मुद्दा: दक्षिणेत हवी देशाला आणखी एक राजधानी? 

देविदास देशपांडे 

दिल्लीतील वाढते प्रदूषण आणि दाक्षिणात्य राज्यांतील असंतोष यामुळे दुसऱ्या राजधानीची मागणी वाढत आहे. या वर्षीच्या सुरुवातीला तेलंगण राष्ट्र समिती पक्षाच्या खासदाराने राज्यसभेत हा प्रश्‍न उपस्थित केला होता. त्यावर दुसरी राजधानी निर्माण करण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या नाही, असे उत्तर केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी दिले होते. तत्पूर्वी अण्णा द्रमुकचे खासदार नवनीत कृष्णन यांनी संसदेचे अधिवेशन दाक्षिणात्य राज्यांमध्ये घेण्याची मागणी केली होती. कर्नाटकातील काही नेत्यांनीही बंगळुरूला दुसरी राजधानी करण्याची मागणी केली आहे. 

पवन कल्याण हा तेलुगु चित्रपटांचा दिग्गज सुपरस्टार. त्याने राजकारणातही आघाडी घेतली असून त्याचा चाहता वर्ग हा भल्याभल्यांना धडकी भरविणारा आहे. त्याचा स्वतःचा “जनसेना पक्ष’ आहे. या पवन कल्याण यांनी एका नवीन विषयाला तोंड फोडले आहे. “भारताला एक दुसरी राजधानी असावी आणि ती दक्षिण भारतात असावी’, असे त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात दक्षिणेकडील पक्षांनी एका आवाजात बोलण्याची वेळ आली आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

पवन कल्याण यांनी हे वक्‍तव्य केले ते चेन्नईत. तेथे पत्रकारांशी बोलताना पवन कल्याण यांनी दक्षिणेकडील राज्ये या व्यवस्थेमध्ये निर्णायक भूमिका बजावतील, अशी अपेक्षाही व्यक्‍त केली. ते म्हणाले की, दक्षिणेतील राजकीय पक्षांनी एकत्र उभे राहावे आणि उत्तर प्रदेश व बिहार यांचे राष्ट्रीय राजकारणातील वर्चस्व संपवावे, यासाठी हाच उत्तम काळ आहे.
भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी दक्षिण भारतात दुसरी राष्ट्रीय राजधानी उभारण्याच्या गरजेवर भर दिला होता. मात्र, आतापर्यंत हे एक अधुरे स्वप्न राहिले आहे, असे पवन यांनी सांगितले. शिवाय आपला जनसेना पक्ष ही मागणी पुढे नेईल, हेही स्पष्ट केले.

पवन यांनी उत्तर-दक्षिणतेली विभाजनाच्या मुद्द्यावर बोलण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यावर्षी फेब्रुवारीमध्ये पवन कल्याण यांनी राज्या-राज्यांतील कर महसूल वाटपासाठी लोकसंख्येवर आधारित सूत्रावर प्रश्‍नचिन्ह उभे केले होते. दक्षिण भारतीय राज्यांनी मिळविलेले यश केंद्र सरकार त्यांच्याच विरुद्ध वापरणार का, असा सवाल त्यांनी तेव्हा केला होता.
सुदैवाने, पवन यांचा हा अभिनिवेश दक्षिणेच्या अन्य आंदोलनांप्रमाणे एकारलेला नाही. उत्तर-दक्षिणेतील हे विभाजन हे लोकांमध्ये नाही तर राजकीय वर्गातील आहे, असे त्यांनी गेल्या वर्षी जानेवारीत सांगितले होते. “दिल्लीचा स्वतःचा एक राजकीय वर्ग आहे. तो उत्तर प्रदेशात मिळविलेल्या बहुमताच्या जोरावर संपूर्ण देश चालवू पाहतो, असे दक्षिण भारतातील सर्वांना वाटते. लोकांचे बंड त्या विरोधात आहे’, असे त्यांचे म्हणणे आहे.

पवन कल्याणने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दाखला देणे सुसंगतच आहे. खरोखरच डॉ. आंबेडकर यांनी भारताला “दुसरी राजधानी गरजेची असण्याचे’ मत मांडले होते. हैदराबादला दुसरी राजधानी करण्याची शिफारसही केली होती. “उत्तरेचे वर्चस्व दक्षिण भारत सहन करेल काय’, असा प्रश्‍न उपस्थित करून बाबासाहेबांनी त्याला “नाही’ असे ठाम उत्तर दिले होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्यांच्या पुनर्रचनेची गडबड सुरू होती, तेव्हा डॉ. आंबेडकर यांनी “थॉट्‌स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्‌स’ हा प्रबंध लिहिला होता. या प्रबंधात त्यांनी भाषावार प्रांतरचनेसोबतच दुसऱ्या राजधानीवरही विचार मांडले आहेत. “नीड फॉर अ सेकंड कॅपिटल’ असे त्या लेखाचे शीर्षक आहे.

