विश्‍वजीत राणे म्हणाले ती ऑडिओ क्‍लीप बनावट

मुख्यमंत्र्यांकडे केली पोलिस चौकशीची मागणी

पणजी / नवी दिल्ली: गोव्यातील मंत्री विश्‍वजीत राणे यांच्या राफेल आणि त्या राज्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या संबंधातील ऑडिओ क्‍लीपने आज लोकसभेत जोरदार हंगामा झाला. ही क्‍लीप लोकसभेत वाजवण्याची मागणी राहुूल गांधी यांनी केली होती त्यावरून मोठा गदारोळ झाला होता. या संबंधात विश्‍वजीत राणे यांनी निवेदन करताना ही ऑडिओ क्‍लीप बनावट असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणाच्या चौकशीचा आदेश आपण आपल्या सरकारी यंत्रणांना दिला आहे असेही त्यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांना कळवले आहे. आज पणजीत वार्ताहरांशी बोलताना राणे म्हणाले की कॉंग्रेसने आपल्याला चुकीच्या पद्धतीने आणि खोटेपणाने राफेलशी संबंधीत वादात अडकवले आहे.

हा आडिओ बनावट आहे असे त्यांनी म्हटले आहे. याची पोलिस चौकशी करून संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी आपण मुख्यमंत्री पर्रिकर यांच्याकडे केली आहे असेही त्यांनी म्हटले आहे. आपण राफेलच्या विषयावर कोणाशीही काहीही बोललेलो नाही असे त्यांनी म्हटले आहे. कोणी तरी मुद्दाम हा खोडसाळपणा केला आहे आणि तो नेमका कोणी केला आहे त्याची चौकशी झाली पाहिजे असे आपण मुख्यमंत्र्यांना सांगितले असल्याचे ते म्हणाले. कॉंग्रेसला ही क्‍लीप कोठून मिळाली याची माहिती कॉंग्रेसनेच जाहीर करावी अशी मागणीही त्यांनी केली.

पर्रिकरांनीही केला इन्कार
माजी संरक्षण मंत्री व गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनीही या क्‍लीप मधील संभाषणाचा दावा फेटाळून लावला आहे. त्यांनी म्हटले आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे कॉंग्रेसचा राफेल संबंधातील दावा खोटा ठरला असल्याने त्यांनी अशा खोट्या बाबींचा आश्रय घेतलेला दिसतो आहे असे त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे.वस्तुस्थितीत फेरफार करून दिशाभुल करण्याचा प्रयत्न कॉंग्रेसकडून केला जात आहे असे पर्रिकर यांनी आपल्या ट्विटरवर म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)