#विशेष – विघातक मधुजाल (भाग 1)

-डाॅ. शैलेंद्र देवळाणकर (परराष्ट्र धोरण विश्लेषक)

ब्राह्मोस क्षेपणास्त्रविषयीची माहिती आयएसआय आणि अमेरिकेला पुरवल्याच्या आरोपावरून निशांत अगरवाल या शास्त्रज्ञाला अलीकडेच पकडण्यात आले. तो हनीट्रॅपमध्ये अडकला असण्याचा संशय व्यक्‍त होत आहे. आयएसआयकडून अशा प्रकारचे हनीट्रॅप लावले जाणे हा प्रकार पूर्वी अपवादात्मक घडायचा. आता तो एक प्रवाह बनला आहे. त्याची मिमांसा करणे आवश्‍यक आहे. त्याचबरोबर हा पाकिस्तानच्या प्रॉक्‍सी वॉरचा एक भाग असल्यामुळे त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठीच्या उपाययोजनांचाही विचार करणे गरजेचे आहे.

ब्राह्मोस मिसाईल सेंटर आणि डीआरडीओ यांच्या संयुक्‍त विद्यमाने सुरू असलेल्या नागपूरमधील एका प्रकल्पामध्ये कार्यरत असणाऱ्या निशांत अग्रवाल नावाच्या भारतीय शास्त्रज्ञाला गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली. उत्तर प्रदेशातील अँटी टेटरिझम स्क्वाड आणि लष्कराचे मिलिटरी इंटेलिजन्स यांनी संयुक्‍तरीत्या ही कारवाई केली. त्यानंतर समोर आलेल्या माहितीनुसार सदर शास्त्रज्ञ आयएसआयच्या हनी ट्रॅम्पमध्ये अडकल्याचे समोर आले आहे. या जाळ्यात अडकून अग्रवालने ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या संदर्भातील हायटेक माहिती आयएसआयला दिल्याचे समजते.

-Ads-

हनी ट्रॅप अर्थात मधुजाल हा प्रकार नवा नाही. तथापि, आयएसआयकडून अशा प्रकारचे हनी ट्रॅप लावले जाणे हा प्रकार पूर्वी अपवादात्मक घडायचा. आता तो प्रवाह किंवा ट्रेंड बनला आहे. गेल्या तीन महिन्यांत अशा प्रकारच्या अन्य दोन घटनाही उजेडात आल्या आहेत. उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये अच्युत प्रधान नावाचा बीएसएफ जवानही अशाच स्वरूपाच्या ऑपरेशनमध्ये पकडला गेला होता. फेसबुकवरून तो ज्या मैत्रिणीशी चॅटिंग करत होता त्या मैत्रिणीच्या
फेसबुकच्या अकाउंटमध्ये 90 भारतीयांचा समावेश होता. त्यापैकी काही लष्करातील जवान किंवा अधिकारी होते. त्यामुळे हा हनी ट्रॅप एक-दोनांपुरता मर्यादित राहिलेला नसून त्यात अनेक जण गुंतले गेल्याचे समोर आले आहे.

काही आठवड्यांपूर्वी राजस्थानमधील अलवारमध्ये 19 वर्षांचा मुलगा हनी ट्रॅपमध्ये पकडला गेला. त्यापूर्वी अरुण मारवाह नामक हवाईदलाचा एक अधिकारीही हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचे उघड झाले होते. त्याने अनेक महत्त्वाचे फोटोग्राफ आयएसआयला दिल्याचे कबूल केले. थोडक्‍यात, या घटना वारंवार घडताहेत. हनी ट्रॅप लावणे आणि त्यात अशा तरुणांना, अधिकाऱ्यांना, शास्रज्ञांना गुंतवणे या संपूर्ण प्रक्रियेतील मोडस ऑपरेंडी पाहिल्यास त्यात साम्य दिसून येते.

तरीही अलीकडील काळात हे प्रमाण का वाढले असावे हे पाहणे आवश्‍यक ठरेल. पहिले कारण म्हणजे दहशतवादी संघटना, गुप्तहेर संघटना यांच्याकडून सोशल मीडियाचा वापर जास्त प्रमाणात होतो आहे. गेल्या वर्षी कल्याणमधून आरिफ माजिदी ह्या तरुणाला पकडण्यात आले होते. इस्लामिक स्टेट या आंतरराष्ट्रीय संघटनेशी त्याचे लागेबांधे असल्याचे, त्याचा संबंध असल्याचे उघडकीला आले होते. एनआयएने त्यावर आरोपपत्र दाखल केले तेव्हा तोदेखील हनी ट्रॅपमध्येच अडकला असल्याचे समोर आले आहे. त्यासाठी ताहिरा भट नावाची एक महिला कारणीभूत होती. ही महिला खरी किंवा खोटी व्यक्‍तीही असू शकते.

आरिफला गुंतवण्यासाठी तिचा वापर केला गेला असावा; परंतु त्याच्या आरोपपत्रातून आणखी एक गोष्ट समोर आली ती म्हणजे आयएसआय किंवा इस्लामिक स्टेटसारख्या आंतरराष्ट्रीय संघटना भारतातील टेक्‍नोसॅव्ही किंवा तंत्रकुशल लोकांच्या शोधात आहेत. भारतात तंत्रज्ञानाचा सर्वाधिक वापर होतो. त्यामुळे या संघटनांना ट्‌विटर किंवा सोशल मीडिया हॅंडल करण्यासाठी त्याची गरज आहे. हनी ट्रॅप वाढण्याचे आणखी एक कारण म्हणजे भारतात मोठ्या प्रमाणात मोबाइलचा वापर केला जातो. ज्यांना तंत्रज्ञानाची आवड आहे असे तरुण भारतातच अधिक प्रमाणात आहेत. त्यामुळे या दहशतवादी संघटनांचे, शत्रू राष्ट्रांचे लक्ष भारताकडे असणे स्वाभाविक आहे.

#विशेष – विघातक मधुजाल (भाग 2)  #विशेष – विघातक मधुजाल (भाग 3)

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)