‘व्हीपीएफ’च्या अंतरंगात..

व्हॉलेंटरी प्रॉव्हिडंट फंड (व्हीपीएफ) म्हणजे ऐच्छिक भविष्य निर्वाह निधी होय. ही एक इपीएफओचीच योजना आहे. या योजनेतून लाभ घेणारे कर्मचारी हे स्वेच्छेने आपल्या वेतनातील कितीही टक्के वाटा प्रॉव्हिडंट खात्यात जमा करू शकतात. हे योगदान सरकारकडून आवश्‍यक 12 टक्के पीएफच्या निश्‍चित मर्यादेपेक्षा अधिक असावे, असा नियम आहे. अशावेळी मात्र कंपनी कोणत्याच प्रकारे व्हीपीएफची रक्कम देण्यास बांधील नसते, ही बाब लक्षात ठेवावी. बचत खाते, अन्य मुदत ठेवी योजनेच्या तुलनेत पीएफ आणि व्हीपीएफवर चांगले व्याज असल्याने नोकरदार वर्गांने व्हीपीएफ सुरू करण्याबाबत आग्रही असावे. सर्वच कर्मचारी याबाबत सजग असतातच असे नाही. याबाबत कंपनीतील लेखा विभागाशी संपर्क साधून व्हीपीएफच्या नियम आणि अटी जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. व्हीपीएफच्या माध्यमातून आपण निवृत्त निधीत चांगली वाढ करू शकतो, हे निश्‍चित.

वेगळे खाते नाही – अन्य खात्याप्रमाणे व्हीपीएफचे वेगळे खाते नसते. या खात्याचे पीएफ खात्यातच समायोजन केलेले असते. कर्मचारी आपले मूळ वेतन आणि महागाई भत्ता याचे शंभर टक्के योगदान व्हीपीएफमध्ये देऊ शकतो. व्हीपीएफवर आकारले जाणारे व्याज हे ईपीएफप्रमाणे लागू असते. वेगळे खाते नसल्याने व्हीपीएफची रक्कम ही दरमहा पीएफच्या खात्यातच जमा होते.

फंडमध्ये योगदान – व्हीपीएफ आणि पीपीएफ या दोन्हीतही योगदान ऐच्छिक आहे. केवळ पगारदार नोकर व्हीपीएफची निवड करू शकतात. तर पीपीएफ खाते हे पगारदार आणि बिगर पगारदार व्यक्ती सुरू करू शकतात. एखाद्या कर्मचाऱ्याला निवृत्तीच्या बचतीत वाढ करायची असेल तर व्हीपीएफचा पर्याय निवडायला हरकत नाही. एखादा कर्मचारी शंभर टक्के मूळ वेतन आणि महागाई भत्ता व्हीपीएफसाठी योगदान करू शकतो. पीपीएफ खात्यात वार्षिक दीड लाखांपर्यंत मर्यादा आहे तर व्हीपीएफमध्ये योगदान देण्यासाठी कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही.

व्हीपीएफवर परतावा – सध्या स्थितीत पीपीएफ खात्यावर 7.7 टक्के व्याज दर दिला जात आहे. पीपीएफचे व्याजदर हे सरकारच्या बॉंड यिल्डशी निगडित असलेल्या योजनेवर आधारित आहेत. सरकारी बॉंड हे किमान जोखीम असणाऱ्या योजना असतात. तर दुसरीकडे व्हीपीएफचा व्याजदर हा जी-बॉंड यील्डशी निगडित नसतो. त्यामुळे त्यावरील व्याजदर हा पीएफप्रमाणे आहे. सद्यस्थितीत ईपीएफचा व्याजदर हा 8.7 टक्के इतका आहे. हा व्याजदर पीपीएफपेक्षा अधिक आहे.

करसवलत – जर कर्मचाऱ्याने पाच वर्षापेक्षा अधिक कालावधीपेक्षा काम केले असेल तर इपीएफ आणि व्हीपीएफकडून मॅच्युरिटी उत्पन्नाला करसवलत दिली जाते. जर आपण पाच वर्षाच्या अगोदरच पैसे काढत असाल तर मॅच्युरिटी परताव्यावर काही प्रमाणात कर बसू शकतो. दुसरीकडे पीपीएफचा परतावा हा करमुक्त आहे.

कर्जाची सुविधा – इपीएफ आणि व्हीपीएफमधील जमा फंडच्या आधारे कर्ज घेण्यासाठी कोणीही अर्ज करू शकतो. याशिवाय संपूर्ण गुंतवणूक काढून घेऊ शकतो. पीपीएफवर कर्ज घेताना चौथ्या वर्षाच्या अखेरीस असलेल्या एकूण रकमेच्या 50 टक्केच रक्कम ही पीपीएफ खात्याच्या सहाव्या वर्षाच्या सुरुवातीला काढू शकतो.पीपीएफमध्ये कर्जाऊ म्हणून संपूर्णपणे रक्कम काढता येत नाही. अर्थात यासंबंधी सविस्तर माहिती आणि नियम हे कंपनीच्या लेखाविभागाकडून मिळू शकते. या नियमात ठराविक काळानंतर होणाऱ्या बदलाचा परिणाम कर्जाच्या निकषावरही होतो.

– अपर्णा देवकर

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)