#विशेष – विघातक मधुजाल (भाग 2)

-डाॅ. शैलेंद्र देवळाणकर (परराष्ट्र धोरण विश्लेषक)

ब्राह्मोस क्षेपणास्त्रविषयीची माहिती आयएसआय आणि अमेरिकेला पुरवल्याच्या आरोपावरून निशांत अगरवाल या शास्त्रज्ञाला अलीकडेच पकडण्यात आले. तो हनीट्रॅपमध्ये अडकला असण्याचा संशय व्यक्‍त होत आहे. आयएसआयकडून अशा प्रकारचे हनीट्रॅप लावले जाणे हा प्रकार पूर्वी अपवादात्मक घडायचा. आता तो एक प्रवाह बनला आहे. त्याची मिमांसा करणे आवश्‍यक आहे. त्याचबरोबर हा पाकिस्तानच्या प्रॉक्‍सी वॉरचा एक भाग असल्यामुळे त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठीच्या उपाययोजनांचाही विचार करणे गरजेचे आहे.

हनी ट्रॅपच्या घटनांमध्ये 2014 पासून वाढ झाली आहे. गेल्या दीड-दोन दशकांपासून पाकिस्तानातून भारतात दहशतवादी घुसवले जात आहेत. पाकिस्तान या मार्गांनी सतत कुरापत काढत असतो. तथापि, अलीकडील काळात सीमेवरचा पहारा कडक झालेला असल्यामुळे अशी सीमापार घुसखोरी करणे अवघड बनले आहे. त्यामुळेच पाकिस्तान हनी ट्रॅपच्या माध्यमातून नव्या प्रकारे छुप्या कारवाया करत आहे. पाकिस्तानने छेडलेल्या प्रॉक्‍सी वॉरचाच हा एक भाग आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

यासंदर्भात एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की, केवळ पाकिस्तानच हनी ट्रॅप लावते असे नाही तर चीनदेखील हनी ट्रॅप लावते आहे. अन्य आंतरराष्ट्रीय संघटनाही या मार्गाचा अवलंब करत असतात. या हनी ट्रॅपमध्ये साधारणतः सहा प्रकारच्या व्यक्‍तींना यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसते. आणखी एक मुद्दा म्हणजे पाकिस्तानकडून ब्राह्मोसविषयीची माहिती काढून घेण्याचा प्रयत्न का झाला हेही पाहावे लागेल. ब्राह्मोस हे एक सुपरसोनिक क्रूझ मिसाईल आहे.

लष्करी अधिकारी :कोणत्याही दलातील कार्यरत अधिकारी त्यांना आमिषे दाखवली जातात आणि त्यांना हनीट्रॅपमध्ये अडकवले जाते.
निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनाही गोवण्याचा प्रयत्न त्यात झालेला दिसतो.
लष्करामध्ये जाण्यासाठी इच्छुक तरुणांनाही ट्रॅप केले जात आहे.
या मधुजालामध्ये सामान्य माणसाला गुंतवले जाते आहे. यासाठी इथल्या गरीबी, बेकारीचा फायदा घेतला जातो. त्यांचा वापर शहरातील महत्त्वाच्या प्रशासकीय इमारतींची रेकी किंवा टेहळणी करण्यासाठी केला जातो. या जागांचे स्थान, प्रवेश कसा करता येईल ही माहिती प्रामुख्याने दहशतवादी संघटनांकडून मिळवली जाते.
इस्लामाबादेत असणाऱ्या भारतीय दूतावासातील कर्मचाऱ्यांनाही हनी ट्रॅपमध्ये फसवले जाते. काही वर्षांपूर्वी या दूतावासातील भाषा विभागातील कनिष्ठ दर्जाच्या तीन अधिकाऱ्यांना हनी ट्रॅपमध्ये फसवल्याचे निदर्शनास आले होते.
याखेरीज अलीकडील काळात तरुण वैज्ञानिक किंवा डीआरडीओसारख्या संरक्षण संशोधन संस्थांमधील शास्त्रज्ञांनाही हनी ट्रॅपमध्ये फसवले जात आहे. निशांत अगरवालला 2017-18 चे यंग इंडियन सायंटिस्ट हे पारितोषक मिळाले होते. अशा शास्त्रज्ञांना हेरून त्यांच्याकडून संरक्षणासंदर्भातील महत्त्वाची माहिती शत्रू राष्ट्रे काढून घेत असतात.

क्रूझ मिसाईल हे कमी उंचीवर उडत असल्याने शत्रू राष्ट्रांच्या रडारवर दिसत नाहीत. साहजिकच त्यांना पकडता येत नाही. ब्रह्मोसचा प्रकल्प भारत-रशिया यांचा संयुक्त प्रकल्प आहे. लष्करातील तीन दलांसाठी तीन प्रकारची ब्राह्मोस क्षेपणास्त्रे निर्माण करण्यात आली आहेत. त्यामध्ये भारताने काही महत्त्वाचे बदल घडवून आणले आहेत आणि नेमके तेच पाकिस्तानला जाणून घ्यायचे आहेत.

कारण त्या माहितीद्वारे या मिसाईलला शह कसा द्यायचा, त्यांना प्रतिरोध कसा करायचा याबाबतचे तंत्रज्ञान विकसित करता येऊ शकते. म्हणूनच पाकिस्तानचे ब्राह्मोसकडे खूप लक्ष आहे. यासाठीच निशांत अग्रवालला जाळ्यात ओढण्यात आले होते.

अशा प्रकारचा हनी ट्रॅप लावताना ज्या व्यक्तींना जाळ्यात ओढायचे आहे त्यांच्या इंटरनेट वापरण्याच्या सवयी जाणून घेतल्या जातात. त्यांची सायबर सायकॉलॉजी जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो.

#विशेष – विघातक मधुजाल (भाग 1)  #विशेष – विघातक मधुजाल (भाग 3)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)