बलकवडी धरणात पाण्याचा खडखडाट

धनंजय घोडके

वाई  – खंडाळा, फलटण तालुक्‍याचे तारणहार असणाऱ्या बलकवडी धरणात 15 टक्‍के पाणीसाठा असून धरणात पाण्याचा खडखडाट झाला आहे. आता फक्त मृतपाण्याचा साठा शिल्लक आहे. त्यामुळे अतिवृष्टी असणाऱ्या वाईच्या पश्‍चिम भागात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण होऊन धरण परिसरात पाण्याची भीषणता ऐन मे महिन्यात जाणवणार आहे. याकडे बलकवडी पाटबंधारे खात्याचे दुर्लक्ष झाल्याने खात्याच्या कारभाराबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित खात्याच्या भोंगळ कारभारामुळे अतिवृष्टी असणाऱ्या भागातही पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

बलकवडी धरणात पुरेसा पाणी साठा नसल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. परंतु, धरणावर असणारा खासगी वीज प्रकल्प मृत पाण्यावर व्यवस्थितपणे सुरू आहे. स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवून दुसऱ्याचे संसार फुलविणाऱ्या लोकांच्या नशिबी नेहमी उपेक्षाच येते, हेच यातून दिसून येते.

एक धरणग्रस्त (वाई पश्‍चिम भाग) बलकवडी धरण चार टी.एम.सी.चे धरण आहे. वाई, खंडाळा, फलटण या दुष्काळग्रस्त भागांसाठी धरणाची उभारणी करण्यात आली आहे. सध्या संपूर्ण राज्याला पाणीटंचाईच्या झळा बसत असून पाणी टंचाईमुळे अख्खा महाराष्ट्र होरपळून निघण्यासारखी परिस्थिती आहे. बलकवडी धरण अतिवृष्टीच्या परिसरात येत असले तरी यावर्षी सरासरीच्या प्रमाणात चांगले पर्जन्यमान झाल्याने हे धरण पूर्ण क्षमतेने भरलेले होते.

फलटण तालुक्‍यात प्रमाणापेक्षा जास्त पाणी सोडल्याने धरण सध्या पूर्ण रिकामे होवून या भागात ऐन उन्हाळ्यात काही किलोमीटर वरून पाणी आणावे लागणार आहे. बलकवडी धरण लवकरच खाली झाल्याने या धरणावर अवलंबून असणाऱ्या पाण्याच्या स्कीम, शेतीच्या पाण्याच्या योजनांचे भवितव्य धोक्‍यात आले आहे. धरणाच्या उभारणीत ज्यांनी त्यागाची भूमिका निभावली त्या लोकांच्या नशिबीच पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे.

बलकवडी पाटबंधारे खात्याच्या ढिसाळ नियोजनामुळे धरणात पाण्याचा थेब शिल्लक राहिला नाही. पिण्याच्या पाण्याच्या स्कीम पूर्ण धोक्‍यात आल्या आहेत. करोडो रुपये खर्च केलेल्या जललक्ष्मी योजनेचे भवितव्य अडचणीत आले आहे. तरी संबंधित विभागाने या भागातील लोकांच्या त्यागाचा विचार करून पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही, यासाठी उपाय योजना करावी. सध्या उन्हाळ्याची सुट्टी व लग्नसराईमुळे मुंबईकरांचा मोठा राबता राहणार आहे. लग्न कार्यासाठी आलेल्या मुंबईकारचा जीव मेटाकुटीस आला आहे.

या भागातील लोकांना मिळालेल्या फलटण तालुक्‍यातील जमिनी कसण्यायोग्य नसल्याने त्या विकून काहीजण कायमचे मुंबईस वास्तव्य करण्यासाठी निघून गेले आहेत. भागात वस्ती खूप कमी शिल्लक आहे. त्या लोकांना निदान पिण्यासाठी तरी पाणी मिळावे, अशी अपेक्षा आहे. गतवर्षी पावसाचे प्रमाण योग्य नसल्याने धरणातील पाण्याचे नियोजन करता आले नाही. परंतु, शेकडो गावांच्या उदरनिर्वाहासाठी सुरू केलेल्या जललक्ष्मी योजनेसाठी जो प्रचंड खर्च झाला तो पाण्यात जावू नये, याची खबरदारी घेवून धरणातील पाण्याचे नियोजन करावे अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)