वडूजला कॉलेजमध्ये जबरी चोरीचा प्रयत्न

झालेल्या झटापटीत शिपाई गंभीर जखमी 

टी स्टॉलमध्येही चोरी

दरम्यान याच रात्री बसस्थानकाशेजारी साई मंगल हे चहाचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी गल्ल्यातील रोकड व दुकानातील किरकोळ साहित्य लांबवले आहे. पोलीस ठाण्यापासून केवळ हाकेच्या अंतरावर असलेल्या दुकानात चोऱ्या होऊ लागल्याने व्यापारी वर्गात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

वडूज – येथील हुतात्मा परशुराम विद्यालय व जु. कॉलेजच्या कार्यालयाची तोडफोड करून अज्ञात चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्री जबरी चोरीचा प्रयत्न केला. यावेळी चोरट्याशी झालेल्या झटापटीत शाळेचा शिपाई गंभीर जखमी झाला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, बुधवारी रात्री शाळेच्या आवारात विकास भीमराव काळे (वय 23) हा शिपाई रात्रपाळीस होता. रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास 25 ते 30 वयोगटाचे दोन तरुण मुख्याध्यापकांच्या खोलीचे कुलूप तोंडून घुसले. त्या दोघांनी अंगात काळ्या रंगाचे फुल भायाचे टीशर्ट व निळसर रंगाची पॅन्ट परिधान केली

होती. तसेच तोंडाला रुमाल बांधलेला होता. त्या दोघांना आपण हटकले असताना त्यातील एकाने तू जास्त हालचाल करू नकोस नाहीतर जीवे मारीन अशी धमकी दिली तर दुसऱ्याने हातातील लोखंडी गजाने प्राचार्यांच्या केबिनमधील कपाटाचे कुलूप तोडून त्यातील कागद विसकटले. यावेळी आपण जोराचा प्रतिकार केला असता शिपाई काळे

यांच्या हातावर चोरट्यांनी चाकूचे वार केले. यावेळी चोरट्यांनी आपल्या गळ्यातील सोन्याचा बदाम लंपास करण्याचा जबरी प्रयत्न केला. या झटापटीत टेबलावरील काचांची तोडफोड होण्याबरोबरच चोरट्याच्या चेहऱ्यावरील रुमालही निसटले त्यामुळे सदर आरोपीस आपण ओळखू शकतो असे काळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याबाबतची फिर्याद वडूज पोलीस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास शांताराम ओंबासे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)