डॉ. आंबेडकर म्हणतात, “भारताला एकच राजधानी असणे हे परवडणारे आहे का? भारताची आता एक राजधानी आहे म्हणून काही हा प्रश्‍न संपत नाही. भारताची राजधानी समाधानकारक ठिकाणी नसेल, तर हा प्रश्‍न विचारात घेण्याची हीच वेळ आहे.’ उत्तरेच्या वर्चस्वाविरुद्ध असणाऱ्या अप्रीतीचे रूपांतर द्वेषात होऊ शकते, अशा इशाराही त्यांनी दिला होता. जल्लिकट्टूसारख्या आंदोलनातून आपण ते पाहिलेही आहे. त्यामुळे सध्या तरी केंद्राने हा विषय टाळला असला तरी फार काळ ही मागणी दुर्लक्षता येणार नाही आणि येऊही नये.

आंध्र प्रदेशाचे विभाजन करून तेलंगण राज्याची निर्मिती करण्याचा मुद्दा जोरात होता, तेव्हा हा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला होता. सीमांध्र आणि तेलंगण राज्यांतील नेते आणि लोकांमध्ये हैदराबाद शहरावरून मोठा वाद झाला होता. हैदराबाद हे संयुक्‍त शहर किंवा केंद्रशासित प्रदेश करावे आणि तिघांनाही त्यात मुक्‍त प्रवेश असावा (चंडीगडप्रमाणे) असे सीमांध्रच्या समर्थकांचे म्हणणे होते. मात्र हैदराबाद हे तेलंगाणा राज्याचा अविभाज्य भाग आहे, असे त्या राज्याच्या समर्थकांचे म्हणणे होते अन्‌ या वादावर मध्यमार्गी तोडगा म्हणून डॉ. आंबेडकर यांच्या त्या प्रस्तावाचा विचार पुढे करण्यात आला होता. हैदराबादला भारताची दुसरी राजधानी करावी, अशी मागणी तेलगू देसम पक्षाने केली होती. सध्याचे तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनीही त्याला पाठिंबा दिला होता.

ब्रिटिशांच्या जाण्यानंतर भारताची केवळ एक राजधानी आहे आणि ती दिल्ली आहे. ब्रिटिशांच्या आधी भारताच्या नेहमी दोन राजधान्या होत्या. मोगल काळात काश्‍मीरमधील श्रीनगर ही दुसरी राजधानी होती. ब्रिटिश आले तेव्हा त्यांच्याही दोन राजधान्या होत्या, एक कोलकता आणि दुसरी शिमला. त्यांनी कोलकात्याहून दिल्लीला राजधानी हलविली तरी उन्हाळ्याची राजधानी म्हणून शिमला कायम ठेवली होती. मोगल आणि ब्रिटिशांनी दोन राजधान्या बाळगण्यामागे हवामान हे कारण होते. दिल्ली किंवा कोलकात्यातील उन्हाळा ब्रिटिश राज्यकर्ते सोसू शकत नव्हते. मात्र, डॉ. आंबेडकर यांच्या मते, हवामानासह सुरक्षा व सोय या कारणांमुळेही दुसरी राजधानी आवश्‍यक आहे.

आपल्याकडे जनतेचे सरकार आहे आणि लोकांची सोय हा एक महत्त्वाचा घटक आहे. दक्षिण भारताच्या लोकांच्या दृष्टीने दिल्ली ही अत्यंत त्रासदायक आहे. थंडी आणि दूर अंतर या दोन्हींचा त्यांना त्रास होतो. उन्हाळ्यात उत्तरेतील लोकांनाही त्रास सहन करावा लागतो. ते तक्रार करीत नाहीत कारण त्यांना दिल्ली जवळ पडते आणि ते सत्ताकेंद्राच्या जवळ आहेत.
दुसरे म्हणजे दाक्षिणात्य लोकांची भावना आणि तिसरे म्हणजे संरक्षण होय.

आपल्या देशाची राजधानी आपल्यापासून फार दूर आहे आणि उत्तर भारतीय लोक आपल्यावर राज्य करत आहेत, असे दाक्षिणात्य लोकांना वाटते. तिसरा विचार नक्‍कीच अधिक महत्त्वाचा आहे. दिल्ली हे एक संवेदनशील ठिकाण आहे. शेजारील देशांच्या बॉम्बच्या टप्प्यात ते मोडते. कलकत्ता तिबेटच्या (आता चीनच्या) टप्प्यात असल्यामुळे दुसरी राजधानी म्हणून कलकत्ता निरुपयोगी ठरेल. आणखी एक शहर म्हणजे मुंबई. परंतु मुंबई हे बंदर आहे आणि भारतीय मुंबईचे रक्षण करण्याच्या दृष्टीने आपले नौदल अत्यंत कमजोर आहे. त्यामुळे हैद्राबाद हीच राजधानी असावी असे अनेकांना वाटते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup:
3 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)