भोपाळ – सर्वच राजकीय पक्षांमध्ये कमीअधिक प्रमाणात तृटी असतात. आम्ही अगदी परिपुर्ण आहोत असा आमचा दावा नाहीं पण केंद्रात आम्ही कॉंग्रेस पेक्षा चांगले सरकार चालवून दाखवले आहे असा दावा गृहमंत्री राजनाथसिंह यांनी केला आहे. ते सध्या मध्यप्रदेशात पक्षाच्या प्रचार दौऱ्यात आले आहेत त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेस पक्षाच्या विश्वासाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. देशात अच्छे दिन निर्माण झाले आहेत असा दावाही त्यांनी केला. पण लोक हा विषय नेमका कसा घेतात त्यावर त्याचे इम्प्रेशन अवलंबून आहे असे त्यांनी नमूद केले.
भारताची अर्थव्यवस्था ही जगात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था झाली आहे असे ते म्हणाले. मोदींच्या नेतृत्वामुळेच हे शक्य झाले अशी पुष्टीही त्यांनी जोडली. कोणताच राजकीय पक्ष परिपुर्ण नसतो. कमी अधिक प्रमाणात प्रत्येक पक्षात काही कमतरता असतातच पण तरीही भाजपने कॉंग्रेसच्या तुलनेत चांगले काम करून दाखवले आहे असे ते म्हणाले. राफेलचा विषय आता फेल झाला आहे असेही त्यांनी या विषयीच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. दसॉल्ट कंपनीच्या सीईओने केलेल्या खुलाशामुळे सर्व काही स्पष्ट झाले आहे असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले. अर्थव्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठीच नोटबंदीचा निर्णय घेतला गेल्याचे त्यांनी नमूद केले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा