सातारा जिल्ह्यात पाणी टंचाईचे भीषण संकट

सम्राट गायकवाड

पिण्याच्या पाण्याला प्राधान्य : ना. शिवतारे
जिल्ह्यातील सर्वच धरणांमधील पाण्याचे नियोजन आराखडा अधिकाऱ्यांना दिला आहे. धरणांमधील पाणी प्राधान्याने पिण्यासाठी दिले गेले पाहिजे, अशा सूचना केल्या आहेत, अशी माहिती पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिली. त्याचबरोबर कोयना धरणातून कर्नाटकने पाणी सोडण्याची मागणी केल्याबाबत ना. शिवतारे म्हणाले, कर्नाटकचे मुख्यमंत्री हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी बोलले आहेत. माझ्यापर्यंत अद्याप तो विषय आलेला नाही. मात्र, लवादाच्या निर्णयानुसार महाराष्ट्राने कर्नाटकसाठी पाणी सोडावे, असे कोणतेही बंधन महाराष्ट्रावर नाही, असे देखील ना. शिवतारे यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर येत्या 17 किंवा 18 तारखेला सातारा जिल्ह्याचा टंचाई व खरीप हंगामाचा आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सातारा -जिल्ह्याच्या पूर्वेला भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली असताना आता पश्‍चिमेकडील धरणांमधील पाणी साठ्यामध्ये कमालीची घट झाली आहे. परिणामी संपूर्ण जिल्ह्यावरच पाणी-बाणीचे संकट निर्माण होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. पार्श्‍वभूमीवर पावसाळा सुरू होईपर्यंत शिल्लक पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज निर्माण झालेली आहे.

सातारा सर्वाधिक धरणांचा जिल्हा अशी ओळख देशभरात आहे. मात्र, यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्याची पातळी कमालीची घटली आहे. कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता 105 टीएमसी इतकी आहे. मात्र, सध्या धरणात 31 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. यापैकी चार टिएमसी पाणी कर्नाटकला सोडण्याची मागणी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे. तर धोम धरणाची पाणी साठवण क्षमता 13.50 टीएमसी इतकी आहे. सध्या या धरणात केवळ 1.30 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. बलकवडी धरणाची पाणीसाठवण क्षमता 4.08 टीएमसी इतकी असून त्यामध्ये सध्या केवळ 0.43 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.

कण्हेर धरणाची पाणीसाठवण क्षमता 10.10 टीएमसी इतकी आहे. परंतु त्या धरणात सध्या केवळ 2.60 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. उरमोडी धरणाची पाणीसाठवण क्षमता 9.80 टीएमसी इतकी आहे. मात्र, सध्या या धरणात केवळ 1.52 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. तर तारळी धरणाची पाणीसाठवण क्षमता 5.85 टीएमसी इतकी आहे. या धरणात मात्र, समाधानकारक असा 2 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. दरम्यान, धरणांमधून जिल्ह्याच्या पूर्वेला करावा लागणारा पाणीपुरवठा आणि वाढत्या तापमानामुळे होणारे बाष्पीभवन आदी.कारणांमुळे पाणीसाठ्याची पातळी खाली आली आहे. अशा स्थितीत मे महिन्याचा मध्यावर जिल्ह्यातील सर्वच धरणांमधील घटलेली पाणी पातळीचे चित्र चिंता निर्माण करणारे आहे. त्यातच यंदाच्या पावसाला कधी सुरुवात होईल, याचा ठोस अंदाज कोणताही तज्ञ व भविष्यकार वर्तवू शकत नाही. त्यामुळे सध्या पाणीसाठ्याचा योग्य आणि काटकसरीने वापर करण्याची गरज आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)