खडकवासला-फुरसुंगीदरम्यान कालव्यातून पाणी, वीजचोरी

पुणे -खडकवासला ते फुरसुंगीदरम्यान कालव्याच्या कडेने पंधरा ते वीस ठिकाणी बेकायदेशीर टॅंकर पॉइंट असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये धायरी येथील काही टॅंकर पॉइंट असून ही पाणीचोरी आणि वीजचोरी रोखण्यासाठी तातडीची उपयोजना म्हणून विशेष पथक नेमण्याची शिफारस राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीने केली होती. त्यास दोन महिन्यांहून अधिक कालावधी झाला. परंतु पाटबंधारे आणि महावितरण यांच्याकडून कोणतीही कारवाई झाली नाही. या दोन्ही विभागांकडून याकडे दुर्लक्ष होत आहे.

गेल्या वर्षी दांडेकर पुलाजवळ कालवाफुटी झाली होती. याचे पडसाद विधान सभेतही पडले होते. त्यावर समिती नेमून या सर्व प्रकरणाची चौकशी करून एक महिन्यात अहवाल सादर करण्याचे आश्‍वासन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले होते. त्यानुसार पाटबंधारे खात्यातील मुख्य अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची समिती नेमण्यात आली होती.
या समितीच्या सदस्यांनी खडकवासला ते स्वारगेट आणि स्वारगेट ते फुरसुंगी अशा दोन टप्प्यांत या कालव्याची पाहणी केली. ही यावेळी प्रत्यक्ष कालव्याच्या कडेने पायी फिरून पाहणी केली. त्यासाठी लागलेला वेळ लक्षात घेऊन या समितीने राज्य सरकारकडून मुदत देखील वाढून घेतली होती. दि.20 मार्च रोजी या समितीने या संदर्भातील अहवाल राज्य सरकारकडे सादर केला.

त्यामध्ये खडकवासला ते फुरसुंगीदरम्यान अशा प्रकारे पंधरा ते वीस ठिकाणी बेकायदेशीर टॅंकर पॉइंट आहेत. कालव्यालगत विहिरी असून मोठ्या प्रमाणावर कालव्यातून पाणी चोरी होत असून टॅंकरचा बेकायदेशीरपणे व्यवसाय सुरू असल्याचे नमूद केले आहे. अनेक ठिकाणी कालव्यास भगदाड पाडण्यात आल्याचेही म्हटले आहे.

त्यावर दीर्घ आणि अल्पकालीन उपायही या समितीने अहवालात सुचविले आहेत. तत्कालिन उपायांमध्ये पाटबंधारे खात्याने तातडीने स्वतंत्र पथक स्थापन करावे. त्यामध्ये पाटबंधारे, महावितरण, महापालिका यांच्या देखील समावेश असावे. त्यांच्या माध्यमातून एकत्रित कारवाई करून ही पाणी चोरी रोखावी, अशी शिफारस केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. परंतु अद्याप त्यावर पाटबंधारे खात्याकडून कोणतीही कारवाई झाली नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)