वाई तालुक्यातील रस्त्याची वाटचाल ‘खड्डे मुक्ती’च्या दिशेने

पसरणी घाटात रस्त्याचे डांबरीकरण युध्दपातळीवर सुरू

वाई –
“रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता,’अशी दयनीय अवस्था झालेल्या वाई तालुक्‍यातील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती. अनेक लहान-मोठे अपघात झाले होते. या पार्श्‍वभूमीवर वाईच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे मुक्त रस्त्यासाठी कंबर कसली असून महिन्याभरात मुख्य मार्गासह अन्य रस्त्यावरील सर्व खड्डे भरून घेण्याची मोहिम हाती घेतली आहे. त्याची अंमलबजावणी आठ दिवसांपासून सुरू झाली आहे. मुख्य महामार्गासाठी सध्या दीड कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून कार्यवाही त्वरित करण्यात येत आहे.

लाखो पर्यटक दरवर्षी पाचगणी, महाबळेश्‍वरला येत असतात. सुरूर-वाई या राज्य महामार्गावरून दररोज हजारो वाहने पसरणी घाटातून पाचगणी, महाबळेश्‍वरकडे जातात. हा मुख्य रस्ताच प्रवासासाठी डोकेदुखी ठरत होता. अनेक पर्यटकांची नाराजी व्यक्त होताना दिसत होती. रस्ते उखडले गेले होते. लहान-मोठी वाहनं खड्ड्यात आपटली जात होती, अचानक ब्रेक दाबल्याने अनेक अपघात या रस्त्यावर झाले आहेत. हे रस्ते खड्डे मुक्त करण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती. या सगळ्या पार्श्‍वभुमीवर वाईच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता श्रीपाद जाधव व त्यांची टिम यांनी वाई तालुक्‍यात अनेक ठिकाणी रस्ते डांबरीकरण सुरू केले. सध्या वाई-जोर, परखंदी-वाई ते पसरणी घाटात, वेळे-चांदक, किसनवीर कारखाना रस्ता अशा अनेक ठिकाणी रस्ते दुरुस्तीची कामे सुरू आहेत. येणाऱ्या आठ दिवसात मुख्य मार्गावरील ऐंशी ट्‌क्‍के खडी व डांबराने बुजवले जाणार असुन रोलर फिरवला जाणार असल्याने रस्ते चकाचक खड्डे मुक्त होणार आहेत. खड्ड्यामुळे हैराण झालेल्या पर्यटक व स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करून बांधकाम विभागाला धन्यवाद दिले आहेत.

वर्षातुन दोनदा तरी आम्ही पाचगणी, महाबळेश्‍वरला येत असतो. एक्‍सप्रेस हायवेमुळे वाईला आम्ही दीड तासात पोहचतो. परंतु यावर्षी विशेषतः सप्टेंबरमध्ये रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यामुळे खुपच त्रास सहन करावा लागला होता. नुकतेच कामानिमित्त पाचगणीला आलो होतो. रस्त्यावरील खड्डेमुक्त करीत असल्याचे रस्ते पाहुन खुपच समाधान झाले.
एक पर्यटक, (पुणे)

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)