प्रभाग समिती अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर

पिंपरी  – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एकूण आठ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या 9 मे रोजी अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात या निवडी होणार आहेत.

पुण्याचे विभागीय आयुक्‍त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणूक कार्यक्रमानुसार 2 आणि 3 मे रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 आणि 4 मे रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत उमेदवारी अर्जांचे वाटप केले जाणार आहे. तर, 4 मे रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे अर्ज जमा करावयाचे आहेत. 9 मे रोजी सकाळी साडेअकरा वाजल्यापासून मुख्यालयातील मधुकर पवळे सभागृहात निवडणुकीला सुरुवात होणार आहे. पुणे महापालिकेचे अतिरिक्‍त आयुक्त राजेंद्र निंबाळकर निवडणूक अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत.

1 ऑगस्ट 2017 रोजी महापालिकेची सुधारित प्रभाग रचना जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर 9 ऑगस्ट 2017 ला या समितीची बैठक पार पडली. स्थायी अथवा अन्य कोणत्याही समितीवर स्थान न मिळालेल्या नगरसेवकांना या समितीवर सत्ताधारी पक्षाकडून संधी दिली जाते. “अ’ प्रभागात भाजपचे नऊ नगरसेवक आहेत. तर, राष्ट्रवादीचे चार आणि शिवसेनेचे तीन नगरसेवक आहेत. “ब’ प्रभागात भाजपचे आठ, राष्ट्रवादीचे सहा आणि शिवसेना एक आणि अपक्ष एक नगरसेवक आहे.

“क’ प्रभागात भाजपचे 11, राष्ट्रवादीचे पाच नगरसेवक आहेत. “ड’ प्रभागात भाजपचे दहा, राष्ट्रवादीचे तीन आणि शिवसेनेचे तीन नगरसेवक आहेत. “फ’ प्रभागात भाजपचे आठ, राष्ट्रवादीचे सहा, मनसे एक आणि अपक्ष एक नगरसेवक आहे. “ग’ प्रभागात भाजपचे नऊ, राष्ट्रवादीचे तीन, शिवसेना दोन आणि अपक्ष दोन नगरसेवक आहेत. “ह’ प्रभागात भाजपचे नऊ, राष्ट्रवादीचे सहा आणि अपक्ष एक नगरसेवक आहे. या सर्व प्रभागांमध्ये भाजपचे बहुमत आहे. त्याचबरोबर अपक्ष नगरसेवकही भाजपसोबत आहेत. त्यामुळे आठही समित्यांवर भाजपचे अध्यक्ष निवडून येणार हे निश्‍चित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)