#HBD_Virat : वीस वर्षांच्या विराटने भारताकडून जेव्हा पहिला एकदिवसीय सामना खेळला तेव्हा …

दहा वर्षांपूर्वी दाम्बूला येथे वीस वर्षांच्या विराट कोहलीने भारताकडून जेव्हा पहिला एकदिवसीय सामना खेळला तेव्हा पुढील दहा वर्षांत तो दहा हजार धावा करेल, असे कोणाला स्वप्नातही वाटले नव्हते. दिल्लीत जन्मलेला विराट हा एकामागून एक विक्रम प्रस्थापित करेल, याची कल्पनाही कोणी केली नव्हती.

भारतीय क्रिकेट विश्वातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात अगदी कमी वेळातच आपल्या कर्तृत्वाच्या बळावर लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेलं एक नाव म्हणजे ‘विराट कोहली’. फलंदाजी, कर्णधारपद आणि  क्षेत्ररक्षण या क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या विराट कोहलीचा आज वाढदिवस.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नुकताच वेस्ट इंडिजविरुद्ध विशाखापट्टण येथे खेळताना विराटने आणखी एक विक्रम आपल्या नावावर नोंदवला. कमीत कमी डावात दहा हजार धावा करण्याचा पराक्रम त्याने केला आहे. या सामन्याच्या अगोदर विराटच्या नावावर 212 सामन्यात 204 डावात 9919 धावा होत्या. वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने 37 व्या षटकात ऍश्‍ले नर्सच्या चेंडूवर विक्रम प्रस्थापित केला. कोहलीने 205 डावातच दहा हजार धावा केल्या. सचिनने दहा हजार धावांचा पल्ला 31 मार्च 2001 रोजी गाठला होता. या धावा त्याने 259 डावात केल्या होत्या. एका अर्थाने विराटने सचिनपेक्षा 54 डाव कमी खेळले आहेत. सर्वात कमी डावात दहा हजार धावा करण्यात दुसऱ्या क्रमांकावर माजी कर्णधार सौरभ गांगुलीचा नंबर लागतो.

18 ऑगस्ट 2008 रोजी श्रीलंकेविरुद्ध पर्दापण करून एकदिवसीय सामन्यांचे करियर सुरू करणाऱ्या कोहलीने जानेवारी 2017 मध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये  विराटच्या नावावर आतापर्यंत 216 सामन्यात 208 डावात 10,232 धावा आहेत. यामध्ये 38 शतक आणि 48 अर्धशतकांचा समावेश आहे. 183 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

कसोटीचा विचार केल्यास विराटने 20 जून 2011 मध्ये वेस्टइंडीजविरूध्द कसोटी सामन्यात पर्दापण केले. कसोटीमध्ये विराटने 73 सामन्यात 124 डावात 6,331 धावा केल्या आहेत. कसोटीत विराटच्या नावे 24 शतकं आणि 19 अर्धशतकं आहेत.

एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटप्रमाणेच विराटची टी20 क्रिकेटमध्ये सुध्दा दमदार कामगिरी आहे. विराटने 62 सामन्यात 58 डावात 2,102 धावा केल्या आहेत. टी20 मध्ये विराटच्या नावे 18 अर्धशतकं आहेत. टी20 मध्ये विराट अद्यापही शतक करू शकलेला नाही, 90 ही विराटची टी20 क्रिकेटमधली सर्वाेच्च कामगिरी आहे.

आज विराट कोहली 30 वर्षांचा झाला आहे. त्याचा फिटनेस पाहता तो आणखी आठ-नऊ वर्षे खेळेल, असे वाटत आहे. त्याची बॅट अशीच तळपत राहिली तर तो किती शतकं आणि धावा काढेल, याचा अंदाज बांधणे कठीण आहे. विराटच्या फलंदाजीची एक खासियत आहे, ती म्हणजे तो केवळ धावा काढत नाही तर एकामागून एक विक्रमाची नोंद करत जातो.

आज विराटला सोशल मीडियापासून ते कला आणि क्रीडा वर्तुळापर्यंत सर्वच ठिकाणी वाढदिवसानिमित्त त्याला शुभेच्छा देण्यात येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)