#विशेष – विघातक मधुजाल (भाग 3)

-डाॅ. शैलेंद्र देवळाणकर (परराष्ट्र धोरण विश्लेषक)

ब्राह्मोस क्षेपणास्त्रविषयीची माहिती आयएसआय आणि अमेरिकेला पुरवल्याच्या आरोपावरून निशांत अगरवाल या शास्त्रज्ञाला अलीकडेच पकडण्यात आले. तो हनीट्रॅपमध्ये अडकला असण्याचा संशय व्यक्‍त होत आहे. आयएसआयकडून अशा प्रकारचे हनीट्रॅप लावले जाणे हा प्रकार पूर्वी अपवादात्मक घडायचा. आता तो एक प्रवाह बनला आहे. त्याची मिमांसा करणे आवश्‍यक आहे. त्याचबरोबर हा पाकिस्तानच्या प्रॉक्‍सी वॉरचा एक भाग असल्यामुळे त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठीच्या उपाययोजनांचाही विचार करणे गरजेचे आहे.

एवढेच नाही तर ज्या व्यक्‍ती सातत्याने पॉर्न साईट व्हिजिट करतात त्यातून त्यांच्या कमतरता किंवा वीक पॉईंट पाहिले जातात. त्यानंतर फेसबुक किंवा तत्सम सोशल माध्यमांतून संपर्क साधला जातो. यासाठी काही डमी महिला तयार केल्या जातात. अशा महिला आपले स्वतःचे मादक, अश्‍लील फोटोग्राफ पाठवून या व्यक्‍तींना भुलवतात. त्यांच्याबरोबर चॅटिंग करतात. या चॅटिंगचा वापर करुन त्यांना हवी ती माहिती दिली नाही तर झालेला सर्व संवाद खुला करू अशा पद्धतीने धमकावून ब्लॅकमेलिंग थिअरीचा वापर करत ही माहिती मिळवली जाते.

-Ads-

काही वेळा पत्रकार म्हणून ओळख सांगून संरक्षणविषयक लेखासाठी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. मध्यंतरी, एका महिलेने ब्रिटिश पत्रकार दामिनी मॅकनार असे नाव सांगून माहिती घेण्याचा प्रयत्न केला होता; पण ती आयएसआयचीच एजंट होती. प्रामुख्याने या चार पद्धतींनी भारतीयांना हनी ट्रॅप केले जात आहे.

एक धक्‍कादायक बाब म्हणजे, अशा प्रकारचे हनी ट्रॅप लावण्यासाठी पाकिस्तानने चक्‍क काही संस्थाच स्थापन केल्या आहेत. पाकिस्तानच्या कराचीमध्ये आयएसआयकडून मध्यंतरी सायबर कॅफे चालवला जायचा. हा कॅफे राणा बंधू चालवायचे. यामध्ये जवळपास 400 जण काम करत होते. यावरून पाकिस्तानच्या हालचालींची कल्पना येते.
एक चांगली बाब म्हणजे या हनी ट्रॅपचा पर्दाफाश होत आहे. यासंदर्भात आपले संरक्षण खाते, गुप्तचर यंत्रणा, एटीएस हे चांगले काम करते आहे. असे असले तरी या वाढत्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी काही दूरदर्शी उपाययोजना करणे आवश्‍यक आहे.

याबाबतचा पहिला मार्ग म्हणजे संरक्षण क्षेत्रातील लोकांनी मार्गदर्शक सूचनांचे अत्यंत कडक पालन केले पाहिजे. पठाणकोटवर दहशतवादी हल्ला झाला तेव्हा लष्कराकडून अशा स्वरुपाच्या सूचना दिल्या गेल्या होत्या. त्यानुसार कोणत्याही लष्करी अधिकाऱ्याला फेसबुक किंवा व्हॉटस ऍपवर खाते काढताना त्याची ओळख उघड करता येणार नाही असे निर्बंध घालण्यात आले होते. या मार्गदर्शक सूचना अनुसरल्या पाहिजेत. शिवाय त्याचा प्रसारही केला पाहिजे. हे हनी ट्रॅप कसे लावले जातात, त्यामध्ये कशा प्रकारे अडकले जाऊ शकते याबाबत लोकांचे प्रबोधन केले पाहिजे.

समाजमाध्यमांवर आपल्या फोटो अथवा पोस्टला एखाद्या अनोळखी व्यक्तीने लाईक केल्यास त्याच्याशी लगेच संवाद साधू नये. थोडक्‍यात, इंटरनेट सवयींबाबत सावध राहिले पाहिजे. कोणतीही फ्रेंड रिक्‍वेस्ट स्वीकारण्यापूर्वी सदर व्यक्‍तीची खात्री करून घेणे, पडताळणी करून घेणे आवश्‍यक आहे. याबाबत वेगवेगळ्या प्रशिक्षणांचे आयोजन करून लोकजागरुकता वाढवली गेली पाहिजे. त्याचबरोबर एथिकल कोड ऑफ कंडक्‍ट बाळगले पाहिजे. स्वनियंत्रण ठेवण्यासाठी नैतिक मूल्ये रुजवण्याचा प्रयत्न करणे अत्यावश्‍यक आहे.

मोबाइल किंवा तत्सम साधनांमधून जी माहिती दिली जाते त्यावर नियंत्रण ठेवणे हे कठीण असते. कारण खासगी मोबाइल, कॉम्प्युटरवरून एखाद्याने घरात बसून माहिती दिली तर ते सार्वजनिकरीत्या कळणे महाकठीण असते. अशा प्रकारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी इस्रायल या देशाने आयपी कोडवरून एक नवे तंत्रज्ञान विकसित केले आहे. आपण अशा राष्ट्रांबरोबर लवकरात लवकर महत्त्वाचे करार करून ही माहिती आपल्यापर्यंत कशी येईल हे पाहणे खूप महत्त्वाचे आणि गरजेचे आहे.

शेवटचा मुद्दा म्हणजे हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या लोकांना कडक शिक्षा देणे आवश्‍यक आहे. या गुन्हेगारांवर ऑफिशिअल सिक्रेट ऍक्‍टच्या अंतर्गत कारवाई न करता त्यांना देशद्रोह्याच्या कलमांतर्गत कडक शिक्षा दिली पाहिजे. जेणेकरून कोणतीही व्यक्ती संरक्षण संबधित माहिती शत्रूराष्ट्राला पुरवण्याचे दुःसाहस करणार नाही.

#विशेष – विघातक मधुजाल (भाग 1)  #विशेष – विघातक मधुजाल (भाग 2)

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)