिर केले आहे. गेल्या चार वर्षात सोमय्या यांनी ईशान्य मुंबईत शिवसैनिकांचा छळ केला आहे. त्यामुळे आमचा विरोध भाजपला नाही तर सोमय्या यांना आहे. जर ईशान्य मुंबईतून सोमय्या यांना उमेदवारी दिली तर त्यांचा पराभव होईल, असा इशारा देतानाच भाजपने अन्य कोणालाही उमेदवारी दिली तर आम्ही त्या उमेदवाराला जिंवूैन आणू, असा विश्वासही व्यक्त केला. सोमय्या यांना उमेदवारी मिळालीच तर गुढीपाढव्याच्या मुहूर्तावर अपक्ष म्हणून उमेदारीचा अर्ज दाखल करु, असे सांगतानाच आमचा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास आहे. त्यामुळे सोमय्या यांना उमेदवारी मिळणार नाही, असा दावाही त्यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)