पदकाविना परतण्याचे दुःख आम्हालाच माहीत – साक्षी मलिक 

नवी दिल्ली: प्रत्येक खेळाडू पदकाच्या अपेक्षेनेच खेळत असतो. त्याला प्रत्येक सामन्यात आपला सर्वोत्तम खेळ दाखवायचा असतो. कोणताही खेळाडू जाणूनबुजून पराभूत होत नसतो. तसेच पदकाविना परतण्याचे दुःख आम्हालाच माहीत आहे. त्यामुळे आमच्यावर टीका करणे अयोग्य आहे, असे भारताची कुस्तीगीर आणि ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती खेळाडू साक्षी मलिकने म्हटले आहे.
आशियाई स्पर्धांपुर्वी इस्तंबूल येथे सुरू असलेल्या स्पर्धेत बाद फेरीपूर्वीच स्पर्धेबाहेर फेकली गेल्याने साक्षीवर टीका होत असताना तिने केलेले हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे. आशियाईपूर्वी साक्षी मलिक, विनेश फोगाट, सुशील कुमार आणि बजरंग पुनिया यांना निवड चाचणीतून सूट मिळाली होती. त्यावर सध्या टीका होत असून सुशील आणि साक्षी हे दोघेही खेळाडू सध्या फॉर्ममध्ये नसल्यामुळे भारतीय कुस्ती संघाची डोकेदुखी वाढली आहे.
यावेळी साक्षी म्हणाली की, आम्ही जेव्हा जेव्हा सामना खेळावयास मैदानावर उतरतो तेव्हा तेव्हा आम्हाल पदक जिंकायचे असते आणि पदक जिंकता नाही आले तर त्याची निराशा काय असते हे आम्हालाच माहीत असते. कारण तुम्हाला तुमचे चाहते जेव्हा प्रश्‍न विचारतात, तेव्हा तुमच्याकडे निराशेशिवाय काहीच उत्तर नसते. त्यामुळे पदकाविना परतण्याच्या वेदना केवळ खेळाडूलाच माहीत असतात.
साक्षी म्हणाली की, गेल्या स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे कामगिरी झाली नसली, तरी त्यावेळी मी माझे संपूर्ण प्रयत्न केले होते. मात्र मला त्यात यश आले नाही. रिओ ऑलिम्पिकनंतर माझ्या खेळात भरपूर सुधारणा झाली असून खेळाडूंच्या आयुष्यात अशा प्रकारचे चढ-उतार सुरूच असतात. आम्ही आमच्या तयारीत कोणतीही कसर करत नाही. मात्र यश किंवा अपयश प्रत्येक वेळी आमच्या हातात नसते.
आगामी अशियाई स्पर्धेच्या दृष्टीने मी तयारी सुरू केली असून मी मला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त व्हायचे आहे. सध्या माझी कामगिरी सुधारण्यासाठी ध्यानधारणा आणि सकारात्मक विचार करण्यावर भर देत आहे. त्या दृष्टीने मी तयारी सुरू केली असून आगामी स्पर्धांमध्ये त्याचे चांगले परिणाम सर्वांना निश्‍चितच दिसून येतील याचा मला विश्‍वास आहे असे साक्षीने सांगितले.
इस्तंबूल येथील स्पर्धेतील तिच्या कामगिरीचे विश्‍लेषण करावयास सांगितले असता साक्षी म्हणाली की, काही वेळा खेळताना तुम्हाला तुमचे धोरण महत्त्वाचे असते तर काही वेळा तुमची खेळाची पद्धत महत्त्वाची असते. काही वेळा तुमचे काही प्रतिस्पर्धी हे ताकदवान असतात, तर काही प्रतिस्पर्धी हे तांत्रिकदृष्ट्या प्रबळ असतात. अशा प्रतिस्पर्ध्यांशी खेळताना तुम्हाला तुमच्या खेळाचा दजाज्ञ सुधारावी लागतोच, परंतु त्याबरोबरच तुम्हाला तुमच्या खेळात आवश्‍यक बदल करावे लागतात. सध्या मी माझ्या खेळात वेग आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असून लवकरच माझा खेळ पूर्वीपेक्षा निश्‍चितच सुधारलेला दिसेल.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)