पुणे महापालिकेतच पाणी टंचाई; जिवंत झऱ्याचे पाणी गटारात

पाणी उपयोगात आणण्याबाबत उदासीनता

पुणे – महापालिका भवनातच पाणीटंचाई निर्माण झाली असून, दोन इमारतीच्या डोलाऱ्यामुळे वापरण्याचे पाणीच पुरत नसल्याचा प्रकार घडत आहे. असे असूनही महापालिकेच्या विस्तारित इमारतीत लागलेल्या पाण्याच्या झऱ्याचा महापालिकेच्या इमारतीत वापरण्यासाठी उपयोग केला जात नाही. त्यामुळे मुबलक पाणी उपलब्ध असताना टॅंकरवर अवलंबून राहण्याची वेळ पालिकेवर आली असून “नाव सोनुबाई; हाती कथलाचा वाळा’ या म्हणीचा प्रत्यय येत आहे.

महापालिकेच्या विस्तारित इमारतीच्या बांधकामावेळी तेथे सुमारे 4 इंच व्यासाचा झरा लागला आहे. त्या पाण्याचा उपयोग महापालिकेने स्वत:च्या इमारतीतील शौचालये किंवा अन्य वापरासाठी करणे अपेक्षित होते. परंतु, “आम्हाला एवढे पाणी लागत नाही,’ असे कारण पुढे करून याविषयीची कोणतीच उपाययोजना करण्यात आली नाही.

बांधकाम सुरू असल्यापासून हे पाणी अक्षरश: ड्रेनेजमध्ये सोडले जाते. त्यामुळे या पाण्याचा वापर करण्याच्या दृष्टीने येथे टॅंकर भरणा करण्याची कल्पना पुढे आली. मात्र, प्रत्यक्षात महापालिकेत कामासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या, शहरातील प्रमुख बसस्थानक, वाहनांची आणि नागरिकांची वर्दळ, बसची जा-ये या सगळ्यांचा विचार करता येथे टॅंकर पॉईंट करणे पाणीपुरवठा विभागालाही शक्‍य नाही. त्यामुळे त्यातील सुवर्णमध्य काढताना महापालिकेने नदीपात्रालगत असा पॉईंट देता येईल, का याचा विचार केला आहे. मात्र हे कितपत शक्‍य होणार याची पडताळणी सुरू आहे.

दरम्यान, महापालिका भवनाचा विस्तार वाढला आहे. त्या तुलनेत पाण्याची मागणीही वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून पाणी अपुरे पडत आहे. असे असतानाही या झऱ्याचे पाणी संपूर्ण इमारतीमध्ये फिरवण्याची शक्कल महापालिका प्रशासनाने लढवली नाही. त्यावेळी ही बाब निदर्शनाला आणून देण्यात आली. मात्र, “या झऱ्यातून रोज लाखो लिटर पाणी येते, एवढे पाणी महापालिका भवनात वापरण्यासाठी लागत नाही. केवळ 10 हजार लिटर पाणी पुरते’ असे सांगत ही सोय करण्याला नकार देण्यात आला.

परंतु भविष्यात वाढणारी गर्दी लक्षात घेता ही सोय करणे आवश्‍यक असताना प्रशासनाने तसा विचार केला नाही. एवढेच नव्हे, तर ज्या दिवशी शहराचा पाणीपुरवठा बंद असतो, त्यावेळीही महापालिका भवनात पाणी कमी पडते. अशावेळीही या पाण्याचा वापर करता येणे शक्‍य होते. मात्र, त्याचाही विचार केला गेला नाही.

रोज सुमारे 25-30 टॅंकर भरतील एवढे पाणी झऱ्यातून उपलब्ध होते. मात्र, महापालिका भवनात टॅंकरसाठी पॉईंट देणे शक्‍य नाही. त्यामुळे नदीपात्रालगत पॉईंट देण्याची सोय करता येते का, याचा विचार सुरू आहे.
– प्रवीण गेडाम, पाणीपुरवठा अभियंता, मनपा.


महापालिका भवनात एवढ्या पाण्याची आवश्‍यकता नाही. त्यामुळे आम्ही पाणीपुरवठा विभागाला टॅंकर पॉईंटसाठी सोय करण्याविषयी सांगितले आहे.
– शिवाजी लंके, कार्यकारी अभियंता, भवनरचना विभाग, मनपा.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)