“वाई अर्बन’चा एक हजार कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण

वाई  – येथील वाई अर्बन को. ऑप. बॅंकेने ठेवींचा 1000 कोटी रूपयांचा टप्पा 29 जून रोजी पूर्ण केला आहे, अशी माहिती बॅंकेचे अध्यक्ष चार्टर्ड अकाउंटंट चंद्रकांत काळे यांनी दिली. सी. ए. चंद्रकांत काळे म्हणाले, बॅंकेचे सभासद, खातेदार, कर्जदार व हितचिंतकांच्या सहकार्याने बॅंकेने या आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीमध्ये म्हणजे दि. 29 जून 2019 रोजी ठेवींचा 1008 कोटी रूपयांचा टप्पा पूर्ण केला आहे.

बॅंकेची कर्जे 669 कोटी इतकी झाली आहेत. खरे तर बॅंकेने ठेवींचा 1000 कोटी रूपयांचा टप्पा दि. 21 जून रोजीचे 98 व्या वर्धापन दिनी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र सदरचे उद्दिष्ट दि. 29 जून रोजी पूर्ण झाले आहे. बॅंकेच्या 30 शाखा कार्यरत असून एकूण व्यवसाय 1676 कोटी रूपये झाला आहे. भारतात नागरी सहकारी बॅंका 1551 आहेत, देशभरांतील 80 नागरी सहकारी बॅंकांच्या ठेवी 1000 कोटींच्यावर आहेत. त्यामध्ये आता आपल्या बॅंकेचा समावेश झाला आहे.

बॅंकेची स्थापना 1921 झाली आहे. गेली 98 वर्षे बॅंक अविरत कार्यरत आहे. 1995-96 मध्ये बॅंकेच्या ठेवी 25 कोटी होत्या. 1998 साली 50 कोटी, 2001 साली 100 कोटी तर 2009 मध्ये 200 कोटी ठेवी झाल्या होत्या. 2011 साली व्यावसायिक विचारांच्या संचालक मंडळाने कारभार हाती घेतल्यानंतर बॅंकेच्या प्रगतीचा वेग खूपच वाढवला आहे.

डॉ. विनय जोगळेकर यांच्या अध्यक्षतेखाली, श्री. चावलानी उपाध्यक्ष असताना संचालक मंडळात मी व अन्य संचालक होतो. तेव्हांपासून आम्ही खूप प्रयत्न केले. त्यानंतर 2014 मध्ये मी उपाध्यक्ष असताना 500 कोटी ठेवी केल्या. तर 2016 मध्ये मी अध्यक्ष झालो तेव्हा 648 कोटी ठेवी होत्या. गेल्या तीन वर्षांत खूप प्रयत्न करून आम्ही 350 कोटींच्यावर ठेवी गोळा केल्या आहेत. एकंदरीत गेल्या 10 वर्षांत बॅंकेच्या ठेवींमध्ये पाचपट इतकी वाढ झाली आहे. कर्जे देखील 100-150 कोटींवरून 669 कोटींपर्यंत पोहचली आहेत. तर बॅंकेची गुंतवणूक 330 कोटींच्यावर आहे. या सर्व कामासाठी संचालक मंडळ व सभासद, खातेदारांची खूप मदत झाली आहे.

बॅंकेने शेडूल्ड बॅंकेसाठी रिझर्व्ह बॅंकेकडे प्रस्ताव सादर केला आहे. तसेच बॅंक मल्टीस्टेटचा प्रस्तावही शासनाकडे पाठविला आहे.. बॅंकेने रिझर्व्ह बॅंकेच्या फायनान्सिअली साऊंड ऍण्ड वेल मॅनेज्ड बॅंकेसाठीची सर्व मानांकने सातत्याने पूर्ण केली आहेत. दि. 1 जुलैपासून आरटीजीएस, एनईएफटीसाठीचे चार्जेस बंद करण्यात आले आहेत. बॅंकेने 1000 कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण केलेबद्दल मान्यवरांनी बॅंकेचे पदाधिकारी व संचालक मंडळाचे अभिनंदन केले.

याप्रसंगी बॅंकेचे उपाध्यक्ष राजेंद्र चावलानी, ज्येष्ठ संचालक डॉ. विनय जोगळेकर, श्री. मदनलाल ओसवाल, ऍड. प्रतापराव शिंदे, श्री. विवेक भोसले, ऍड. सीए. राजगोपाल द्रवीड, श्री. विद्याधर तावरे, श्री. मनोज खटावकर, प्रा. श्री. विष्णू खरे, श्री. भालचंद्र देशपांडे, डॉ. शेखर कांबळे, श्री. स्वरूप मुळे, सीए. किशोरकुमार मांढरे, संचालिका सौ. अंजली शिवदे, सौ. गीता कोठावळे, सीईओ श्रीपाद कुलकर्णी व बॅंकेचे संचालक उपस्थित होते. ठेवींचा 1000 कोटींचा टप्पा पूर्ण केलेबद्दल वाई अर्बन परिवाराचे प्रमुख पोपटलाल ओसवाल, अरूण देव, कांतीलाल जैन, अविनाश जोशी, सीए. डी. बी. खरात, प्रवीण जगताप, यशवंत जमदाडे व मान्यवरांनी अभिनंदन केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)