वाझेघरमधील महिलांची पाणीशोधाची पायपीट संपली

इनरव्हील क्‍लब ऑफ निगडी प्राईडने बांधलेल्या विहिरीचे लोकार्पण

निगडी – वेल्हे तालुक्‍यातील वाझेघर पिंपरी येथील ग्रामस्थांचे पाण्यासाठी त्रेधातिरपीट होत होतील. गावातील महिला तीन किलोमीटर दूर असलेल्या नदीवरील विहिरीवर पाण्यासाठी जातात. भर उन्हात त्यांची पाण्यासाठी वणवण होते. गावकऱ्यांची ही समस्या सोडविण्यासाठी इनरव्हील क्‍लब ऑफ निगडी प्राईड आणि पूजा कास्टिंग प्रा. लि. यांच्या संयुक्‍त विद्यमाने गावात विहीर बांधण्यात आली. यामुळे गावकऱ्यांची पाण्याच्या शोधासाठी होणारी पायपीट कमी होणार आहे. या विहिरीचे नुकतेच गावकऱ्यांना लोकार्पण करण्यात आले.

तसेच वेल्हे तालुक्‍यातील खोपडेवाडी येथे पाण्याची टाकी बांधण्यात आली. वेल्हे येथील जमिनीचे सपाटीकरण करण्यात आले. या तीन अभिनव उपक्रमांमुळे वेल्हे तालुक्‍यात इनरव्हील क्‍लब ऑफ निगडी प्राईडच्या सामाजिक उपक्रमांचा आलेख उंचावला आहे. लोकार्पण सोहळ्यासाठी इनरव्हील क्‍लबच्या राष्ट्रीय अध्यक्षा स्मिता पिंगळे, जिल्हाध्यक्षा रेणू गुप्ता, माजी अध्यक्षा मुक्ती पानसे, इनरव्हील क्‍लब ऑफ निगडी प्राईडच्या अध्यक्षा ऍड. प्रतिभा जोशी दलाल, रो. अर्जुन दलाल, रो. विजय चौधरी, रो. गुरदीप भोगल, ज्ञान प्रबोधिनीचे विवेक गिरिधारी, सुनीता गायकवाड, सुनील जोरकर, अजित देशपांडे, पूजा कास्टिंगचे अनिल कुलकर्णी, जयश्री कुलकर्णी, सरपंच मारुती शिर्के, अंकुश मोरे आदी उपस्थित होते.

वेल्हे तालुक्‍यात दरवर्षी सुमारे तीन हजार मिलीमीटर पावसाची नोंद होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस होऊनही उन्हाळ्यात गावातील महिला दोन-तीन भांडी डोक्‍यावर घेऊन पाण्यासाठी पायपीट करताना दिसतात. पाण्याची साठवण मुबलक प्रमाणात झाल्यास महिलांना पाण्याच्या शोधात पायपीट करावी लागणार नाही. इनरव्हील क्‍लब ऑफ निगडी प्राईडने पूजा कास्टिंगच्या सहकार्याने वाझेघर पिंपरी येथे तीस फूट खोल आणि तीस फूट रुंद विहीर बांधली. विहीर प्रकल्पाचे नियोजन ज्ञान प्रबोधिनीने केले. ग्रामस्थांनी देखील या प्रकल्पासाठी त्यांचे योगदान दिले. प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात गावासाठी टॅंकर मागविण्याची वेळ येत असे. मात्र विहीर तयार झाल्याने हे गाव आता टॅंकरमुक्त होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)