संत तुकारामनगर परिसरात पाण्याची बोंब

आठवडाभरापासून तीव्र टंचाई ः पिण्याच्या हंडाभर पाण्यासाठी हाल

पिंपरी  – आठवड्यातून एक दिवस पाणी कपात असूनही महापालिकेने दररोजच्या पाणी पुरवठ्याच्या वेळेत कपात केल्याने संत तुकारामनगरवासियांना मागील आठवडाभरापासून तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. महात्मा फुलेनगर, नेहरुनगर परिसरातील महिलांना पिण्याच्या हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. संत तुकारामनगर हा शहरातील मध्यवर्ती भाग आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएमएच), डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच अभियांत्रिकी महाविद्यालय याच भागात आहे. नोकरदार वर्गासह विद्यार्थ्यांची संख्या या भागात मोठ्या प्रमाणावर आहे. हॉटेल्स, कॅन्टीन यांचीही संख्या मोठी आहे. दाट वस्तीच्या या भागात इतर वेळीही पाणी पुरवठा अपुरा पडतो.

महापालिकेने 1 मार्च 2019 पासून पाणी कपात सुरु केली आहे. त्यानुसार संत तुकारामनगर, नेहरुनगर, मासुळकर कॉलनी, अजमेरा आदी भागात आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा बंद ठेवला जातो. नागरिक आवश्‍यक पाण्याचा साठा करण्याचा प्रयत्न करतात. परंतु, पाणी कपातीनंतरच्या दुसऱ्या दिवशीही विस्कळीत स्वरुपाचा पाणी पुरवठा होत आहे.
उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. त्यात अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांचे हाल झाले आहेत. महापालिकेकडून आठवड्यातून एकदा पाणी कपात केली जात असतानाही इतर दिवशी पुरेसा पाणी पुरवठा केला जात नाही. महापालिकेने पाणी पुरवठ्याच्या वेळेत अघोषितपणे कपात केली आहे. त्यामुळे पाणी टंचाई तीव्र झाल्याचा आरोप येथील रहिवासी करीत आहेत.

नळाला मोटारी जोडणाऱ्यांवर कारवाई कधी?

वरच्या मजल्यावर पाणी पोहचत नसल्याने संत तुकारामनगर, महेशनगर, मासुळकर कॉलनी आदी भागात विद्युत मोटारींचा सर्रास वापर होत आहे. नळाला मोटार जोडून अधिकचे पाणी खेचण्याचे प्रकार सुरू आहेत. या भागातील हॉटेल्स, खानावळी हे सर्रास विद्युत मोटारीचा वापर करतात. त्यामुळे शेजारच्यांपर्यंत पाणी पोहचत नाही. पाण्याचा अतिरिक्त साठा करुन कित्येक नागरिक पिण्याव्यतीरिक्त पाण्यासाठीही पिण्याचेच पाणी वापरत आहेत. त्यामुळे काहींना पिण्याचे पाणी देखील मिळत नाही. महापालिकेने भरारी पथक नेमून नळाला थेट मोटारी जोडणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)