साताऱ्यात पाणी टंचाई आणि बहिष्काराची धमकी

सातारा – साताऱ्यात विरोधातील भावकीचे राजकारण रंगायला सुरवात झालेली असताना खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी राजेंच्या अडचणी वाढवायला सुरवात केली आहे. उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी समर्थ मंदिर परिसरातील पाणी टंचाईच्या प्रश्‍नावर परिसरातील महिलांना दुरूत्तरे केल्याची घटना समोर आली असून संतापलेल्या नागरिकांनी थेट लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली आहे.

या घटनेचा बोभाटा झाल्याने राजे समर्थकांना सारवासारव करण्याची पंचायत झाली आहे . दिल्लीस्वारीची हॅटट्रिक करण्याच्या तयारीत खासदार उदयनराजे भोसले यांनी थोरल्या पवारांच्या साक्षीने राजकीय दंड थोपटले आहेत . मात्र राजेंच्या विरोधात भावकीचा पलिता धडाडून पेटला असून उदयनराजेंना होमग्राउंडवर डोकेदुखी वाढली आहे. त्यातच साताऱ्यात कोणताही राजकीय वाद नको असे राजेंचे स्पष्ट आदेश असताना तो वाद अंगावर ओढवून जनता जनार्दनाचा रोष पत्करण्याची खुमखुमी काही जणांना आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

समर्थ मंदिर परिसर म्हणजे उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांचा वॉर्ड.तेथेच वादाची भांडी वाजू लागल्याने शहरात पाणीटंचाई बरोबर राजकीय तापही वाढू लागला आहे. उन्हाच्या वाढत्या झळांनी कासचा पाणी साठा आटल्याने शहराची घंटेवारी कोलमडली आहे, तशातच समर्थ मंदिर परिसरात गेल्या दहा दिवसापासून तीव्र पाणी टंचाई होऊ लागल्याने काही महिलां व नागरिकांनी उपनगराध्यक्षांची थेट त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. उपनगराध्यक्षांचा पारा सातवे आसमॉंन पर गेल्याने त्यांनी ठेवणीतले उपदेश सुनवायला सुरवात केली.

मी फकत पिण्याच्या पाण्याची सोय करू शकतो वापरण्याच्या पाण्याचं तुमचं तुम्ही बघा. घराबाहेर दोन पातेली किंवा भांडी ठेवा नाही तर हौद बांधा आणि तुमच्या पाण्याच्या तक्रारी इथे सांगायच्या नाहीत तिकडे नगरपालिकेत यायचे, अशा उपनगराध्यक्षांच्या दुरुत्तरामुळे महिला व नागरिक संतप्त झाले. तुम्ही आमच्या वॉर्डचे नगरसेवक आहात म्हणून तुमच्याकडे समस्या मांडली यात आमचे काय चुकले? आम्ही उदयनराजेंकडे बघून तुम्हाला मतदान केले आहे आता काय अडचण असेल ते महाराजांशीच बोलू असा तीव्र संताप नागरिकांनी व्यक्त करत उपनगराध्यक्षांशी हुज्जत घातली. झाल्या प्रकाराबाबत पीडित महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

सातारा लोकसभेसाठी भयंकर काटामारी सुरू झालेली असताना जनता जनार्दनाला नडवणाऱ्या कार्यकर्त्यांविषयी प्रचंड रोष निर्माण झाला आहे. नागरिकांनी लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्काराचा पवित्रा घेतल्याने साताऱ्याच्या पाणीटंचाईची राजकीय संवेदनशीलता वाढली आहे. उपनगराध्यक्षांच्या या गुर्मीचा अनुभव आजचा नाही. स्थायी समितीच्या रेकॉर्डरूममध्ये घुसखोरी करणाऱ्या राजेशिर्के यांनी महिला कर्मचाऱ्याला अशीच दुरुत्तरे केली होती. ज्यांना नगराध्यक्षांच्या प्रथम नागरिकतेचा मान ठेवता येत नाही ते सामान्यांचे काय प्रश्‍न सोडवणार असा जळजळीत सवाल सातारकरांनी उदयनराजे यांना केला आहे. मात्र साताऱ्यात असे काहीच घडले नाही असे सांगत उपनगराध्यक्षांनी कानावर हात ठेवले आहेत.

उदयनराजेंकडे तक्रार होणार

समर्थ मंदिर परिसराची घंटेवारीच मुळात प्रचंड वादातीत आहे. समर्थ मंदिर परिसर ते धस कॉलनी व मंगळवार पेठेतून ते थेट सोनीच्या गिरणीपर्यंतच्या भागात पाण्याची सध्या प्रचंड ओरड आहे. या भागात आता केवळ पंधराच मिनिटे पाणी येते ही मूळ ओरड आहे. त्यासाठीच नागरिकांनी सुहास राजेशिर्के यांची मदत मागितली. मात्र उपनगराध्यक्षांनी त्यांना राजकीय हेका दाखवल्याने नागरिकांनी थेट जल मंदिरवर जाऊन उदयनराजेंकडे तक्रार करण्याचा पवित्रा घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)