वैष्णवांसंगे रंगला बंधूभेट सोहळा

संतांच्या पालखी सोहळ्यांचा पंढरपूर तालुक्‍यात प्रवेश

– औदुंबर भिसे

भंडीशेगांव –
कुंचे पताका झळकती।
टाळ, मृदंग वाजती।।
आनंदे प्रेम गर्जती।
भद्र जाती विठ्ठलाचे।।
भागवत धर्माची पताका फडकावीत टाळ, मृदुंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष करीत पांडुरंगावरील अतूट श्रद्धा व संतांचे पायी विश्‍वास ठेवून आषाढी वारीने पंढरीस निघालेला वैष्णवांचा मेळा पंढरपूरजवळ टप्पा येथे पोहोचला. संत ज्ञानदेव व सोपानदेव यांच्या बंधू भेटीच्या सोहळ्यानंतर मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात लाखो वैष्णवांसह संतांच्या पालखी सोहळ्यांनी पंढरपूर तालुक्‍यात प्रवेश केला.

पंढरपूर तालुका प्रवेशानंतर संत ज्ञानदेवांचा व सोपानदेवांचा पालखी सोहळा भंडीशेगांव मुक्कामी तर संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पिराची कुरोली मुक्कामी पोहोचला. बुधवारी (दि.10) हे सर्व पालखी सोहळे शेवटच्या वाखरी मुक्कामासाठी मार्गस्थ होतील. दुपारी 12 वाजता पालखी सोहळा बोंडले येथे आल्यानंतर ग्रामस्थांच्यावतीने माऊलींच्या सोहळ्याचे स्वागत केले व तोफांची सलामी दिली. येथे माऊलींची पालखी रथातून उतरवून खांद्यावर घेण्यात आली. ती तोंडले गावाच्या दिशेने नेण्यात आली. यावेळी माऊलींना तुषार सिंचनाद्वारे सुगंधी पाण्याचा जलाभिषेक घालण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी माऊलींचे तोफांची सलामी व पालखी सोहळ्यावर पुष्पवृष्टी करून सोहळ्याचे स्वागत केले. याठिकाणी दुपारचा नैवेद्य व विश्रांतीसाठी सोहळा विसावला.

नंदाच्या ओढ्यावर आपल्या गोपालांसमवेत श्रीकृष्णाने गोपाळकाला केल्याची आख्यायिका येथे सांगितली जाते. हीच परंपरा पुढे चालू ठेवीत गेल्या शेकडो वर्षापासून श्री ज्ञानेश्‍वर महाराजांचा पालखी सोहळा तोंडले-बोंडले येथे दुपारच्या भोजन व विश्रांतीसाठी थांबतो. येथे दिंड्यांना थालपीठ, दही, विविध प्रकारच्या चटण्या, उसळ, माडगं, भाकरी, भात, लोणचे अशा प्रकारची शिदोरी तोंडले-बोंडले परिसरासह तांदुळवाडी, शेंडेचिंच, माळखांबी, दसूर, खळवे आदि भागातील गावकरी घेवून येतात आणि वारकरी या शिदोरीचा आस्वाद घेतात. दुपारी 2:30 वाजता ज्ञानराजांचा पालखी सोहळा टप्प्याकडे मार्गस्थ झाला. पालखी सोहळा पुढे काढण्यासाठी पोलिसांची तारांबळ उडत होती. अखेर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

सायंकाळी 5:30 वाजता माऊलींचा पालखी सोहळा टप्प्याजवळ पोहोचला. त्यानंतर 5:45 वाजता सोपानदेवांचा पालखी सोहळा टप्पा येथे पोहोचला. येथे सोहळ्याचे मालक राजाभाऊ आरफळकर, सोहळा प्रमुख योगेश देसाई यांनी सोपानदेवांचे सोहळाप्रमुख श्रीकांत महाराज गोसावी यांना श्रीफळ भेट दिले. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल असा जयघोष झाला आणि टाळ, मृदुंगाच्या गजरात बंधू भेटीचा सोहळा येथे रंगला. हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती.

पालख्यांचा पंढरपूर तालुक्‍यात प्रवेश…
पंढरपूर तालुक्‍याच्या सिमेवर संत ज्ञानदेव, संत तुकाराम, संत सोपानदेव, संत चौरंगीनाथ, चांगा वटेश्‍वर, गुलाबबाबा, संतनाथ महाराज, गवार शेठ लिंगायत वाणी (तुकाराम महाराजांचे टाळकरी), संत गोरोबा काका, जगनाडे महाराज आदि संतांच्या पालख्यांचे टप्पा येथे आगमन झाले. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सांयकाळी 6 वाजता मुक्कामी पोहोचला. रात्रौ 8 वाजता संत सोपानदेव तर रात्रौ 9 वाजता संत ज्ञानदेवांचा पालखी सोहळा भंडीशेगांव मुक्कामी पोहोचला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)