वारी : काही वैशिष्ट्ये

– डॉ. विनोद गोरवाडकर 

एकवार वारीत वारकरी चालावयास लागला की हळूवारपणे भक्तीचा रंग असा काही त्याच्या मनीमानसी भिनतो की त्यातून त्याला बाहेर पडावेसेच वाटत नाही. महिना-महिना घर सोडून वारीसोबत राहावयाचे ही तशी सामान्य बाब नाही. त्यात प्रापंचिकाला तर ते खूपच अवघड आहे. “प्रपंच करावा नेटका’ हे संतांनीच सांगितलेले सूत्र अंगिकारत असताना दीर्घ कालावधीसाठी घरदार सोडणे आणि विठुरायाच्या चरणी मनोमनी लीन होणे ही गोष्ट तो आनंदाने स्वीकारतो आणि वारीत सामील होतो. “सत्‌-चित्‌-आनंदा’ची पायरी त्याला हवी असते, पण त्यासाठी उतावीळ होऊन चालत नाही हेही त्याला ठाऊक असते.

वारी हा “जिवीचा विसावा’ आहे. वारी हा परमानंदाचा वर्षाव करणारा भोज्जा आहे. वारी मनाची पंढरी आणि कैवल्याचे धाम आहे. वारी विठुरायाकडे घेऊन जाणारे आनंदनिधान आहे. वारी विश्‍वात्मक एकरुपतेचा अनुभव देणारे सुख आहे. वारी चिंतनातून चित्ताला शुद्ध करणारी, अंतर्यामीचा मळ धुवून टाकणारी अंतर्बाह्य पारमार्थिक कल्हई करून व्यक्तित्त्वाला लखलखीतपणा प्रदान करणारी एक अद्‌भुत प्रक्रिया आहे. अर्थात वारीची प्रमुख अट एकच, “सारे यारे लहानथोर’ ;पण कसे तर भक्तिमार्गाचा मनःपूर्वक स्वीकार करण्याची अट! पुण्याला पालख्या भेटल्या की पुणे ते सासवड हा जवळपास तीस किलोमीटरचा टप्पा एका झपाट्यात पार केला जातो. मध्ये असणारा दिवेघाट हा वारीच्या वाटचालीचा अतिशय नयनमनोहर असा टप्पा आहे. महाराष्ट्रभरातून दिवेघाटातील वारीचा प्रवास बघण्यासाठी लाखो भक्तजन त्या परिसरात येऊन थांबतात. “ज्ञानोबा माऊली तुकाराम’ या जयघोषात दिवेघाट केव्हा पार होतो कळत नाही. पहावे तिकडे अलोट जनसागर उसळलेला असतो; पण कुठेही कुठल्याही प्रकारची गडबड होत नाही. पालखी सासवडला विसावते, तेव्हा मनाला प्राप्त झालेली भक्तीची ऊब शब्दातीत असते.

ज्ञानोबा माऊलींची पालखी सासवडनंतर जेजुरी, वाल्हे, लोणंद, तरडगाव, फलटण, बरड, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, शेगाव, वाखरी या गावी मुक्‍काम करीत पंढरपूरला पोहोचते. तर तुकोबांची पालखी सासवडनंतर एखतपूर, कोथळ, आंबे, जळगाव, बारामती, समसर, लासणूर, रेडे, ससाटी, अकलूज, बोरगाव, कुरोली, वाखरी येतील मुक्‍कामानंतर पंढरपूरला पोहोचते. वाखरीला ज्ञानोबा-तुकोबांची पुन्हा भेट होते.

या दोन्ही पालख्यांशिवाय पैठणहून एकनाथ महाराजांची पालखी, त्र्यंबकेश्‍वरहून निवृत्तीनाथांची पालखी, सासवडहून सोपानकाकांची पालखी, एदलाबादहून मुक्ताबाईंची पालखी, जळगावहून मुक्ताबाई-राम पालखी, दौलताबादहून श्रीजनार्दन स्वामींची पालखी, ओतूरहून तुकाराम महाराजांचे गुरू श्रीबाबाजी चैतन्न महाराजांची पालखी, वडगावहून श्रीनारायणस्वामी वडगावकरांची पालखी, बत्तीसशिराळ्याहून गोरखनाथांची पालखी, कौंडिण्यपूर या रुक्‍मिणीमातेच्या माहेरहून निघणारी रुक्‍मिणीची पालखी अशा महत्त्वपूर्ण पालख्यांसोबत असंख्य दिंड्या वेगवेगळ्या ठिकाणांहून निघतात आणि आषाढीला पंढरीला पोहोचतात. “मी तू पण गेले वाया’ म्हणत सारे एक होतात आणि “आले वैष्णवांचे भारा दिले हरिनाम नगार। अवघी दुमदुमली पंढरी। कडकडाट गरूडापाशी।।” या जनाबाईंच्या ओळखीतला अर्थ पंढरपूर नगरीत साकार होतो.

वारीच्या मार्गावर दरमुक्‍कामी भजन-कीर्तनाचा ठरलेल्या लोकांना मान असतो. दररोज पंधरा-सतरा किलोमीटरची वाटचाल असते. मुक्‍कामाच्या गावी प्रत्येकाची सोय वेगवेगळ्या ठिकाणी केलेली असते. व्यवस्थित जेवणखाण, स्नान, निद्रा या साऱ्या गोष्टी स्वयंशिस्तीने चाललेल्या असतात, “कोणी दुःखी असो नये’ हे ज्ञानदेवांचे सूत्र सर्वदूर प्रत्यक्षात दिसते. दिंडीच्या प्रारंभ भालदार, चोपदार, वीणेकरी, डोक्‍यावर तुळशीची कुंडी घेतलेल्या महिला, मग टाळ-मृदुंग घेतलेले भजनी मंडळ, मधल्या भागात पालखी आणि शेवटच्या टप्प्यात पुन्हा काही वारकरी असा लवाजमा प्रत्येक दिंडीसोबत दिसतो. प्रत्येकजण आपल्याकडून काही चुकूनही चूक होऊ नये याची कसोशीने काळजी घेत असते.

“सर्व सुखराशी भीवरेचे तीरी। आमुची पंढरी कामधेनू। प्रेमामृत दुभे सदा संतजना। ओसंडतो पान्हा नित्य नवा।” असणाऱ्या पंढरीची चाहूल चालता चालता लागू लागली की या विश्‍वव्यापी विशाल भक्तिप्रेमाच्या केंद्रस्थानी आपण केव्हा पोहोचू आणि त्या पंढरीच्या पांडुरंगाला डोळा भरून केव्हा पाहू अशी मनोवस्था प्रत्येक वारकऱ्याची झाल्याशिवाय राहात नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)