आम्ही दहशतवादाच्या विरोधात कठोर भूमिका घेतली- नरेंद्र मोदी

युपीएची भूमिका गुळमुळीत होती 

पिंपळगाव/ नंदुबार: दहशतवादाच्या विरोधात आम्ही कठोर भूमिका घेतली पण कॉंग्रेस प्रणित सरकारने या विषयी अगदीच गुळमुळीत भूमिका घेतली होती असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. आम्ही घेतलेल्या कठोर भूमिकेमुळेच देशात जम्मू काश्‍मीर वगळता अन्यत्र कोठेही दहशतवादी कारवाया होऊ शकल्या नाहींत असेही त्यांनी आज येथील प्रचार सभांमधून बोलताना सांगितले.

राफेलचे कंत्राट हिंदुस्तान एरोनॉटिक्‍स या सरकारी कंपनीला न देता खासगी कंपनीला दिल्याबद्दल कॉंग्रेसकडून सातत्याने टीका केली जात आहे. आज ज्या नाशिक जिल्ह्यात त्यांची सभा झाली त्या जिल्ह्यातच हिंदुस्थान एरोनॉटिक्‍स कंपनीचे एक युनिट आहे. त्या अनुषंगाने बोलताना मोदी म्हणाले की आमच्या सरकारने मेक ईन इंडिया या उपक्रमा अंतर्गत देशातील संरक्षण उत्पादन वाढवले आहे. नाशिक, दिंडोरी, आणि धुळे मतदार संघांतील भाजप युतीच्या उमेदवारांसाठी त्यांनी संयुक्त सभा घेतल्या. ते म्हणाले की देशातील 2014 पुर्वीची स्थिती आणि सध्याची स्थिती यात जमीन आस्मानाचा फरक आहे.

सन 2014 पुर्वी देशात मुंबई, पुणे, हैदराबाद, काशी, अयोध्या अशा ठिकाणी बॉंम्बस्फोट होत असत. त्यावेळी कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सरकारांनी काय केले असा सवाल त्यांनी केला. त्यांनी केवळ दुख:व्यक्‍त करणे निषेध सभा घेणे याखेरीज काहीही केले नाहीं. पाकिस्तान आमच्या देशात हे घडवत आहे असे जगाला सांगण्यासाठी ते अन्य देशांकडे रडत गेले. पण या देशाच्या चौकीदाराने दहशतवादाच्या संबंधातील सरकारच्या भूमिकेत बदल करून त्यांना चोख प्रत्युत्तरच देण्याचे काम केले आहे असे ते म्हणाले.

आपण कोठेही लपलो तरी मोदी आपल्याला शोधून काढले अशी भीती दहशतवाद्यांच्या मनात आम्ही निर्माण केली असे ते म्हणाले. मी जेव्हा घराणेशाही आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर बोलतो तेव्हा काहींना इलेक्‍ट्रीक शॉक बसतो अशी टिपण्णीही त्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)