विविधा: वामन मल्हार जोशी

माधव विद्वांस

मराठी कादंबरीकार, पत्रकार, संपादक, साहित्यसमीक्षक आणि तत्त्वचिंतक वामन मल्हार जोशी यांचे आज पुण्यस्मरण (निधन 20 जुलै 1943). त्यांचा जन्म 21 जानेवारी 1882 रोजी रायगड जिल्ह्यतील तळे येथे झाला. तळे येथील शालेय शिक्षण संपवून वा. म. जोशी पुण्यातील डेक्‍कन कॉलेजमध्ये आले. तेथे त्यांनी 1904 मध्ये बी.ए.ची आणि 1906 मध्ये एम.ए.ची पदवी मिळवली. एम.ए. झाल्यानंतर कोल्हापूर येथे राष्ट्रीय शिक्षण योजनेखाली चालविलेल्या समर्थ विद्यालयात अध्यापनाचे काम केले. ही संस्था वि. गो. विजापूरकर यांचे मार्गदर्शनाखाली चालत होती. तेथे त्यांनी विश्‍ववृत्त या मासिकाच्या संपादनाची जबाबदारीही स्वीकारली. याच मासिकात 1908 साली प्रसिद्ध झालेल्या “वैदिक धर्माची तेजस्विता’ या लेखाबद्दल सरकारने राजद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना आणि विजापूरकरांना तीन वर्षांच्या सक्‍तमजुरीची शिक्षा दिली.

वर्ष 1911 मधे तुरुंगवासातून बाहेर आल्यावर 1916 पर्यंत केसरी-मराठा संस्थेत त्यांनी काम केले. त्यानंतर काही काळ अच्युत बळवंत कोल्हटकर ह्यांच्या “मेसेज’ या इंग्रजी दैनिकाचे ते उपसंपादक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर वर्ष 1918 मध्ये महर्षी कर्वे यांच्या हिंगणे येथील शाळेत प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले. ते तेथे तत्त्वज्ञान, मानसशास्त्र आणि इंग्रजी-मराठी साहित्य शिकवीत. ते निवृत्त होईपर्यंत त्याच संस्थेत वेगवेगळ्या पदांवर काम करीत राहिले. ते तेथे महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून निवृत्त झाले.

“रागिणी’ या त्यांच्या पहिल्याच कादंबरीमुळे त्यांचे नाव सर्वतोमुखी झाले. त्यानंतर आश्रमहरिणी (1916), नलिनी (1920), सुशिलेचा देव (1930), इंदू काळे व सरला भोळे (1934) या चार कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. मुळात तर्कशास्त्र घेऊन पदवी घेतलेल्या वामनरावांचे लेखन तर्कसंगत असायचे. त्यातून त्यांची तत्त्वचिंतक वृत्ती प्रकर्षाने व्यक्‍त होते.

त्यांच्या लेखनात कर्तव्य, ध्येयनिष्ठा, कलाप्रेम, नीतिबंधने, बुद्धी, श्रद्धा, व्यक्‍तिस्वातंत्र आणि सामाजिक-नैतिक बंधने यांना स्पर्श झालेला दिसतो. ते लोकमान्य टिळकांचे तसेच म. गांधीजींचे समकालीन होते. स्वातंत्र्यलढा तसेच सामाजिक चळवळी याच काळात उभ्या राहात होत्या. राष्ट्रवाद, गांधीवाद, समाजवाद, मार्क्‍सवाद इ. प्रभावी विचारप्रणाली लोकजीवनात येऊ घातल्या होत्या. त्यावेळी कोणतीही टोकाची भूमिका न घेता सर्वच वादांच्या बाबतीत त्यांची भूमिका सदैव डोळस मध्यममार्गीच राहिली. “कारणानाम्‌ अनेकता’ हे तत्त्व त्यांच्या मनावर इतके बिंबलेले होते, की कोणतीही आत्यंतिक वैचारिक भूमिका त्यांना कधीच मानवली नाही.

नवपुष्पकरंडक (1916, विविधस्वरूपी लेखनाचा संग्रह), विस्तवाशी खेळ (1937-नाटक) व स्मृतीलहरी (1942) ही त्यांची तीन पुस्तके उल्लेखनीय आहेत. स्मृतीलहरीमधील आठवणींचे लेखनही तत्त्वशोधकवृत्तीने केलेल्या जीवनानुभवाच्या चिंतनातून जन्माला आलेले आहे. त्यांच्या ठिकाणी तत्त्वशोधक वृत्तीबरोबरच प्रसन्न विनोदबुद्धी होती. तिचा प्रत्यय त्यांच्या सर्वच लेखनातून-नीतिशास्त्रप्रवेश (1919) या प्रबंधात्मक ग्रंथातूनही येतो. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी मराठीतील तात्त्विक कादंबरीच्या जनकत्वाचा मान त्यांना दिला आहे. मडगाव येथे 1930 साली झालेल्या पंधराव्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मुंबई येथे ते निधन पावले. त्यांना अभिवादन

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)