साताऱ्यात पाणीपुरवठा सभापतींना धक्‍काबुक्‍की

सातारा – नळकनेक्‍शनला जोडलेली मोटर काढण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ करण्यात आली. दरम्यान, शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी आनंदराव सोनकर (भूतेबोळ, 579 शनिवार पेठ) याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाण्याचा दुरुपयोग टाळण्यासाठी नळाला मोटारी लावणाऱ्यांवर कारवाई करण्याचा बडगा पाणीपुरवठा विभागाने उगारला आहे. गुरुवारी सकाळी नगराध्यक्षा माधवी कदम, सभापती श्रीकांत आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली पाणीपुरवठा विभागाच्या पथकाने शहरात ठिकठिकाणी धडक मोहीम राबवली. पाण्याचा दुरुपयोग करणाऱ्या नागरिकांना जागेवरच कारवाईची नोटीस बजावण्यात आली.

दरम्यान, शनिवार पेठेतील भूतेबोळ येथे राहणाऱ्या आनंदराव सोनकर यांनी नळकनेक्‍शनला मोटार लावल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. ही मोटार तत्काळ काढून टाका अन्यथा जप्त केली जाईल, असा इशारा सभापती आंबेकर यांनी दिला. या प्रकारानंतर सोनकर यांनी चिडून जाऊन आंबेकर यांना शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच त्यांच्या अंगावर धावून आल्याचे फिर्यादित नमूद केले आहे. आंबेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आनंदराव सोनकर याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत. नगराध्यक्ष माधवी कदम पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, पाणीपुरवठा अभियंता दिग्विजय गाढवे, लिपिक नंदु कांबळे यांच्या पथकाने शाहू चौक, केसरकर पेठ, देवी कॉलनी, समर्थ मंदिर चौक, धस कॉलनी तसेच बोगदा परिसरातील नागरिकांना प्रत्यक्ष भेटून पाणी बचतीचे आवाहन केले.

तसेच जेथे नळांना तोट्या नाहीत व विद्युत मोटारीद्वारे पाणी खेचण्याचे प्रकार झाले अशा 19 जणांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. असे असताना मोटार का लावली ? असा प्रश्‍न आंबेकरांनी विचारताच नगरपरिषदेला कोण विचारतो ? मोटार थेट नळालाच लावणार अशी अर्वाच्च व उर्मट भाषा आनंदराव सोनकर याने वापरत आंबेकर यांना शिवीगाळ केली. त्याच्यावर शासकिय कामात अडथळा आणल्याची तक्रार शाहूपुरी पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)