मोडकळीस आलेल्या इमारतीमुळे मतदान केंद्र बदलले

शाळेच्या मोडकळीस आलेल्या याच इमारतीत विद्यार्थी घेतात शिक्षण

नागरदेवळे येथील प्रकार ः मतदारांना सहन करावा लागला मनस्ताप

शाळेची इमारत धोकादायक

सावतानगर येथील जि. प. शाळेची इमारत ही मतदान प्रक्रियेसाठी धोकादायक असल्याचे सांगत तेथील मतदान केंद्र दुसरीकडे स्थलांरित करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे ज्यावेळी निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी या इमारतीची पाहणी केली, तेव्हा त्यांना ती धोकादायक वाटली नाही का, असा संतप्त सवाल व्यक्त केला.

नगर – नगर तालुक्‍यातील नागरदेवळे गावातील सावतानगर येथील मतदान केंद्राच्या जागेत मोडकळीस आलेल्या जि. प. शाळेच्या इमारतीमुळे बदल करण्यात आला. त्यामुळे मतदारांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. सकाळी सकाळीच मतदार व्होटर स्लीप घेऊन सावतानगर येथील जि. प. शाळेत पोहोचले. मात्र तेथे मतदान केंद्राच्या जागेत बदल झाल्याचा फलक त्यांना पाहावयास मिळाला. त्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला. नगर दक्षिण मतदार लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळपासूनच विविध मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदान करण्यासाठी रांगा लावल्या होत्या. अनेक उत्साही मतदार आपणच पहिले मतदान करावे, या विचाराने मतदान केंद्रांवर पोहोचले होते. त्याला नागरदेवळे (ता. नगर) येथील सावतानगर जि. प. शाळेतील मतदार केंद्र अपवाद ठरले. मतदानासाठी सकाळी सकाळीच अनेक मतदारांनी मतदान केंद्र गाठले.

ज्या जि. प. शाळेत मतदान केंद्र होते, त्या शाळेच्या प्रवेशद्वारालाच कुलूप असल्याने व शाळा निर्मनुष्य दिसल्याने मतदारही बुचकळ्यात पडले. व्होटर स्लीपवर तर याच शाळेचा पत्ता दिला असून, कुणीच नसल्याने मतदारांचा संभ्रम वाढला. मात्र निवडणूक आयोगाने शाळेच्या बाहेर एका कोपऱ्याला मतदान केंद्राची जागा बदलल्याचा फलक लावला होता. तो पाहून मतदार चांगलेच संतापले होते. जि. प. शाळेची इमारत मोडकळीस आल्याने सावतानगर जि. प. शाळेतून हे मतदान केंद्र सौरभनगर येथील मायादेवी गुरुदत्तशाह ऍबट हायस्कूल व भिंगार हायस्कूल या शाळांत हलविण्यात आले होते.

सावतानगर जि. प. शाळेपासून या दोन्ही शाळा सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतरावर असल्याने पायी आलेल्या मतदारांची चांगलीच दमछाक झाली. प्रत्येक वेळी येथेच मतदान करत असल्याने व व्होटर स्लीपवर याच शाळेचा पत्ता असल्याने आम्ही या केंद्रात मतदान करण्यास आलो. मात्र येथील निवडणूक केंद्र बदलल्याची कुठलीच कल्पना निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी दिली नसल्याचे यावेळी मतदारांनी सांगून या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला. नवीन मतदान केंद्रावर गेल्यानंतरही अनेकांना आपली नावे यादीत सापडत नसल्याने दुसऱ्याच त्रासाला सामोरे जावे लागले. त्यामुळे जास्तीत जास्त मतदान घडवून आणण्याची निवडणूक आयोगाची जबाबदारी असतानाही, मतदारांना मतदानापासून रोखण्याचेच काम केल्याची प्रतिक्रिया यावेळी मतदारांनी दिला.

निवडणूक आयोग ही सावतानगर शाळेची इमारत मतदान केंद्रासाठी धोकादायक असल्याचे सांगत आहे. मात्र या शाळेत वर्षभर विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यामुळे त्यांच्या जीविताला धोका असल्याचा साक्षात्कार शासनाला अद्याप का झाला नाही. वर्षभर या धोकादायक इमारतीत विद्यार्थी शिक्षण घेतात. जर एखादी दुर्घटना घडली, तर त्यास जबाबदार कोण. या प्रकाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत.

महेश झोडगे, ग्रामपंचायत सदस्य, नागरदेवळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)