अंब्रुळकरवाडीत चार महिन्यापासून पाणी टंचाई

दोन दिवसांनी येतय पाणी; पाण्यासाठी भटकंती
अमोल चव्हाण

ढेबेवाडी – ढेबेवाडीपासून 5 किलोमीटवरील डोंगरावर वसलेल्या अंब्रुळकरवाडी, ता. पाटण या गावास गेल्या चार महिन्यांपासून तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या गावाची लोकसंख्या सुमारे 530 इतकी असून येथील नागरिकांना गेल्या चार महिन्यांपासून पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. येथे दर दोन दिवसांनी प्रत्येकाला फक्‍त 2 ते 3 घागरी पाणी मिळते. तेवढ्याच पाण्यात त्यांना गुजारा करावा लागत आहे. हे गाव उंच डोंगरावर असल्याने याठिकाणी पाण्याचे कोणतेही स्रोत नाहीत. त्यामुळे येथील जनतेला पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

यावर्षी कडक उन्हाळा पडल्यामुळे डोंगरावरील पाण्याची पातळी कमी झाली आहे. गावामधील सर्व पाण्याचे स्रोत आटले असून पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. गावामध्ये आडव्या पाटाचे पाणी पाईपलाईनद्वारे गावामध्ये आणून एका टाकीमध्ये जमा करुन गावाला पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु हे पाणी डिसेंबर महिन्यामध्ये दरवर्षी संपते. गावामध्ये बोअरवेल, आड, विहीर आहेत. परंतु त्याचे पाणी चार दिवसांमधून पिण्यासाठी 2 हंडे फक्त मिळतात. पण या पाण्यापासून पिण्याचा प्रश्न कसा तरी भागवला जातो. परंतु जनावरांसाठी वा इतर खर्चासाठी तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

गावामध्ये दोन बोअरवेल आहेत. त्याचेही पाणी खोलवर असल्याने तेही मिळत नाही. पाणीपातळी कमी झाल्याने हातपंप चालत नाहीत. आमचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कसाबसा भागतो. परंतु जनावरांना पिण्यासाठी पाणी व खर्चासाठी पाणी मिळत नाही. तरी संबंधित विभागाने गावासाठी पाण्याचे टॅंकर चालू करावेत, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

पाण्यासाठी आम्हाला खूप पायपीट करावी लागत आहे. चार दिवसांतून चार हंडे पाणी मिळते. परंतु जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने जनावरे सोडून द्यायची वेळ आली आहे.
मंगल बाबूराव कोळेकर ,गृहिणी.

गावाची लोकसंख्या 530 असून गाई-म्हशी 150, शेळ्या 30, कोंबड्या 500 आहेत. ग्रामपंचायतीमार्फत डिसेंबर महिन्यांमध्येच गावास पाण्याचा टॅंकर मिळावा, यासाठी निवेदन दिले असून मार्चअखेर कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. पाण्यासाठी लोकांना पायपीट करावी लागत आहे. संबंधित यंत्रणा याकडे कधी लक्ष देणार?
तानाजी आंब्रूळकर ,ग्रामपंचायत सदस्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)