आम्ही कॉंग्रेस-राष्ट्रवादी विरोधातच लढणार : मुख्यमंत्री

मुंबई: अहमदनगर महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणूकीत पाठिंबा मिळावा यासाठी आम्ही राष्ट्रवादीकडे गेलो नव्हतो. तर राष्ट्रवादीने आम्हाला स्वत:हून पाठिंबा दिला आहे. असे असले तरी भाजपा भविष्यातील निवडणूका कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विरोधातच लढणार, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवला.
सह्याद्री अतिथीगृहात पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते.

अहमदनगर महानगरपालिकेतील महापौर व उपमहापौर निवडणूकीसंदर्भात पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले, अहमदनगर महापौर निवडणुकीत आम्ही शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. शिवसेनेकडून तसा प्रस्ताव येण्याची आम्ही शेवटपर्यंत वाट पाहिली. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्याशी संपर्क साधावा व प्रस्ताव द्यावा, असा निरोप आला. मात्र अखेरच्या क्षणापर्यंत शिवसेनेकडून याबाबतचा कोणताही प्रस्ताव आला नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवरील नेत्यांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र तेव्हा देखील जर शिवसेनेचा प्रस्ताव आला तर बिनशर्त पाठिंबा द्या, अन्यथा जे योग्य वाटेल ते करा, असेच स्थानिक नेत्यांना सांगण्यात आले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आम्ही पाठिंबा मागितला नाही. पाठिंबा राष्ट्रवादी कॉंग्रेसनेच दिला आहे. त्यामुळे याबाबत त्यांनाच विचारा असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. भविष्यातील निवडणुकांत देखील नगर पॅटर्न दिसणार काय या प्रश्नावर असे राजकीय गणित दिसण्याचे कारण नाही. पुढच्या निवडणुका शंभर टक्‍के कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विरोधातच लढविणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली.

राधाकृष्ण विखे-पाटील यांना नोटीस : मुंबईच्या विकास आराखडयाबाबत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ऐण विखे पाटील यांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत. त्यांनी जर डीपी कसा तयार होतो हे समजून घेतले असते तर असे आरोप केलेच नसते. त्यांनी या प्रकरणी आपली माफी मागावी अन्यथा मानहानीच्या दाव्याला सामोरे जावे अशी नोटीस त्यांना बजावली असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

भीमा-कोरेगाव येथे सुसज्ज बंदोबस्त : भीमा कोरेगाव येथे जनतेला स्तंभाचे दर्शन शांततेत घेता यावे यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात आली आहे. आधीपासून जे पाच नेते सभा घेतात त्यांच्या सभांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र जे कोणी कायदा व सुव्यवस्था, शांतता बिघडविण्याचा प्रयत्न करतील त्यांच्या सभांना परवानगी देण्यात येणार नसल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)