भक्‍तीमार्ग: वारकरी सांप्रदायाची फलश्रुती

डॉ. विनोद गोरवाडकर

प्रापंचिकाला परमार्थाचा मार्ग दाखविणाऱ्या संतांची स्फूर्ती तरी विठुरायाशिवाय दुसरी कोणती होती? भक्‍तीचा सुलभ मार्ग नामसंकीर्तनाच्या माध्यमातून एकेक पाऊल पार करणे शक्‍य आहे, हे संतांनी दाखविले आणि मुख्य म्हणजे येथे सकलजनसंमर्दात कोणताही भेदभाव असण्याचे काही कारण नाही याची खात्री पटविल्याने वारकरी सांप्रदायाचा मार्ग कमालीचा प्रशस्त झालेला दिसतो. लाखोंच्या संख्येने जमणारा, “भक्‍तीप्रपंचा’त मनोभावे गुंतलेला हा भावभरला विठुभक्‍तांचा जनसमूह बंधुभाव तत्त्वाने वावरतो, त्यावेळी शेकडो वर्षांच्या वारकरी सांप्रदायाच्या वाटचालीची फलश्रृती आपोआप समोर उभी ठाकते.

एकीकडे वारकरी सांप्रदायाच्या वेळोवेळी निर्माण झालेल्या नेतृत्वात वैचारिकतेची बैठक ठाम होती, भक्‍तीचे आवरण पक्‍के होते, आचारांचा आग्रह होता, ध्येयापर्यंत पोहोचू हा विश्‍वास होता, समाजाभिमुकता होती, पण या साऱ्या सोबत भावनांचा स्पर्शदेखील होता. म्हणूनच भाव हा “भोळा’ असतो, ही बाब गृहीत धरून प्रत्येक वारकऱ्यांच्या भावनेला येथे महत्त्व दिले गेले आणि हीच खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाच्या लोकप्रियतेपाठीमागे शक्‍ती असावी. त्यामुळे भावनांचे अपार ऐश्‍वर्य दाखविणाऱ्या संतांवर विश्‍वास ठेवणे यात नवल काही उरलेच नाही.

आध्यात्मावर अधिष्ठित असणारा धर्मविचार सांगतानाच ज्ञानदेवांपासून तुकोबांपर्यंत साऱ्यांनीच शब्दांच्या माध्यमातून लेखणी आणि सभोवती असणाऱ्या सर्वसामान्यजनांना आश्‍वस्त केले. करुणा हा संतांच्या काळजातून अखंड वाहणारा झरा होता. करुणेने केलेले कार्य हे थेट ईश्‍वराप्रती प्रिय होते, एवढे सोपे सूत्र संतांच्या मनीमानसी वसलेले होते. करुणा जेथे असते तेथे निर्घृणता वसू शकत नाही. त्यामुळे संतांनी सभोवतीच्या सामाजिक अंगाचे सातत्याने बारकाईने भावनाशील वृत्तीने चिंतन केले, समाजातील दुःख भक्‍तिमार्गाचा स्वीकार केल्याने कसे दूर होईल यावर प्रबोधन केले.

मराठी भाषेचा पुरस्कार करणारे वारकरी सांप्रदायातील सारेच संत वैदिक धर्माचे उच्च तत्त्वज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आसुसले होते. म्हणूनच भगवद्‌गीतेचा भावार्थ अमृताशी पैजा जिंकण्यासाठी निघालेल्या मायमराठीत ज्ञानेश्‍वरांनी उद्‌धृत केला. मराठीची गोडी लावण्याचे महत्तम कार्य संतांनी केले. मराठी भाषकाची अभिरुची वाढविण्यासाठी निर्माण झालेले संतवाङ्‌मय हळुवारपण या चारशे वर्षांत श्रीमंत होत गेले. ज्ञानदेवांनी स्वीकारलेली मराठी एकनाथ-तुकारामांच्या कालखंडापर्यंत कमालीची लोकप्रिय तर झालीच, पण प्रगल्भतेच्या कोंदणात समृद्धही झाली.

महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदायाच्या माध्यमातून झालेले भक्‍तिपंथाचे कार्य सांस्कृतिकदृष्ट्या व्यापक आणि मूलगामी असल्याने समाजाला नवचैतन्य प्राप्त झाले व त्याचा परिपाक मराठी माणूस संस्कृती, भाषा, अस्मिता आणि बंधुभाव या
चतुःसूत्रीशी एकरूप झालेला दिसतो.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)