पिंपरी: पवना धरणात जेमतेम 27 दिवसांचा पाणीसाठा

पाण्याची पातळी १५ टक्क्यांवर : मॉन्सूनकडे सर्वांच्या नजरा

पिंपरी – पवना धरणात आजपर्यंतचा सर्वात कमी म्हणजेच 15.68 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. 15 जुलै पर्यंत पुरेल एवढा हा पाणीसाठा असून मान्सून लांबणीवर पडल्यास किंवा पुरेसा पाऊस न झाल्यास मावळसह पिंपरी-चिंचवडकरांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. लांबलेले मॉन्सूनचे आगमन आणि सध्याचा शिल्लक पाणीसाठा पाहता पाणी कपात आणखी काही दिवस सुरूच राहण्याची शक्‍यता आहे. यापूर्वी जुलै अखेरपर्यंत पुरेल एवढे पाणी असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु आता 15 जुलै पर्यंत पुरेल एवढेच पाणी शिल्लक असल्याचे सांगण्यात येत आहे.

मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळ परिसरातील भागाला पाणीपुरवठा केला जातो. 26 फेब्रुवारीला धरणात 50 टक्के पाणीसाठा होता. हा पाणीसाठा चार महिने पुरेल, अशी माहिती त्यावेळी जलसंपदा विभागाने दिली होती. परंतु मध्यतंरीच्या काळात महापालिकेने दिवसाआड पाणी कपातीचा निर्णय घेत पाणी पुरवले आहे. धरणाची पाणी क्षमता 10 हजार दशलक्ष घनमीटर आहे. जलसंपदा विभागाच्या सूचनांवरुन महापालिका प्रशासनाने आतापर्यंत दिवसातून एकवेळ आणि आता दिवसाआड पाणीपुरवठा केला आहे. याशिवाय मावळातील ग्रामपंचायती तसेच तळेगाव व भोसरी एमआयडीसीतदेखील या धरणातूनच पाणीपुरवठा केला जातो.

दरम्यान, यंदा मॉन्सूनपूर्व पावसाने जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात दोनदाच हजेरी लावली. वायू चक्रीवादळामुळे मॉन्सूनचा वेग मंदावला आहे. त्यामुळे मॉन्सून राज्यात दाखल व्हायला जूनचा शेवटचा आठवडा उजाडणार आहे. याशिवाय “अल निनो’चादेखील मॉन्सूनवर परिणाम होण्याची भीती व्यक्‍त केली जात आहे. त्यामुळे पुरेसा पाऊस न पडल्यास पाणी कपातीचे संकट कायम राहू शकते. महापालिकेने सुरवातीला आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा बंद केला होते. त्यानंतर पाणी समस्या तीव्र होण्याची शक्‍यता पाहता दिवसाआड पाणी कपात सुरू करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने पाणी कपात करण्याचे धोरण महापालिका प्रशासनाने अवलंबले आहे. गेल्या पंधरा दिवसांत केवळ 92 मिमी पाऊस धरण क्षेत्रात पडला आहे.

आजमितीला पवना धरणात 15.68 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. 15 जुलै पर्यंत पुरेल एवढा हा पाणीसाठा आहे. धरण क्षेत्रात 92 मि.मी. पाऊस पडला आहे. सूर्यप्रकाश कमी झाला आहे. वातावरण ढगाळ आहे. त्यामुळे बाष्पीभवन कमी झाले आहे.

– ए.एम. गडवाल, शाखा अभियंता,पवना धरण  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)