वांबोरी चारीचे पाणी द्या अन्यथा आंदोलन

पाथर्डीतील अकरा गावातील ग्रामस्थांचा इशारा 

पाथर्डी – तालुक्‍यातील मिरी, मढी, घाटशिरस, सातवड, तिसगाव, शिरापूर, करडवाडी, कौडगाव आठरे, जोहारवाडी, कंरजी, भोसे या गावांचा वांबोरी चारी योजनेमध्ये समावेश आहे. परंतू दरवर्षी या गावांना पाण्यापासुन वंचित रहावे लागत आहे. यावर्षी पाणी मिळाले नाही तर शेतकऱ्यांच्यावतीने शुक्रवार (दि.26) रोजी तहसील कार्यालयापुढे आंदोलन करण्याचा इशारा या गावच्या ग्रामस्थांनी दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महिनाभरापासुन मुळा धरणातुन वांबोरी चारीसाठी पाणी सोडण्यात आलेले आहे, परंतू मिरी, मढी, घाटशिरस, सातवड, तिसगाव, भोसे, कंरजीसह परिसरातील एकाही गावात पाणी तर सोडाच साधी हवा सुद्धा आलेली नाही. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीने हतबल झालेल्या या लाभधारक शेतकऱ्यांच्या नजरा वांबोरी चारीच्या पाण्याकडे लागल्या आहेत. लोहसरपासुन पुढचे सर्व पाझर तलाव कोरडेठाक असुन पाण्याच्या प्रतिक्षेत आहेत.

याबाबत तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुळा धरणामध्ये वांबोरी चारीला पाणी सोडण्यासाठी 506 एमसीप्टी पाणी आरक्षित ठेवण्याची तरतुद आहे. प्रत्यक्षात मात्र तेवढे हक्‍काचे पाणी वांबोरी चारी योजनेतील लाभधारक तलावांसाठी कधीच मिळालेले नाही. पाणी मिळण्यासाठी लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, कार्यकारी अभियंतांना वेळोवेळी मागणी केली,मात्र तलावात अद्याप पाणी आलेले नाही.

अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता काही शेतकरी पाईपलाईन फोडतात. त्यामुळे पाणी पुढे येत नाही. सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता मढी, घाटशिरस, सातवड, कंरजी, भोसे गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. वांबोरी चारीच्या पाईपलाईनकडे प्रशासकीय यंत्रणेने दुर्लक्ष केल्यामुळेच चारीचे पाणी तलावात अद्यापही पोहचले नसल्याने नागरिकांमधुन संताप व्यक्त होत आहे. घाटशिरस, सातवड, मढी तलावात पाणी आल्यास परिसरातील तिसगाव, शिरापुर, देवराई या गावांना फायदा होणार आहे. पावसाने पाठ फिरवल्याने पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. टॅंकरनेही पाणी देण्यास प्रशासन टाळाटाळ करत आहे.

वांबोरी चारीचे पाणी तलावात सोडल्यास ग्रामस्थांचा व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटण्यास मदत होईल. तरी ग्रामस्थांच्या मागणीचा विचार न झाल्यास मढी, घाटशिरस, तिसगाव, सातवड येथील नागरिकांसमवेत जनआंदोलन उभारण्याचा इशारा मढीच्या सरपंच रखमाबाई मरकड, उपसरपंच मिनाताई आरोळे, सातवड सेवा संस्थेचे अध्यक्ष बंडू पाठक, माजी सरपंच संभाजी वाघ, तिसगावचे उपसरपंच फिरोज पठाण, ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार लोखंडे, पदमाकर पाथरे, सेवा संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब लवांडे, राजेंद्र म्हस्के, आबासाहेब काळे, घाटशिरसचे सरपंच दादासाहेब चोथे, मढी देवस्थानचे माजी अध्यक्ष सचिन मरकड, देवस्थानचे अध्यक्ष अण्णासाहेब मरकड, माजी सरपंच भगवान मरकड, विष्णु मरकड, बबन मरकड, उपसरपंच नवनाथ पाठक या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)