“लोहगड’, “विसापूर’च्या पायथ्याशी “पाणीबाणी’

पाणी योजना बंद : टंचाईवर तोडगा काढा अन्यथा आंदोलन

लोणावळा – पवना धरणाच्या बाजूला असलेल्या लोहगड आणि विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या लोहगड, घेरेवाडी याठिकाणी भीषण पाणी टंचाईमुळे स्थानिक हैराण झालेले आहेत. त्यामुळे या पाणी टंचाईवर लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र वाहतुक सेना, पुणे जिल्ह्याच्या वतीनं देण्यात आला आहे.

लोहगड गावातील नागरिकांची पाण्याची अडचण म्हणजे “धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशा झाली आहे. लोहगड गावात सन 1985 मध्ये जागतिक बॅंकेच्या अर्थसहाय्याने नळाद्वारे पाणी सुरू करण्यात आले होते. सन 1999 पर्यंत ही नळ योजना सुरू देखील होती. मात्र त्यानंतर ही योजना आजपर्यंत बंद पडली आहे. पवना धरणामधून पाणी घेतले जाते, मात्र हे पाणी लोहगड परिसरातील मोठ-मोठ्या बंगल्यांना पुरवले जाते, असा आरोप करीत पुणे जिल्हा महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने पुढील 15 दिवसांत पाणी प्रश्‍नावर योग्य तो तोडगा निघाला नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.

महाराष्ट्र वाहतूक सेना पुणे जिल्हाध्यक्ष महेश केदारी यांच्या नेतृत्वाखाली व मावळ तालुका अध्यक्ष हुसेन शेख यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. 20) लोहगड येथे स्थानिक प्रश्‍नांचा आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत सरपंच नागेश मरगळे, ग्रामसेवक बी. एस. भोईर, पोलीस पाटील सचिन भोर्डे यांना निवेदन देऊन येथील पाणी प्रश्‍नावर त्वरीत उपाययोजना करण्यात यावी, यासंबंधीचे पत्र देण्यात आले. या वेळी गावातील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)